टाटा हे जसे विश्वासाचे तसेच चंद्रपूर हे विकासाचे नाव व्हावे- ना.सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 09:28 PM2017-10-05T21:28:29+5:302017-10-05T21:28:40+5:30

राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विविध आघाड्यांवर विकासकामे होत असताना विश्वासाचे नाव म्हणून पर्यायी शब्द बनलेल्या टाटा ट्रस्टने देखील या जिल्ह्यावर विश्वास व्यक्त केला आहे. आज टाटा ट्रस्टच्या माध्यमातून तीन महत्त्वाच्या करारातून चंद्रपूरच्या विकासाला चालना मिळत आहे.

Tata should be the name of development as well as the development of Chandrapur - no. Sudhir Mungantiwar | टाटा हे जसे विश्वासाचे तसेच चंद्रपूर हे विकासाचे नाव व्हावे- ना.सुधीर मुनगंटीवार

टाटा हे जसे विश्वासाचे तसेच चंद्रपूर हे विकासाचे नाव व्हावे- ना.सुधीर मुनगंटीवार

Next

चंद्रपूर- राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विविध आघाड्यांवर विकासकामे होत असताना विश्वासाचे नाव म्हणून पर्यायी शब्द बनलेल्या टाटा ट्रस्टने देखील या जिल्ह्यावर विश्वास व्यक्त केला आहे. आज टाटा ट्रस्टच्या माध्यमातून तीन महत्त्वाच्या करारातून चंद्रपूरच्या विकासाला चालना मिळत आहे. त्‍यामुळे या विकास वाटेत जिल्ह्यातील प्रत्येकाने खारीचा वाटा उचलत वाटेकरी व्हावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.

चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहामध्ये जिल्ह्याच्या विकासाला चालना देणा-या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व टाटा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी पालकमंत्री फिरत्या संगणक प्रशिक्षण प्रयोग शाळेचे उद्घाटन केले. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय लघु भूधारक कुक्कुट उत्पादक महासंघाच्या माध्यमातून एक हजार कुटुंबाना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या संदर्भात राज्य शासन व टाटा ट्रस्ट यांच्या सोबत आज सामंजस्य करार त्यांच्या समक्ष करण्यात आला. बालकांच्या लैगिंग शोषणाला प्रतिबंध करणा-या पॉस्को कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी या कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्याभरातील नागरिकांना प्रातिनिधिक शपथ दिली.

यावेळी टाटा ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी आर.वेंकटरामन, आमदार नानाजी शामकुळे, आमदार ॲड. संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, नियोजन विभागाचे उपसचिव नागनाथ भोगे, बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे संचालक अमोल गोजे, राष्ट्रीय लघू भुधारक कुक्कुट पालन महासंघाचे अविनाश परांजपे, टाटा ट्रस्टचे अविनाश देशपांडे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, सभापती गोदावरी केंद्रे, ब्रीजभूषण पाझारे, अर्चना जिवतोडे, संतोष तंगडपल्लीवार मंचावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाचे प्रतिनिधीही उपस्थित होते. कार्यक्रमानंतर जिल्हाभरात शाळा शाळांमध्ये फिरुन मुलांना संगणक साक्षर बनविणा-या दहा बसेसचे लोकार्पण सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या बसमध्ये विद्यार्थ्यांना संगणकासोबत बसण्याची सुविधा असून बसमध्येच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तत्पूर्वी या विविधांगी कार्यक्रमाच्या समारोपीय भाषणात सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हयात टाटा ट्रस्टच्या मदतीने सुरु झालेल्या विविध उपक्रमांसाठी ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा व टाटा ट्रस्टचे आभार मानले. जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या 1585 शाळांपैकी 571 शाळा ईलर्निग शाळा झालेल्या आहेत. तंत्रस्नेही शिक्षक मुलांना प्रशिक्षण देत आहेत. आता टाटा ट्रस्टच्या मदतीने बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या वतीने संगणकबाबतचे अधिकचे शिक्षण या मुलांना मिळणार आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षकांसोबतच तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले. टाटा ट्रस्टच्यावतीने शासकीय यंत्रणा व सामान्य जनता यांच्यामध्ये योजनांच्या अंमलबजावणीबाबतचे मूल्यमापन केले जात आहे. गावागावामध्ये सूक्ष्मनियोजनातून योजना पोहचवण्याची आखणी केली जात आहे. याचा जिल्हयाच्या विकासासाठी येणा-या काळात फायदा होणार आहे. यावेळी त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली या जिल्हयातील सर्व नागरिकांना पुढील दिड वर्षात 100 टक्के गॅसचा पुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा केली. देशातील पहिला प्रयोग असणा-या ह्यहॅलो चांदाह्ण या पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेची राज्यभर चर्चा असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हयातील 58 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्फत जिल्हयामध्ये उत्तम आरोग्‍य देण्याचे आपला प्रयत्न असून याबाबतही नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयामध्ये मदर डेअरी मार्फत दुग्ध व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवल्या गेल्याचे सांगून त्यांनी या धवलक्रांतीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून जेएनपीटीकडून दिड कोटी रुपयांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्हयात सुरुवात होत असल्याचे त्यांनी सांगितले. बांबू प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत जिल्हयामध्ये विविध योजना सुरु करण्याचे सूतोवाच आपण अनेकवेळा केले. टाटा ट्रस्टमार्फत या प्रशिक्षण केंद्राची जागतिक दर्जाची इमारत उभी राहत आहे. आता याच केंद्राच्या उपक्रमाचा भाग म्हणून पोंभूर्णा तालुक्यात टूथपीक बनविण्याचा कारखाना उभा राहत असून येथील टूथपीक तैवानमध्ये निर्यात होणार आहे. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत शेतक-याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आपल्या संकल्पासाठी एकीकडे मोठया प्रमाणात कृषी विभागात सुधारणा घडवून आणने सुरु केले असून जिल्हयामध्ये विविध उपसासिंचन योजना, पुनर्जीवित करून शेतीचे उत्पन्न वाढविणे सुरु आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचा सर्वाधिक लाभ चंद्रपूर जिल्हयाला होणार असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला. जिल्हयातील एक हजार कुटुंबांना कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण देवून त्यांना थेट विक्री व्यवस्थेशी जोडण्याचा करार आज आम्ही या ठिकाणी केला असून या माध्यमातून आर्थिक विकासाचे नवे पर्व जिल्हयात सुरु होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या विविध उपक्रमामध्ये प्रत्येकाने आपला वाटा उचलावा व मलाही काही दयायचे आहे. या भावनेतून पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

