हरिश्चंद्रगडावरील 'पर्यटकां'नी केलेल्या कचऱ्यामुळे नव्या चर्चेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 12:02 PM2017-11-30T12:02:55+5:302017-11-30T12:36:15+5:30

कचऱ्याच्या या अतिरेकामुळे वनविभागाने हरिश्चंद्रगडावर राहण्यासाठी बंदी आणण्याच्या व स्थानिकांना तेथिल हॉटेल्स बंद करण्याच्या दिशेने पावले उचलायला सुरुवात केली आहे.

The start of the new discussion due to the trash caused by Harishchandragad | हरिश्चंद्रगडावरील 'पर्यटकां'नी केलेल्या कचऱ्यामुळे नव्या चर्चेला सुरुवात

हरिश्चंद्रगडावरील 'पर्यटकां'नी केलेल्या कचऱ्यामुळे नव्या चर्चेला सुरुवात

Next
ठळक मुद्देप्लास्टिकचा वापर खरंच आवश्यक आहे का ? गडकिल्ल्यांवर प्लास्टिक आणि दारुच्या बाटल्यांमुळे कचऱ्याची अत्यंत गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

मुंबई- शहरांमध्ये मनसोक्त कचरा फेकून झाला की बाहेरगावांमध्ये, प्रवासाला गेल्यावर इतस्ततः कचरा फेकण्याची वृत्ती बळावलेली दिसते. त्यातच गडकिल्ल्यांवर 'फिरायला' जाणाऱ्या लोकांनी कचऱ्याची नवी समस्या उभी केली आहे. किल्ल्यांवर केवळ खाण्यासाठी आणि दारु पिण्यासाठी जाणाऱ्यांनी सर्वच व्यवस्थांसमोर आव्हान उभे केले आहे. कचऱ्याच्या या अतिरेकामुळे वनविभागाने हरिश्चंद्रगडावर राहण्यासाठी बंदी आणण्याच्या व स्थानिकांना तेथिल हॉटेल्स बंद करण्याच्या दिशेने पावले उचलायला सुरुवात केली आहे.

हरिश्चंद्रगड असो वा सह्याद्रीमधील इतर गडकिल्ले आज वाहतुकीच्या खासगी व सार्वजनिक सेवांमुळे सर्वच मोठ्या शहरांतील लोकांना पोहोचण्यासाठी सोयीचे झाले आहेत. एका दिवसाचे किंवा मुक्कामाचे ट्रेक करुन परतण्याची सोय झाल्यामुळे साहजिकच इतिहासप्रेमी, गिर्यारोहकांच्या ऐवजी 'सहली'ला येणाऱ्या हौशी पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यांचे हे केवळ एका दिवसाचे थ्रील किल्ल्यांसाठी आणि पर्यावरणासाठी डोकेदुखीची बाब झाली आहे. दारुच्या बाटल्या फोडून जाणे, वेफर्स किंवा खाद्यपदार्थांच्या पिशव्या किंवा प्लास्टिकच्या पिशव्या यांमुळे कचऱ्याचे ढीग साठण्याची भीती निर्माण झाली तरीही लोकांच्या सवयींमध्ये काहीही बदल झाला नाही. साहजिकच आता वनविभागाला पाऊल उचलावे लागले आहे. गेले वर्षभर राज्यभरातील विविध किल्ल्यांवर गडकिल्ले संवर्धन समितीतर्फे स्वच्छता मोहीम राबवली होती. त्याला स्थानिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी भरपूर मदत केली होती. मात्र लोकांचा कचरा फेकण्याचा वेग पाहता अशा मोहिमेपेक्षा आता नव्या नियमांची आणि कायद्यांची भीती लोकांवर असण्याची गरज जास्त निर्माण झाल्याचे दिसते.

लोकांनी आपल्या सवयींमध्ये बदल करणे सर्वात जास्त महत्त्वाचे- तेजस गर्गे, संचालक, पुरातत्त्व आणि वस्तूसंग्रहालय विभाग
संरक्षित वास्तू, गड-किल्ले यांना भेट देणाऱ्या लोकांमध्ये दोन प्रकार आहेत. एक खरंच चांगल्या भावनेने प्रेरित होऊन, अभ्यासक म्हणून भेट देणारे तर दुसरे केवळ मौजमजा, कचरा करणारे. दुसऱ्या प्रकारच्या लोकांच्या वर्तनाला आवरणे हे खरचं अवघड होत चाललेले काम आहे. कचऱ्याची समस्या आवरण्यासाठी लोकांनी स्वतःच्या वर्तनात बदल करणे हा एकमेव उपाय आहे.  वर्ल्ड हेरिटेज विकच्या निमित्ताने आता शाळांमध्ये शिक्षणाचे कार्यक्रम घेतले जातात. मी किल्ले किंवा संरक्षित वास्तूंना भेट देताना तेथे कचरा करणार नाही, तेथे नाव लिहून येणार नाही किंवा त्या स्थळाचा अवमान होईल असे वर्तन करणार नाही अशी शपथ मुलांकडून घेतली जाते. अशा लोकशिक्षणाचा हळहळू उपयोग होईल अशी आशा आहे. लहान मुलांपासूनच या शिक्षणाची व संस्काराची सुरुवात केली पाहिजे. गडकिल्ल्यांवर आपलं नाव कोरुन येणं यात काहीही मोठेपणा नाही हे आधीपासूनच मुलांना शिकवायला सुरुवात केली तर त्याचा निश्चित फायदा होईल.

