विधान परिषदेची प्रतिष्ठा उंचावणारे वसंतराव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 11:09 PM2018-01-04T23:09:39+5:302018-01-04T23:56:05+5:30

लोकशाहीमध्ये सांसदीय व्यवस्थेअंतर्गत केंद्रस्थानी संसद आणि राज्यस्थानी विधानसभा-विधान परिषद या संस्था प्राणतत्त्वाच्या ठिकाणी असतात. लोकशाहीचा प्राण असावा, तशी ही व्यासपीठे अस्तित्वात असतात.

Vasantrao Raising the status of the Legislative Council | विधान परिषदेची प्रतिष्ठा उंचावणारे वसंतराव

विधान परिषदेची प्रतिष्ठा उंचावणारे वसंतराव

googlenewsNext

लोकशाहीमध्ये सांसदीय व्यवस्थेअंतर्गत केंद्रस्थानी संसद आणि राज्यस्थानी विधानसभा-विधान परिषद या संस्था प्राणतत्त्वाच्या ठिकाणी असतात. लोकशाहीचा प्राण असावा, तशी ही व्यासपीठे अस्तित्वात असतात. ही व्यासपीठे नि:पक्षपातीपणाने, जनहिततत्पर राहून, न्याय पद्धतीने चालविण्याचे महत्कार्य विधानमंडळाचे सभापती - उपसभापती पार पाडत असतात. किंबहुना विधानमंडळाची कार्यक्षमता, प्रतिष्ठा या उच्चधिका-यांमुळेच अबाधित राहते. सुदैवाने महाराष्ट्र राज्य विधानमंडळाची पूर्वपरंपरा अतिशय उज्ज्वल आणि उच्च श्रेणीची आहे. पूर्वकाळात मा. वि.स. पागे, मा. बाळासाहेब भारदे, बॅरिस्टर वानखेडे, मा. मधुकरराव चौधरी आदी दिग्गज सभापतींनी महाराष्ट्राचे विधानमंडळ रामशास्त्री बाण्याने सांभाळले होते. सांप्रतच्या काळात विधानमंडळासमोरील कामकाज पूर्वीपेक्षा जटिल, व्यामिश्र व गुंतागुंतीच्या समस्यांनी व्यापलेले असते. लोकशाहीचे पंचप्राण शाबूत ठेवण्याचे सभापतींसमोरील महान कार्य पूर्वीपेक्षाही अधिक कठीण बनलेले आहे.
या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती म्हणून कार्यरत असलेले आमचे सन्मित्र मा. श्री. वसंतरावजी डावखरे गेली दोन दशके अत्यंत कार्यक्षमतेने त्या पदाची धुरा सांभाळत आहेत. त्यांची अमोघ कार्यपद्धती, कायद्यातील तरतुदींचे काटेकोर पालन करून सभागृहाला संतुलित संयमित आणि नि:पक्षपातीपणाने पुढे नेण्यातील कुशलता यामुळे विधान परिषदेची प्रतिष्ठा उंचावल्याचे दिसून येते. मा. डावखरे महोदयांना त्यांचा प्रदीर्घ पूर्वानुभव विधान परिषदेच्या कामी येण्यासाठी पुनश्च नेतृत्वाची संधी लाभली. तर, माझ्यासारख्या लोकशाहीवादी साहित्यिक नागरिकाला विशेष आनंद होईल. 
- मधू मंगेश कर्णिक,
राष्ट्रपती सन्मानित पद्मश्री
 
