तिसऱ्या टप्प्यात राज्यात ६१ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 06:30 AM2019-04-24T06:30:34+5:302019-04-24T06:30:53+5:30

‘ईव्हीएम’ बिघाडीच्या ६०० वर तक्रारी; ३२ गावांचा मतदानावर बहिष्कार

In the third phase, 61 percent voting in the state | तिसऱ्या टप्प्यात राज्यात ६१ टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यात राज्यात ६१ टक्के मतदान

googlenewsNext

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघांत मंगळवारी संध्याकाळी सहापर्यंत सरासरी ६१.३० टक्के शांततेत मतदान झाल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. उन्हाचा कडाका असतानाही पश्चिम महाराष्ट्रात उत्साहात मतदान झाले.

औरंगाबाद, रायगड, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा व रत्नागिरी वगळता इतर ६ ठिकाणी मतदानाची टक्केवारी गेल्या वेळपेक्षा बरीच घसरली. सर्वाधिक कमी मतदान पुण्यात ५२ टक्के झाले. ईव्हीएम बिघाडीच्या ६०० वर तक्रारी आल्या. अहमदनगरमध्ये सर्वाधिक ५०० तर कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात ७२ ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याने मतदानप्रक्रिया काही काळ विस्कळीत झाली. औरंगाबाद, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, मराठवाडा आणि रत्नागिरी जिल्ह्यांतही यंत्र बिघाडीच्या घटना घडल्या. त्यामुळे सहा वाजल्यानंतरही अनेक ठिकाणी मतदार रांगेमध्ये मतदानासाठी ताटकळत उभे होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (जालना), केंद्रीय मंत्री अनंत गीते व माजी मंत्री सुनील तटकरे (रायगड), अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट (पुणे), विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय (अहमदनगर), माजी मंत्री एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे (रावेर), राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (बारामती), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी (हातकणंगले) यांच्यासह २४९ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद झाले.

पुण्यात अधिकारी ताब्यात
पुण्यातील एका मतदान केंद्रातील अधिकारीच मतदारांना भाजपला मते द्या, असे सांगत असताना आढळून आले. काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या तक्रारीनंतर त्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

जळगावात पैसे वाटणारा भाजप कार्यकर्ता ताब्यात
जळगावातील रामेश्वर कॉलनीत पैसेवाटप करताना जामनेर येथील भाजप कार्यकर्ता जीतेंद्र वामनराव दलाल याला पकडून मारहाण करण्यात आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अमळनेरला आचारसंहिता भंगाचे सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. धरणगावसह तीन ठिकाणी मॉकपोलचे ५० मतदान रद्द करण्यात आले नसल्याचे सायंकाळी लक्षात आले.

कोल्हापुरात २९ गावांत बहिष्कार
कोल्हापूरमध्ये धामणी मध्यम प्रकल्पाचे काम अर्धवट ठेवल्याच्या निषेधार्थ राधानगरी तालुक्यातील १६ आणि पन्हाळा तालुक्यातील ११ गावांनी मतदानावर पूर्ण बहिष्कार टाकला. पाचकटेवाडी (ता. करवीर) येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी मतदान केले नाही. हातकणंगले मतदारसंघांतील वाघोशी (ता. शाहूवाडी) धनगरवाड्यावरील ३० मतदारांनी विकासकामे झाली नाहीत म्हणून बहिष्कार टाकला.

औरंगाबादला अनेक नावे ‘डिलिट’
पिंप्रीराजा येथील सुमारे चारशे मतदारांच्या नावावर डिलिट शिक्का मारण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. औरंगाबाद तालुक्यातील लाडगावकारांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार कायम ठेवला.

मतदान यंत्र फोडण्याचा प्रयत्न
ईव्हीएम मशिनला सातत्याने विरोध करणारे जालिंदर चोभे यांनी मंगळवारी दुपारी बाबुर्डी बेंद येथील मतदान केंद्रात ईव्हीएम फोडण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

यंत्रे का बंद पडली? : नादुरुस्त यंत्रेच दुरुस्त करून निवडणूक आयोगाने कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांत पाठविली; त्यामुळे यंत्रे बंद पडण्याचे प्रमाण जास्त राहिले, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली.

 

Web Title: In the third phase, 61 percent voting in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.