कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यात अचानक भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 06:04 AM2017-10-05T06:04:41+5:302017-10-05T06:05:14+5:30

राज्यात कोळशाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे बुधवारी आकस्मिक भारनियमन करावे लागले. त्यामुळे अनेक भागांतील वीज सकाळपासून गुल झाली होती.

Sudden load regulation in the state due to the shortage of coal | कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यात अचानक भारनियमन

कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यात अचानक भारनियमन

Next

रत्नागिरी/भुसावळ : राज्यात कोळशाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे बुधवारी आकस्मिक भारनियमन करावे लागले. त्यामुळे अनेक भागांतील वीज सकाळपासून गुल झाली होती. काही ठिकाणी चार ते सव्वासहा तासांपर्यंत भारनियमन करण्याची नामुश्की महावितरणवर ओढविली. राज्यात १७ हजार ४७० मेगावॅट विजेची मागणी असून, १५ हजार ७३ मेगावॅट पुरवठा महावितरणकडून करण्यात होत आहे. २ हजार ३९७ मेगावॅटचा तुटवडा झाल्याने आकस्मिक भारनियमन करावे लागले. बी, सी, डी, ई, एफ, जी (१), जी (२), जी (३) गटातील फिडरवर सकाळपासून भारनियमन करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. भुसावळजवळील दीपनगर वीजनिर्मिती केंद्राला रोज सहा रॅक कोळशाची गरज असताना केवळ चार रॅक कोळसा मिळत असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता आर. आर. बावस्कर यांनी ‘लोकमत’ला दिली. 

राज्यातून एकूण १७ हजार ४७० मेगावॅट विजेची मागणी होत असताना १५ हजार ७३ मेगावॅट विजेचा पुरवठा महावितरणकडून करण्यात येत आहे. २ हजार ३९७ मेगावॅट विजेचा तुटवडा जाणवत असल्यामुळे राज्यात आकस्मिक भारनियमन जाहीर करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील १४५ फिडरना भारनियमनाचा फटका बसला. रत्नागिरी जिल्'ातील फिडर्सचा समावेश ए ते डी ग्रुप मध्ये होतो. आकस्मिक भारनियमन झाल्यामुळे ग्राहकांची विजेअभावी गैरसोय झाली.

महावितरणला उपलब्ध झालेली वीज
महानिर्मिती कंपनी-४,७०० मेगावॅट
अदानी प्रकल्प- १७०० मेगावॅट
रतन इंडिया कंपनी -५००
केंद्रीय प्रकल्प -३,४००
जिंदाल प्रकल्प -३००
सीजीपीएल -५८०
एम्को- १००
पवन ऊर्जा -१०० ते २००
उरण गॅस प्रकल्प -३८०
कोयनासह जलविद्युत प्रकल्प -१००० ते १२००
अल्पकालीन कराराद्वारे खरेदी- ७००

गरज सहा रॅकची मिळतो चार रॅक कोळसा
भुसावळ (जि. जळगाव) : दीपनगर येथील वीजनिर्मिती केंद्राला सध्या कमी कोळसा मिळत आहे. या वीजनिर्मिती केंद्राला सध्या रोज सहा रॅक कोळशाची गरज असता चार रॅक कोळसा मिळत असल्याची माहिती मुख्य अभियंता आर.आर. बावस्कर यांनी ‘लोकमत’ला दिली.
दरम्यान, दीपनगर वीज केंद्रात सध्या ५०० मेगावॅट क्षमतेचे दोन संच कार्यान्वित आहेत. त्यातून ६०० मेगावॅट वीज निर्मिती सुरू आहे. अशा परिस्थितीतही दीपनगर वीज केंद्राकडे ३७ हजार टन कोळशाचा साठा आहे.
५०० मेगावॅटच्या दोन संचांसाठी रोज रेल्वेचे सहा रॅक भरून कोळसा लागतो. मात्र सध्या देशात व राज्यात कोळशाची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मागणीपेक्षा कमी कोळसा मिळत आहे, ही स्थिती फार दिवस राहणार नाही. यात लवकरच बदल होऊन पुरेसा कोळसा मिळेल, असा दावा त्यांनी केला. एका रॅकमध्ये ३६ मे.टन कोळसा येतो. एका रॅकला ५९ डबे असतात. आपल्याला चार रेक मिळतो, असे त्यांनी सांगितले.