डावखरेंचे घर-
एक संपन्न सांस्कृतिक केंद्र

विलासराव देशमुख यांच्याबरोबर डावखरे यांच्या घरी ठाण्यात गेलो होतो. ती आमची पहिलीच भेट होती. तिथे आनंद दिघे व काही शिवसैनिकही उपस्थित होते. गप्पांत हळूहळू या व्यक्तिमत्त्वाचा परिचय होत गेला. ग्रामीण भागातून आलेला हा तरुण बाळासाहेब देसार्इंच्या तालमीत मुंबईत तयार झाला. ग्रामीण जीवनाच्या सुखदु:खाची जाणीव ठेवत ठाण्यासारख्या शहराशी एकरूप झाला. सर्व पक्षांतील लोकांशी त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहून मी थक्क झालो. त्यांच्या बोलण्यात बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल नितांत आदराची भावना दिसून आली. पुढे मी विधान परिषदेवर निवडून आलो, ते उपसभापती झाले. जवळीक वाढली. दुपारचे जेवण त्यांच्या दालनातच असायचे. रात्री अनेक वेळा त्यांच्या बंगल्यावर सर्वपक्षीय नेत्यांसाठी कधी कवी संमेलन, तर कधी गजलगायन असे. डावखरेंचे घर म्हणजे एक सांस्कृतिक केंद्रच. दिवसा सभागृहात भांडणारे आमदार रात्री येथे खेळीमेळीत गप्पा मारताना दिसत. असा हा बाळासाहेब देसाई, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांच्यापासून गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरींपर्यंत सर्वांचे प्रेम मिळवणारा नेता, शरद पवारांपासून शंकरराव चव्हाणांपर्यंत सर्वांचा विश्वास संपादन करू शकला. डावखरे पुन्हा सभागृहात दिसावेत, असे मनापासून वाटते.
- रामदास फुटाणे,
माजी विधान परिषद सदस्य
 
