रिफायनरीबाबत उद्धव ठाकरेच महत्त्वाची घोषणा करतील -विनायक राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 02:46 PM2018-04-22T14:46:02+5:302018-04-22T14:46:02+5:30

नाणार येथील रिफायनरी प्रकल्प हे केंद्र सरकारचे पाप आहे. या पापात दुर्दैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. केवळ भारतीय कंपन्यांचाच हा प्रकल्प असेल, १०० टक्के सहभाग केंद्र सरकारचा असेल असे सांगितले होते.

Uddhav Thackeray will make important announcement regarding Nanar refinery - Vinayak Raut | रिफायनरीबाबत उद्धव ठाकरेच महत्त्वाची घोषणा करतील -विनायक राऊत

रिफायनरीबाबत उद्धव ठाकरेच महत्त्वाची घोषणा करतील -विनायक राऊत

Next

रत्नागिरी  - नाणार येथील रिफायनरी प्रकल्प हे केंद्र सरकारचे पाप आहे. या पापात दुर्दैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. केवळ भारतीय कंपन्यांचाच हा प्रकल्प असेल, १०० टक्के सहभाग केंद्र सरकारचा असेल असे सांगितले होते. पण हा प्रकल्प भारतीय कंपनीचा नसून सौदी अरेबियातील कंपनीच्या हितासाठी हा प्रकल्प कोकणात आणला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आज (रविवारी) रत्नागिरीतील कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. रिफायनरीबाबत उद्या होणाऱ्या  उद्धव ठाकरे यांच्या सभेत ते महत्वाची घोषणा करतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होणाऱ्या  रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. या परिसरातील ग्रामस्थांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावेळी आपण प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी सागवे - कात्रादेवी येथे सकाळी ११ वाजता उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

यावेळी विनायक राऊत यांनी सांगितले की, कोकणात यापूर्वीही प्रदूषणकारी प्रकल्प आले आहेत. एन्रॉन, अणुऊर्जा या प्रकल्पांपेक्षाही रिफायनरी हा सर्वात मोठा प्रदूषणकारी प्रकल्प आहे. या प्रकल्पाची राज्यालाच काय पण देशालाही गरज नाही. या प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. शिवसेनेनेही सुरूवातीपासून या प्रकल्पाला विरोध केला आहे. शिवसेना ग्रामस्थांसमवेतच असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या सभेची सर्वांनाच उत्सुकता आहे. हा प्रकल्प शिवसेनाच रद्द करू शकतात हा विश्वास जनतेला आहे. त्यांच्या आगमनामुळे येथील ग्रामस्थांची असणारी एकीची वज्रमूठ फोडायची, ग्रामस्थांमध्ये दुही माजवायची, आंदोलनात फाटाफूट करायची यासाठी प्रकल्पाचे समर्थक कामाला लागले आहेत, असा आरोपही खासदार राऊत यांनी यावेळी केला. प्रकल्प समर्थकांच्या माध्यमातून सभेवर बहिष्कार टाकण्याची अफवा पसरविण्याचे काम केले जात आहे. मात्र, या सभेला येथील ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, या सभेला प्रत्येक घरातील व्यक्ती उपस्थित राहणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेवर बहिष्कार टाकण्यात आल्याचे वृत्त खोटे असल्याचेही त्यांनी सांगितले.

राधाकृष्ण विखे पाटील स्वार्थी

काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील हे एक नंबरचे लबाड आणि स्वार्थी आहेत. रिफायनरी प्रकल्प म्हणजे सेना-भाजप यांची मॅच फिक्सिंग असल्याचा जावई शोध त्यांनी लावला आहे. त्यांची राजकीय कारर्किदच फिक्सिंगमध्येच गेली आहे. काँग्रेसच्या काळात झालेले गैरव्यवहार दाबण्यासाठीच त्यांची भाजपशी झालेली फिक्सिंग सर्वांना माहित आहे. त्यांनी आपले काळे मांजर आडवे आणू नये, असा उपरोधिक टोला विनायक राऊत यांनी हाणला.

मुख्यमंत्री दिल्लीचे लाचार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे दिल्लीकर्त्यांचे लाचार झाले आहेत. दिल्लीतील नेत्यांचे ते लाचार झाल्याने जनतेला दिलेल्या वचनांचा त्यांना विसर पडला आहे. शिवसेना सत्तेत राहूनही सरकारव अंकुश ठेवू शकते हे दाखवून देण्यासाठीच शिवसेना अजून सत्तेत असल्याचे विनायक राऊत म्हणाले.

Web Title: Uddhav Thackeray will make important announcement regarding Nanar refinery - Vinayak Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.