‘वंदे मातरम्’ला विरोध करणा-यांचा मताधिकार काढून घ्या - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 07:37 AM2017-08-21T07:37:10+5:302017-08-21T10:54:54+5:30

'वंदे मातरम्'विरोध हा देशविरोधच मानून तसे करणाऱ्यांचा मताधिकार काढून घेणे हाच एक उत्तम पर्याय आहे, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मांडली आहे.

Take the franchise of opponents to Vande Mataram - Uddhav Thackeray | ‘वंदे मातरम्’ला विरोध करणा-यांचा मताधिकार काढून घ्या - उद्धव ठाकरे 

‘वंदे मातरम्’ला विरोध करणा-यांचा मताधिकार काढून घ्या - उद्धव ठाकरे 

Next

मुंबई, दि.21 - 'वंदे मातरम्'विरोध हा देशविरोधच मानून तसे करणाऱ्यांचा मताधिकार काढून घेणे हाच एक उत्तम पर्याय आहे, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मांडली आहे.  औरंगाबाद महापालिकेत 'वंदे मातरम्'वरुन झालेल्या गोंधळावर टीकास्त्र सोडत उद्धव यांनी ही भूमिका मांडली आहे.    ‘वंदे मातरम्’च्या विरोधकांना वठणीवर आणण्यासाठी कठोर धोरण अवलंबवावे लागेल, असेही ते म्हणालेत. औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (19 ऑगस्ट) वंदे मातरम् म्हणण्यावरुन राडा झाला होता. वंदे मातरम् सुरू असताना एमआयएम व काँग्रेसचे नगरसेवक बसूनच होते. यावरुन शिवसेना-भाजपाचे नगरसेवक आक्रमक झाले होते. दरम्यान या प्रकरणी एमआयएम-काँग्रेसच्या मिळून तीन नगरसेवकांचे एका दिवसासाठी निलंबनही करण्यात आले होते.

काय आहे आजचे सामना संपादकीय ?
‘वंदे मातरम्’वरून हिंदुस्थानात रोजच राडा व्हावा हे आजच्या राज्यकर्त्यांना लांच्छन आहे. मुंबई महापालिकेनंतर हे लोक संभाजीनगरात पोहोचले आहेत. ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगान सुरू असताना ‘ओवेसी’च्या ‘एमआयएम’चे नगरसेवक बसून राहिले. शेख जफर, सय्यद मतीन, शेख समीना असे हे तीन नगरसेवक ‘वंदे मातरम्’चा अवमान करीत असताना सभागृहातील शिवसेना नगरसेवकांच्या संतापाचा स्फोट झाला व त्यांनी या ‘वंदे मातरम्’ विरोधकांना झोडपून काढले. सभागृहात अशा हाणामाऱ्या होऊ नयेत, तिथे शहराच्या व लोकांच्या प्रश्नांवर चर्चा घडावी या मतांचे आम्ही असलो तरी ‘वंदे मातरम्’सारख्या राष्ट्रीय प्रश्नांवर काही नतद्रष्टांना अवदसा सुचते त्याला शिवसेना काय करणार? ‘वंदे मातरम्’ हा मुसलमान समाजासाठी म्हणे ‘धार्मिक’ विषय बनला आहे. मातृभूमीला वंदन हे त्यांच्या इस्लाममध्ये बसत नाही. अल्ला सोडून हे लोक दुसऱ्या कुणापुढे झुकत नाहीत, असे त्यांच्या डोक्यात ठासून भरले आहे. या अनाडी अंधश्रद्धेतून बाहेर पडल्याशिवाय मुसलमानांचा विकास होणार नाही. मुसलमानांचे काही ‘पावलीकम’ पुढारी आजही त्याच अंधश्रद्धेच्या चिखलात त्या समाजाला ढकलत असतील तर हे लोक इस्लामचे मारेकरी आहेत व

