वर्गवारी होईना ‘अपडेट’; मराठा विद्यार्थी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 03:48 AM2018-12-15T03:48:06+5:302018-12-15T06:54:28+5:30

एमपीएससी अर्ज भरण्यात अडथळे

'Update' is classified; Maratha students suffer | वर्गवारी होईना ‘अपडेट’; मराठा विद्यार्थी त्रस्त

वर्गवारी होईना ‘अपडेट’; मराठा विद्यार्थी त्रस्त

googlenewsNext

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून त्यात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) या प्रवर्गाअंतर्गत मराठा समाजालाही प्रतिनिधित्व दिले. मात्र, या प्रवर्गातील लाखो विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष अर्ज भरण्यात अडथळा निर्माण झाला आहे. यापूर्वी संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या वर्गवारीतील माहितीच ‘अपडेट’ होत नाही. त्यामुळे त्यांना अर्जही करता येत नाही. परिणामी हजारो विद्यार्थी या अडचणीमुळे त्रस्त झाले आहेत.

राज्य शासनाने मराठा समाजाला ‘एसईबीसी’ अंतर्गत १६ टक्के आरक्षण दिले आहे. त्यानुसार आयोगाने नुकतीच विविध ३४२ पदांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये ‘एसईबीसी’ प्रवर्ग देऊन १६ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. त्याप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. नव्याने अर्ज भरण्यात विद्यार्थ्यांना अडचणी येत नाहीत. मात्र, यापूर्वी ऑनलाईन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे.

महाऑनलाईन एमपीएससीच्या संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाठी सुरुवातीला विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी लागते. त्यानंतर प्रोफाईलमध्ये संपूर्ण माहिती भरणे आवश्यक असते. यामध्ये प्राथमिक माहितीनुसार जातीनुसार प्रवर्गाची निवड केली जाते. परंतु ही निवड एकदा करून जतन केल्यास त्यानंतर यात बदल करता येत नाही. राज्यसेवेच्या जाहिरातीत दिल्याप्रमाणे एसईबीसी प्रवर्गाच्या वेगळ्या जागा आहेत. आता ज्या मराठा विद्यार्थ्यांनी यापूर्वी आपल्या प्रोफाईलमध्ये खुल्या प्रवर्गाची निवड केली आहे, अशा मराठा विद्यार्थ्यांना आता एसईबीसी हा प्रवर्ग अद्ययावत करता येत नाही. आयोगाकडून अद्याप तशी सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आयोगाच्या उत्तराने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
काही विद्यार्थ्यांनी वर्गवारी अद्ययावत होत नसल्याबद्दल आयोगाशी ई मेलद्वारे संपर्क साधला. आयोगाने या विद्यार्थ्यांना जातीच्या तसेच प्रवर्गाशी संबंधित तक्रांरींसाठी किंवा अद्ययावत करण्यासाठी आपले लॉग इन विषयी सविस्तर माहिती संबंधित ई- मेलवर पाठवावी असे म्हटले आहे.

आयोगाच्या या उत्तराने विद्यार्थ्यांमध्ये आणखी संभ्रम वाढला आहे. आतापर्यंत हजारो मराठा विद्यार्थ्यांनी यापूर्वी नोंदणी केली आहे. त्यामुळे या सर्वच विद्यार्थ्यांनी आयोगाकडे याबाबत ई मेल करायचा का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या अडचणीमुळे अनेक विद्यार्थी अर्ज कसा करायचा, या विवंचनेत अडकले आहेत.

Web Title: 'Update' is classified; Maratha students suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.