मराठवाडा : औरंगाबाद, जालन्यात नऊ तासांपर्यंत भारनियमन
औरंगाबाद : विजेच्या तुटवड्याने महावितरणने बुधवारी तब्बल नऊ तासांपर्यंत लोडशेडिंग केल्याने परिमंडळातील औरंगाबाद आणि जालन्यातील नागरिकांना झटका बसला. परिमंडळातील ९५ टक्के म्हणजे २७७ फिडरची वीज गुल होती. यामध्ये औरंगाबादेतील ७३ फिडरवरील वसाहतींमध्ये सकाळपासूनच वीजपुरवठा खंडित झाला.
सप्टेंबरमध्ये सुरू झालेले भारनियमन नवरात्रीत कमी झाले होते. नागरिकांना थोडा दिलासा मिळत नाही तोच पुन्हा सुरू झाले. शहरातील विविध भागांत बुधवारी सकाळीच वीजपुरवठा बंद झाला. आॅक्टोबर हिटचा चांगलाच कडाका जाणवत आहे. त्यात भारनियमनामुळे घामाघूम होण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. व्यवसाय ठप्प झाल्याने व्यावसायिकांनी तीव्र रोष व्यक्त केला.
औरंगाबाद परिमंडळातील औरंगाबाद आणि जालन्यात २८७ फिडर आहेत. एकूूण ७ लाख ६० हजार वीज ग्राहक आहेत. औरंगाबाद शहरात ८३ फिडर असून, २ लाख ८२ हजार ग्राहक आहेत. औरंगाबाद आणि जालन्यातील २८७ फिडरपैकी केवळ १०, तर औरंगाबादेतील ८३ पैकी १० फिडरवर लोडशेडिंग झाले नाही. उर्वरित सर्व फिडरवर ९ तास १५ मिनिटांपर्यंत भारनियमन करण्यात आले.

अवघ्या २५ हजार ग्राहकांना दिलासा
एका फिडरवर जवळपास अडीच हजार वीजग्राहक आहेत. शहरातील १० फिडरवरील वीजपुरवठा सुरळीत राहिल्याने जवळपास २५ हजार ग्राहकांना दिलासा मिळाला; परंतु २ लाख ५७ हजार वीज ग्राहकांना भारनियमनाचा फटका बसला.

दिवाळीत पुरवठा सुरळीत
पाऊस चांगला पडल्याने शेतीचे पंप सुरू झाले आहेत. त्यामुळे विजेची तूट आहे. दिवाळीमध्ये उद्योग बंद असतात. त्यामुळे दिवाळीच्या तीन दिवसांत भारनियमन होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. ज्याप्रमाणे मोबाइलचे बिल वेळेवर भरले जाते, त्याचप्रमाणे विजेचे बिलही वेळेवर भरले पाहिजे, असे महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले.

विजेचा तुटवडा वाढला
१६ आणि १७ सप्टेंबर आणि २९ आणि ३० सप्टेंबर असे ४ दिवस वगळता शहरात सुरू असलेल्या भारनियमनादरम्यान १०० मेगावॅट विजेचा तुटवडा होता. तो आता २५ ते ३० मेगावॅटने वाढला आहे. त्यामुळे महावितरणने बुधवारी सकाळी ११ वाजेनंतर सी आणि बी गटातील फिडरवरही भारनियमन केले.

Web Title: Sudden load regulation in the state due to the shortage of coal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.