ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 28 - एमआयडीसीमधील सनफार्मा या कंपनीत लिफ्टसाठी खोदकाम करताना केमिकल गळतीमुळे झालेल्या स्फोटात कंपनीतील दोन कामगारांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर दोन कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
 
सनफार्मा या कंपनीत लिफ्ट तयार करण्यासाठी कंपनीच्या आवारात खोदकाम सुरू होते. जमिनीत मोठा खड्डा घेण्यात आला होता. या खड्ड्यात कामगार काम करीत असताना केमिकलची गळती झाली. याच वेळी जेसीबीने काम सुरू असल्याने खड्ड्यात स्पार्किंग झाले व त्यातून आगीचे लोळ उसळले. 
 
त्यात काम करीत असणारे कामगार काशिनाथ साळवे व सुभाष आल्हाट यांचा जागेवरच होरपळून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. अन्य दोन कामगार या अपघातात भाजले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुर्घटनेनंतर कंपनी परिसरात मोठी गर्दी झाली. 
 
तसेच तणावपूर्ण परिस्थितीमुळे आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधींनी कंपनीकडे धाव घेतली. घटनेचा पंचनामा पोलिसांकडून सुरू असून दुपारी तीनपर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती.