आदिवासी महिलेचे क्रांतिकारी पाऊल, मोडली मतदान बहिष्काराची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 07:07 PM2019-04-30T19:07:13+5:302019-04-30T19:08:47+5:30

कैनाड गृप ग्रामपंचायतीचे विभाजन करुन कोसबाड गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात यावी ही अनेकवर्षांपूर्वीची मागणी आहे. मात्र ती मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ येथील मतदारांकडून आतापर्यंतच्या निवडणुकांवर सातत्याने बहीष्कार टाकण्यात येत होता.

Tribal woman's revolutionary step, breaks tradition of voting boycott | आदिवासी महिलेचे क्रांतिकारी पाऊल, मोडली मतदान बहिष्काराची परंपरा

आदिवासी महिलेचे क्रांतिकारी पाऊल, मोडली मतदान बहिष्काराची परंपरा

Next

- अनिरुद्ध पाटील 

डहाणू/बोर्डी  -  डहाणू विधानसभा मतदारसंघातील कैनाड गृप ग्रामपंचायतीचे विभाजन करुन  कोसबाड गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात यावी ही अनेकवर्षांपूर्वीची मागणी आहे. मात्र ती मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ येथील मतदारांकडून आतापर्यंतच्या निवडणुकांवर सातत्याने बहीष्कार टाकला आहे. दरम्यान ही परंपरा कैनाड येथील चंदा विक्रम घोरखाना य़ा महीलेने सोमवार, 29 एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावून मोडीत काढली. 

   सतराव्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या दिवशी कोसबाड गावाने पुर्णपणे निवडणुकीवर बहीष्कार टाकला होता. या आदिवासी बहुल गावात सुमारे पाचहजार मतदार आहेत. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कोसबाड बुथवर  मतदान यंत्राचे एकही बटन दाबले गेले नव्हते. त्यामुळे यावेळीही निवडणूक कर्मचाऱ्यांना रिकाम्या यंत्राने माघारी फिरण्याची वेळ येणार होती. मात्र अचानक चंदा विक्रम घोरखाना या महीलेचे पाऊल मतदान केंद्राच्या आवारात पडताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर तेथे तैनात निवडणूक कर्मचाऱ्यांची नजर तिच्या प्रत्येक हालचालींवर खिळली गेली. पुढे काय घडणार यामुळे सर्वांच्या छातीत धडधड सुरू असताना,  तिने उंबरठा ओलांडून मतदान केंद्रात प्रवेश करून मतदानाकरिता आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर काही सेकंदातच मतदान झाल्याचा आवाज आला आणि  त्यासह या केंद्रात एका मतदानाची नोंद झाली. अनेक वर्षांपासून निवडणुकीवर बहीष्काराची परंपरा त्यासह मोडीत काढत चंदाने विक्रम साधला. 

 एखाद्या महिला प्रधान चित्रपटाला शोभावी अशी ही कथा प्रत्यक्षात घडली असून त्या तरुण आदिवासी महिलेचे सर्वचस्तरातून कौतुक होत आहे. या केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांचाही हा एक प्रकारचा विजय आहे. मात्र यापुढे सत्तेवर येणाऱ्या शासनाची खरी कसोटी असून चंदाने लोकशाहीवर दाखवलेला विश्वास दृढ करण्यासाठी या आदिवासी नागरिकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने विचार व्हायला हवा. अन्यथा गावाचा विरोध पत्करून तिने घेतला हा निर्णय मातीमोल ठरेल.

दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीचा अपवाद वगळता मागील लोकसभा,विधानसभा,जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकीत मतदानावरील बहिष्कार कायम होता. यावेळीही तो कायम राहिला असला, तरी चंदा विक्रम गोरखना या महीलेने मतदान केल्याने हा अपवाद ठरला आहे. 

Web Title: Tribal woman's revolutionary step, breaks tradition of voting boycott

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.