ऑनलाइन लोकमत
उल्हासनगर, दि. 20 -  उल्हासनगर येथे एका वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत वडपाव विक्रेता जखमी झाला असून त्याला सेंट्रल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील देवानंद फोटो स्टुडिओसमोर मुंबई महालक्ष्मी वडापावचं दुकान आहे. याच दुकानासमोर सोमवारपासून (20 मार्च) आणखी एक व्यक्ती वडापावची गाडी सुरू करणार होता.
त्याला महालक्ष्मी वडापाव दुकान मालकाने विरोध केला. यादरम्यान, दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात समोरच्या व्यक्तीने महालक्ष्मी वडापाव दुकानात शिरुन दुकानदाराला जिवंत जाळले. यात तो 90 टक्के भाजला असून त्याला सेंट्रल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक चौकशी सुरू आहे.