वन्यप्राण्यांच्या उपचाराकरिता बावधन येथे " ट्राझिट ट्रीटमेंट सेंटर" 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 06:00 AM2019-03-02T06:00:00+5:302019-03-02T06:00:04+5:30

अन्नाच्या शोधार्थ हिंस्त्र वन्यप्राणी आपला अधिवास सोडून मानवी वस्त्यामध्ये येत आहेत. याचे गंभीर परिणाम होत असून यामुळे प्राण्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे.

For the treatment of wild animals, "Trazint Treatment Center" | वन्यप्राण्यांच्या उपचाराकरिता बावधन येथे " ट्राझिट ट्रीटमेंट सेंटर" 

वन्यप्राण्यांच्या उपचाराकरिता बावधन येथे " ट्राझिट ट्रीटमेंट सेंटर" 

Next
ठळक मुद्देपुणे वनविभागाचा पुढाकार :  बावधन येथील 22 एकर क्षेत्रावर उभारणार उपचार केंद्रउपचार होत असलेल्या केंद्रामध्ये वन्यप्राण्यांच्या जीवाचे संरक्षण होणे हा मुख्य उद्देश नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर या भागातील वन्यप्राण्यांकरिता हे केंद्र महत्वाचे ठरणार

- युगंधर ताजणे -
पुणे :  मानवाने वन्यप्राण्याच्या अधिवासात प्रमाणापेक्षा जास्त केलेला हस्तक्षेप आता त्याच्या जीवाला धोकादायक ठरताना दिसत आहे. यामुळेच अन्नाच्या शोधार्थ हिंस्त्र वन्यप्राणी आपला अधिवास सोडून मानवी वस्त्यामध्ये येत आहेत. याचे गंभीर परिणाम होत असून यामुळे प्राण्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे. अनेकदा जखमी, अपंग अवस्थेत आढळणा-या या प्राण्यांकरिता पुणेवनविभागाच्यावतीने मुळशी तालुक्यातील  बावधन येथील 22 एकर क्षेत्रावर ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (वन्यप्राणी उपचार केंद्र) सुरु करण्यात येणार आहे. 
  पुणे वनविभागात जखमी अपंग व अनाथ अवस्थेत आढळणा-या  वन्यप्राण्यांना दाखल करुन त्यांच्यावर औषधोपचार करण्याकरिता सध्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्राणी बचाव केंद्र, निसर्ग कवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय, चिंचवड व माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र , जुन्नर सोडून अन्य ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकरिता पुणे हे मध्यवर्ती ठिकाण आहे.  याठिकाणी वन्यप्राणी उपचार केंद्र स्थापन करण्याकरिता निवडण्यात आलेल्या क्षेत्राची उपलब्धता, पाण्याची मुबलकता यांचा प्राधान्यक्रमाने विचार करण्यात आला आहे. तसेच या क्षेत्रामध्ये येण्या-जाण्याकरिता असणारी सुलभता, मार्गदर्शनाकरिता संबंधित क्षेत्रातील व्यक्तीची उपलब्धता, दळणवळणाच्या सुविधा यांचा विचार केला जाणार आहे. नव्याने तयार करण्यात येणा-या वन्यप्राणी उपचार केंद्रामध्ये यासर्व बाबींची पुर्तता करण्यासंबंधीचा प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे. वन्यप्राणी संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने ठोस उपाययोजना करण्यात येत असल्याने वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाढती जनसंख्या, जमिनीचा वापर करण्याची बदललेली पध्दती, यामुळे वन्यप्राण्यांना वनक्षेत्र अपुरे पडत असून ते मानवी वस्तीत त्यांचा वावर वाढल्याने अपघाताने ते जखमी होण्याचा धोका अधिक आहे. याशिवाय त्या प्राण्यांची पिल्ले अनाथ अवस्थेत सापडण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 

* वन्यप्राण्यांचे संरक्षण होणे हा मुख्य उद्देश 
मानवाचा वन्यप्राण्यांच्या हक्काच्या क्षेत्रात वाढलेला हस्तक्षेप सर्वांनाच विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे. वन्यप्राण्यांच्या उपचाराकरिता होत असलेल्या केंद्रामध्ये वन्यप्राण्यांच्या जीवाचे संरक्षण होणे हा मुख्य उद्देश आहे. नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर या भागातील वन्यप्राण्यांकरिता हे केंद्र महत्वाचे ठरणार आहे. त्याचा त्यांना फायदा होईल. काम पूर्णत्वास गेल्यानंतर त्यात करण्यात येणा-या बदलांचे स्वरुप स्पष्ट होईल.

- श्रीलक्ष्मी ए (उपवनसंरक्षक, पुणे विभाग) 

*  गेल्या काही वर्षांमध्ये सिंचनाच्या सोयींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने बागायती पिकांमध्ये पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. याशिवाय शेतीच्या जवळपास वस्ती असल्याने पाळीव प्राण्यांच्या स्वरुपात बिबट्यास सुलभ रीतीने भक्ष्य उपलब्ध होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढला असून त्याचे पर्यावसन मानवी - वन्यप्राणी संघर्षात होत आहे. 

* कसे असेल हे  उपचार केंद्र  
- या प्रकल्याचा एकूण खर्च ४७००. ४३ लक्ष  इतका असून तो २०१८-१९ व २०१९- २० या आर्थिक वर्षामध्ये टप्याटप्याने शासनाकडून देण्यात येणार आहे
- उपचार केंद्रात वन्यप्राण्यांना विहीत कालावधीकरिता उपचारार्थ ठेवण्यात येणार असून ते नागरिकांना प्रदर्शनाकरिता खुले करता येणार नाही.
-  वन्यप्राणी उपचार केंद्राचे पायाभुत सुविधा स्थापित केल्यानंतर सुयोग्य यंत्रणेमार्फत योग्य प्रणालीचा वापर करुन उपचार केंद्राचे दैनंदिन प्रशासन व्यवस्थापन करण्यात येणार आहे. 
ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर स्थापित करण्याकरिता ज्या कामांना वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत मंजुरीची आवश्यकता लागेल अशी कामे केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालय यांच्या मान्यतेच्या अधिन राहून राबविण्यात येणार आहे. 

Web Title: For the treatment of wild animals, "Trazint Treatment Center"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.