पुणे : अनावश्यक वापर होत असलेल्या १ हजार मेगावॅट विजेची बचत करण्याचे धोरण राज्य शासनाकडून आखण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 
पुण्यातील राजभवनामध्ये सौर उर्जेपासून १५ लाख युनिट वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्पाचे उदघाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री यांनी ही माहिती दिली. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री गिरीष बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, अमर साबळे, महापौर मुक्ता टिळक उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अपारंपारिक ऊर्जास्रोतातून वीज निर्मिती केल्यामुळे औष्णिक ऊर्जे निर्मितीतून होणारे प्रदूषण थांबविता येईल. अपारंपारिक ऊर्जेचा दर २५ वर्षे कायम राहतो, हा त्याचा मोठा फायदा आहे."
महाराष्ट्र सौरऊर्जेचा वापर करणारे सर्वात मोठे राज्य बनावे अशी इच्छा असल्याचे विद्यासागर राव यांनी सांगितले.