मैत्रीच्या पालखीचे भोई
पहिल्याच भेटीत आपल्याला निखळ मैत्रीच्या नात्यात आणणारा वसंत डावखरे नावाचा अजब माणूस आहे. कष्टाने, मेहनतीने आणि जिद्दीने या माणसानं स्वत:ला घडवलं आहे. सामान्य परिस्थितीत पोटापाण्यासाठी चाकरी करण्यापासून नगरसेवक ते विधान परिषदेचे उपसभापतीपद एवढी मोठी मजल त्यांनी गाठली आहे. रूढअर्थाने अपेक्षित असलेले राजकारणही त्यांनी कौशल्याने हाताळले आहे. ज्या महत्त्वाच्या पदांवर त्यांना काम करण्याची संधी मिळत गेली, त्या स्थानावरून गोरगरिबांच्या, कष्टक-यांच्या हिताची जपणूक करण्याचा वसा त्यांनी अंगीकारला आहे. राजकारण एके राजकारण हे सूत्र त्यांना कधीच बंधनात अडकवू शकलेले नाही. अत्यंत सहजतेने त्यांचा कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक कार्य ह्या सर्वांत वावर असतो. माणसं जोडत जाणे, हा तर त्यांच्या जगण्याचा श्वास झाला आहे. बरं हे सगळं दिखाऊ किंवा मोठेपणा मिरविण्यासाठी, प्रसिद्धीसाठी काहीतरी मिळविण्यासाठी कधीच नसतं. एखाद्या गावाकडचा सामान्य परिस्थितीतला खेळाडू असेल, कलेच्या प्रांतात धडपड करणारा कुणी कलाकार असेल, परिस्थितीने भरडलेला कुणी अभागी असेल, सरकारी यंत्रणेकडून अन्याय झालेला कुणी पीडित असेल अशी असंख्य माणसे हक्काने आपली कैफियत घेऊन डावखरे साहेबांकडे येतात. माणसाची पारख करण्यात वसंतरावांचा हातखंडा आहे. आलेल्या माणसाचे काम आपण केलेच पाहिजे, ह्या जाणिवेने मग ते पछाडलेले असतात. ते काम होण्यासाठी अटीतटीची वेळ आली तरी ते मागे हटत नाहीत. काही वेळा येणारा माणूसही चूक करून आलेला असतो. त्याला अपराधीपणाची जाणही असते. पण, माणुसकी म्हणून त्याला पुन्हा संधी द्यायला हवी, ही वसंतरावांची भूमिका राहिलेली आहे. प्रसंगी त्याबद्दल त्यांना टीकेचा धनी व्हावयाला लागले आहे. अनेक नेत्यांना लोक काय म्हणतील, ह्या यक्षप्रश्नाने ग्रासलेले असते. पण, वसंतरावांचं सूत्र पक्कं असतं. लोक म्हणायचे ते म्हणत राहतील, त्याची एवढी चिंता नको. माझ्या मनाला पटलं आणि योग्य वाटलं तर तो प्रश्न मी मार्गी लावणारच, हा निर्धार पक्का असतो. राजकीय पक्षांची स्वनिर्मित कुंपणे वसंतरावांच्या मित्रप्रेमाच्या कधीच आड आली नाहीत. त्यामुळे त्यांची ऊठबस सगळ्या प्रमुख नेत्यांबरोबर स्रेहाची राहिली आणि कुणीही तर्कटपणाने त्याचे वेगळे अर्थ काढले नाहीत. उलट, वसंतराव म्हणजे अडचणीच्या प्रसंगी सलोखा घडवण्यासाठी हुकुमाचे हत्यार म्हणूनच वापरात आले.
महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहात उपसभापती म्हणून त्यांनी आपली स्वत:ची खास प्रतिमा निर्माण केली आहे. त्या उच्चासनावर बसल्यानंतर पक्षभेदाच्या पलीकडचे समाजकारण त्यांनी अग्रस्थानी ठेवले. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही त्यांच्या न्यायबुद्धीची कायम तारीफ करतात. खरं म्हणजे, उपसभापती म्हणजे विमानातल्या कॉकपिटमधला को-पायलट. मुख्य पायलट अर्थातच सभापती. सभागृहाच्या कामकाजात काही अटीतटीचे मुद्दे येतात, वातावरण संतप्त होते ह्या सर्वांवरचा रामबाण उपाय म्हणजे वसंत डावखरे हा परवलीचा शब्द झाला आहे. तणाव कमी करणे, वातावरणात मार्मिक पण खुसखुशीत टिप्पणी करून हास्याची लहर निर्माण करणे हे त्यांचे कसब विलक्षण आहे. वरवर पाहता वसंतराव सगळ्याच गोष्टी लाइटली घेतात, असा समज होण्याची शक्यता निर्माण होते. पण विषय गंभीर असला तर तेवढ्याच तन्मयतेने प्रश्नांची तड लावण्यासाठी ते तत्पर असतात. हे वसंतराव वेगळे वाटतात. त्यांच्यामधून एका करारी नेत्याचा परिचय मिळत असतो.
वसंतरावांचे निवासस्थान, कार्यालय कधीच परकेपणाची भावना राखत नाही. मला तर माहीत आहे की, असंख्य क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती, कलाकार, लेखक, चळवळीतले कार्यकर्ते हक्काने त्यांच्या परवानगीशिवाय वसंतरावांच्या कार्यालयात आणि निवास्थानी हक्काने भेटत असतात. बरं आदरातिथ्यात आणि पाहुणचारात त्यांची टीम तयारच असते. इथे आल्यावर मागितल्याशिवाय सर्व मिळतं हा मोठा विश्वास असतो. स्वत:ला २४ तास गुंतवून ठेवणारे वसंतराव उत्तम रसिक, चांगले वाचक, उत्तम संयोजक अशा अनेकविध आघाड्यांवर बागडत असतात. खºया अर्थाने आपल्या जीवनातल्या आनंदाचा वसंतोत्सव अखंडपणे रंगलेला असतो. इथे मैत्र मोठं होत जातं, कपट कारस्थानाला जागा नसते. आपुलकीची जाण असते. हे सगळे करत असताना वसंतराव मात्र कार्यकर्त्यांच्या भूमिकेत जगतात. निर्व्याज्य प्रेमाने मैत्रीच्या पालखीचे भोई म्हणून पावलं टाकण्यात त्यांचं व्यक्तिमत्त्व एकरूप झाले आहे.
कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे-
प्रेम कुणावर करावं...
कुणावरही करावं...
प्रेम ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच.
... ज्याला मारायचं त्यांच्यावरही करावं
प्रेम तलावारीच्या पात्यावर करावं.
... काळजातल्या नात्यावर करावं.
प्रेम कुणावरही करावं.
असा हा अवलिया आपला मित्र असणं म्हणजे आपण खूप श्रीमंत आहोत, हे लक्षात येते.
-हेमंत टकले
आमदार विधान परिषद, लेखक

Web Title: Vasantrao Raising the status of the Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.