यावेळी टाटा ट्रस्टचे विश्वस्थ आर.वेंकटरामनन यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या जिद्द व चिकाटीचे कौतूक केले. टाटा ट्रस्टतर्फे विविध सामाजिक उपक्रमाला सहकार्य केले जाते. तथापि विदर्भातील नागपूरमध्ये काही उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न होता. मात्र सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने टाटा ट्रस्टने चंद्रपूर जिल्हयाची विविध उपक्रमासाठी निवड केली आहे. तथापि सुधीर मुनगंटीवार यांच्या कामाच्या गतीने आम्हीही प्रभावीत झालो असून पालकमंत्री, जिल्‍हाधिकारी व जिल्हयातील सर्व यंत्रणांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे या ठिकाणी काम करण्याचा टाटा ट्रस्टला आनंद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी टाटा ट्रस्टने हा जिल्हा दत्तक घ्यावा, असे आवाहन केले. आदिवासी बहुल असणा-या या जिल्हयातील शेवटच्या नागरिकाला सर्वसोई सुविधा मिळाव्यात. यासाठी प्रशासन झटत असून टाटा ट्रस्टचे पाठबळ आमच्या कामाची गती वाढवत असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी यावेळी उपस्थित शिक्षकांचे आभार मानतांना त्यांच्या प्रयत्नामुळे जिल्हा ईलर्निंग व शैक्षणिक उपक्रमात राज्याचे नेतृत्व करीत असल्याचे समाधान व्यक्त केले. येणा-या काळात ईलर्निगचा आदर्श जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आमदार नाना शामकुळे यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे टाटा ट्रस्टसोबत दीर्घकाळ सामजंस्य टिकेल. मुनगंटीवार यांच्यामुळे रोजगारयुक्त जिल्हा हे स्वप्न पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार ॲड.संजय धोटे यांनी जिवती आणि गोंडपिपरी सारख्या दूर्गम तालुक्याचा सुधीर मुनगंटीवार यांनी ईलर्निंगच्या माध्यमातून जगाशी संपर्क वाढविल्याबद्दल आभार व्यक्त केले. जिल्हयातील अविकसित तालुक्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना मोठया प्रमाणात मिळाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तर संचालन प्रशांत आर्वे यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनासोबत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, राम गारकर व अन्य अधिकारी प्रयत्नशील होते. जिल्हयातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संगणक साक्षरतेचे दिलेले प्रात्यक्षिक यावेळी मान्यवरांनाही आश्चर्यचकीत करुन गेले.

Web Title: Tata should be the name of development as well as the development of Chandrapur - no. Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.