पर्यटनाला लागलेली बेशिस्त या परिस्थितीला कारणीभूत- ओंकार ओक, लेखक आणि गिर्यारोहक
खरं सांगायचं तर वनखात्याने हा निर्णय तडकाफडकी घेतला असं जरी वाटत असेल तरी त्याला गडावर आतापर्यंत निर्माण झालेली परिस्थिती कारणीभूत आहे. स्थानिकांकडून अनेकदा तसेच पर्यटकांच्या दबावामुळे थर्माकोल व प्लॅस्टिकचा वापर केला गेला. येणाऱ्या पर्यटकांनाही वारेमाप कचरा करून गडाचे रूप भीषण आणि विदारक बनवले आहे. स्थानिकांनी कितीही सफाई मोहिमा त्यांच्या पातळीवर केल्या तरी पर्यटनाला लागलेली बेशिस्त याला सर्वस्वी कारणीभूत आहे.  कळसूबाई हरिश्चंद्र अभयारण्याच्या अखत्यारीत गड येत असल्याने वन्यजीव कायद्यानुसार इथे कचरा करणे,गोंगाट करणे तसेच मद्यपान व धूम्रपानाला सक्त बंदी आहे व तेच प्रकार गडावर चालत असल्याने वनविभागाला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला. पण गडावरील हॉटेल्स बंद करणे हा यावरील उपाय नसून ती बंद झाल्यास गडाच्या परिसरात होणारा रोजगाराचा प्रवाह एकाएकी खुंटणार आहे. तसंच वनविभागाची ही योजना अंमलात आणण्यासाठी जे स्थानिक पाठबळ गरजेचं आहे ते यामुळे दुरावेल अशी भीती आहे. त्यामुळे सर्वांगीण शक्यता तपासून यातून सुवर्णमध्य निघावा व गडाला पुर्वीसारखे रूप प्राप्त व्हावे अशीच महाराष्ट्रातील गिर्यारोहकांची मनापासून इच्छा आहे.
 
'मला काय त्याचं'? ही वृत्ती सर्वांसाठी घातक- मकरंद केतकर, गिर्यारोहक आणि निसर्ग अभ्यासक
सर्व पर्यटक आणि बेशिस्त लोकांमध्ये मला काय त्याचं अशी नवी वृत्ती जोपासली आहे. मी कचरा करत असेन तर तो उचलण्याची किंवा तो गडावरुन खाली आणण्याची जबाबदारी माझी आहे हे सोयीस्कररित्या विसरलं जातं. असंवेदनशिलता आणि स्थळकाळाचं भान नसणं हे त्याच्यामागचं मूळ कारण आहे. पुर्वी आम्ही एकदा हरिश्चंद्रगडावर सफाई करण्याची मोहीम राबवली होती पण लोकांनी केलेल्या कचऱ्याकडे पाहिल्यावर ते आवाक्याच्या बाहेरचं काम असल्याचं लक्षात आलं होतं. माहुलीला तर शे-दिडशे बाटल्या घेऊन गड उतरता येणं शक्य नव्हतं म्हणून त्या नाइलाजाने वरतीच पुराव्या लागल्या होत्या. यावरुन लोक किती कचरा करत असावेत याचा अंदाज येईल. राजकीय दबावामुळे ही हॉटेल्स सुरु होतील पण तेव्हातरी कठोर नियमांचे पालन होईल याची काळजी घ्यायला हवी.

प्लास्टिकचा वापर सर्वांनीच टाळायला हवा- भास्कर बादड, हॉटेल कोकणकडा, हरिश्चंद्रगड
हरिश्चंद्रगडावर वनविभागाने घातलेल्या प्लास्टिक बंदीला ग्राह्य धरून मी यापुढे कोणत्याही गिर्यारोहकाला थर्माकोल किंवा प्लॅस्टिकच्या ताटात जेवण किंवा प्लास्टिकच्या ग्लास मध्ये चहा / कॉफी दिले जाणार नाही असं ठरवलं आहे. आमच्याकडे जेवायचं असेल तर गिर्यारोहकाने आपापले ताट, वाटी व चहा/कॉफी साठी कप आणणे गरजेचे आहे. हे साहित्य थर्माकोलचे न आणता स्टीलचे किंवा प्लॅस्टिकचे असावे आणि ते जाताना परत घेऊन जावे लागेल. आम्ही गडावर कोणत्याही प्रकारचे प्लास्टिकमधून विकले जाणारे पदार्थ जसे की बिसलेरी,गोळ्या,वेफर्स, बिस्कीटे तसेच सिगारेट वगैरे विकत नाही. प्रत्येक ट्रेक ग्रुपच्या लिडरने आपल्या प्रत्येक सदस्याला स्वतःचे  साहित्य आणण्याची सूचना द्यावी. आमच्याकडे यापुढे कोणत्याही प्रकारचे प्लास्टिकचे साहित्य उपलब्ध केले जाणार नाही असा मी निर्णय घेतला आहे. हॉटेल व्यावसायिक आणि गिर्यारोहक, पर्यटकांनी सर्वांनीच नियम पाळले तर आपण निसर्गाचा निर्भेळ आनंद घेऊ शकू.

Web Title: The start of the new discussion due to the trash caused by Harishchandragad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.