अशा लोकांमुळेच इस्लाम खतऱ्यात
आला आहे, त्यांचे डोके सडले आहे व रक्त नासले आहे. ज्या देशात आपण राहतो, खातो, पितो, श्वास घेतो, ज्या मातीत जन्म घेतो त्या मातीशी इमान राखण्यात कसला आलाय इस्लामद्रोह? नमाज पढताना डोके जमिनीवर ठेवता ना? मग मातृभूमीपुढे झुकणार नसल्याची भाषा का सुरू आहे? ‘‘वंदे मातरम्’ बोलणार नाही, देशातून धक्के मारून बाहेर काढले तरी चालेल’’ ही मस्तवाल भाषा बोलणारे लोकच मुसलमानांचे वैरी बनले आहेत. ज्या दिवशी समस्त मुसलमान समाज या टिनपाट पुढाऱ्यांचा त्याग करून मोकळा श्वास घेईल त्या दिवशी त्यांच्या उत्कर्षाचे दरवाजे खऱ्या अर्थाने उघडले जातील. संभाजीनगरात आजही औरंगजेबाची पिलावळ वळवळत असते व धर्मांधतेचे फूत्कार सोडत असते. त्यांना वेळीच ठेचण्याची जबाबदारी सरकारची आहे. संभाजीनगर महापालिकेतील या पिलावळीला ठेचण्याचे काम शिवसेनेच्या नगरसेवकांनी केले. या राष्ट्रकार्यास तेथील भाजपच्या नगरसेवकांनीही हातभार लावला हे चांगलेच झाले. आम्ही त्यासाठी त्यांचे कौतुकच करतो. मात्र ‘वंदे मातरम्’च्या विरोधकांना वठणीवर आणण्यासाठी आता याहीपेक्षा कठोर धोरण अवलंबवावे लागेल. कथित गोरक्षकांच्या बाबतीत जी भूमिका पंतप्रधान मोदी यांनी घेतली आहे

तशीच कठोर भूमिका
‘वंदे मातरम्’ला विरोध करून धर्मांध फूत्कार सोडणाऱ्यांविरुद्ध घ्यावी लागणार आहे. सध्या गोरक्षकांनी देशात उच्छाद मांडला आहे. पंतप्रधान मोदी यांनी या गोरक्षकांची चांगलीच चंपी केली आहे, पण ‘वंदे मातरम्’वरून सध्या होत असलेल्या राडय़ांबाबतही तोंडे बंद ठेवता येणार नाहीत. ‘‘गोरक्षकांची हिंसा खपवून घेतली जाणार नाही,’’ असे बजावणाऱ्यांनी ‘‘वंदे मातरम्’चा अवमानही सहन करणार नाही, ‘वंदे मातरम्’ म्हणावेच लागेल’’ असे ठणकावले पाहिजे. मात्र गोरक्षकांच्या हिंसेइतकाच ‘वंदे मातरम्’ विरोध हादेखील चिंतेचा विषय आहे असे भाजप राज्यकर्त्यांना वाटत नाही. ‘वंदे मातरम्’बाबत कठोर कायदा करा असे आम्हाला सांगावे लागते हेसुद्धा दुर्दैवच! राष्ट्रगान कायद्याने सक्तीचे करा असे ज्या देशात सांगावे लागते त्या देशाने स्वतःचा खड्डा स्वतःच खणायला सुरुवात केली आहे असेच म्हणावे लागेल. ‘वंदे मातरम्’विरोध हा देशविरोधच मानून तसे करणाऱ्यांचा मताधिकार काढून घेणे हाच एक उत्तम पर्याय आहे. हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून शिवसेनाप्रमुखांचा मताधिकार काढून घेणारी येथील न्यायालये व हा देश आहे. जर हिंदुत्वाचा प्रचार हा गुन्हा तर मग ‘वंदे मातरम्’ विरोध हा त्याच तोलामोलाचा, किंबहुना जास्तच गंभीर गुन्हा आहे. काढून घ्या त्यांचा मताधिकार. बोला, करताय हे धाडस?

Web Title: Take the franchise of opponents to Vande Mataram - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.