राजकारणातील ‘वसंत’ हरपला...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 11:18 PM2018-01-04T23:18:43+5:302018-01-04T23:56:29+5:30

राजकारण म्हटले की, हेवेदावे, आरोपप्रत्यारोप, वैरभाव आले. मात्र राजकारणात राहूनही सर्वांशी घट्ट मैत्री जपणाºया वसंत डावखरे यांनी बालपणापासूच टाकीचे घाव सोसले होते. गरीबी आणि दुष्काळाचे चटके सहन केल्यानंतर डावखरे कुटुंबाने पुण्याच्या शिरुर गावातून थेट ठाणे गाठले. ठाण्यात पालिकेत सत्तापालट केल्यानंतर अनेक निवडणुका त्यांनी लढवल्या; पण कुणाशीही वैर न करता ‘मैत्री’ विणून राजकारणातील ‘दोस्ती’ घट्ट केली. त्यांच्या जाण्याने राजकारणातील ‘वसंत’ खºया अर्थाने हरपल्याची भावना वेगवेगळ््या क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

'Spring' defeat in politics ... | राजकारणातील ‘वसंत’ हरपला...

राजकारणातील ‘वसंत’ हरपला...

Next

राजकारण म्हटले की, हेवेदावे, आरोपप्रत्यारोप, वैरभाव आले. मात्र राजकारणात राहूनही सर्वांशी घट्ट मैत्री जपणा-या वसंत डावखरे यांनी बालपणापासूच टाकीचे घाव सोसले होते. गरीबी आणि दुष्काळाचे चटके सहन केल्यानंतर डावखरे कुटुंबाने पुण्याच्या शिरुर गावातून थेट ठाणे गाठले. ठाण्यात पालिकेत सत्तापालट केल्यानंतर अनेक निवडणुका त्यांनी लढवल्या; पण कुणाशीही वैर न करता ‘मैत्री’ विणून राजकारणातील ‘दोस्ती’ घट्ट केली. त्यांच्या जाण्याने राजकारणातील ‘वसंत’ ख-या अर्थाने हरपल्याची भावना वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
शेतकरी कुटुंबात वाढलेल्या आणि आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यासाठीही संघर्ष कराव्या लागलेल्या वसंतरावांना देशभक्तीचे बाळकडू त्यांचे वडील शंकरराव यांच्याकडून मिळाले. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. ठाण्यात शिवसेनेची सत्ता असतांनाही भाजपाच्या काही नगरसेवकांशी मैत्रिचा हात पुढे करुन १९८७ मध्ये प्रथमच महापालिकेवर त्यांनी काँग्रेसची सत्ता प्रस्थापित केली होती. तरीही कै. आनंद दिघे आणि त्यांची राजकारणापलीकडची मैत्री नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय होती. राज्य विधानपरिषदेवर ते निवडून गेले. सलग तीन टर्म उपसभापतीपदही त्यांनी भुषविले.
माजी गृहमंत्री कै. बाळासाहेब देसाई यांचे बोट धरून सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे डावखरे यांनी राजकारणात प्रवेश केला. हिवरे गावच्या सरपंचपदापासून थेट विधानपरिषद उपसभापतीपदापर्यंतचा प्रवास या अभ्यासू कार्यकर्त्याने पूर्ण केला. कर्तृत्व, बुद्धीचातुर्य आणि मोठ्या लोकसंग्रहाच्या बळावर राजकारणात कसे यशस्वी होता येते, याचे ते वस्तुपाठ होते. आई सरुबाई आणि वडील शंकरराव या शेतकरी माता-पित्यांनी आपल्यावर समाजसेवा व परोपकाराचा संस्कार केल्याचे डावखरे आवर्जून सांगायचेय. त्यानंतर त्यांचे स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी ताम्हाणे यांच्याबरोबर जिव्हाळ्याचे संबंध होते. ताम्हाणे यांच्यासमवेत शंकरराव डावखरे यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. शंकररावांनी तत्कालीन ठाणे नगरपालिकेत मुकादमाची नोकरी पत्करली होती तर त्यांच्या आईने अशोक सिनेमाजवळ भाजीविक्रीचा व्यवसाय केला. थोरला भाऊ अनंत, मधले वसंत आणि धाकटा केशव, तर कमल (धनावडे) आणि निर्मला (लोखंडे) या दोन बहिणी अशी ही पाच भावंडे.
ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक तीनमध्ये डावखरे यांचे प्राथमिक शिक्षण झाले. सकाळी नौपाडा भागात घरोघरी वृत्तपत्रे टाकण्यापासून दूधाच्या बाटल्या पोहचविण्यापर्यंतची सर्व कामे त्यांनी केली. त्यातून मिळणारे पैसे साठवून शिक्षण घेतले. आईला हातभार लावण्यासाठी रोजची भाजीची पाटी आणणे आणि परत नेऊन ठेवणे, हाही त्यांचा नित्यक्रम होता.
पोटाकरिता काबाडकष्ट सुरू असले तरी वर्गात पहिल्या तीनमधील क्रमांक वसंतरावांनी सोडला नाही. त्यामुळेच शिक्षकांना त्यांच्याविषयी आपुलकी होती. हा कष्टाळू विद्यार्थी पुढे नक्की कुणीतरी मोठा माणूस होणार, अशी शिक्षकांना खात्री होती. अकरावीच्या परीक्षेत (आॅक्टोबरमध्ये झालेल्या) ते ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या शेतकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुण्याचा खर्च न परवडल्याने त्यांनी मुंबईच्या पोद्दार कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शालेय फीमध्ये पूर्ण सवलत मिळाल्यामुळेच शिक्षण पूर्ण करता आल्याचे ते आवर्जून सांगायचे.
महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेचे ते उपाध्यक्ष होते. १९७१ मध्ये ते वाणिज्य शाखेचे पदवीधर झाले. त्याचवेळी बाळासाहेब देसार्इंशी ओळख झाल्यानंतर त्यांच्याकडे वेगवेगळ्या कामानिमित्त येणे-जाणे वाढले. त्यांच्यातील हुशारी हेरून देसार्इंनी त्यांचे स्वीय सहायक म्हणून वसंतरावांची नियुक्ती केली. सुमारे १० ते १५ वर्षे त्यांनी निष्ठेने हे काम केले.
वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना देसाई विधानसभा अध्यक्ष झाले. त्यांच्याकडे स्वीय सहायक म्हणून काम करताना अनेक लोकप्रतिनिधींशी डावखरे यांची जवळीक झाली. यातूनच मोठा जनसंपर्क वाढला. वास्तव्य ठाण्यात असले तरी शिरुरच्या हिवरे ग्रामपंचायतीचे १९८० ते १९८५ या काळात ते बिनविरोध सरपंच होते. १९८६ साली ठाणे महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिली निवडणूक झाली. नौपाड्यातील प्रभाग क्रमांक ४७ मधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून वसंतराव निवडून आले. तेंव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ते भेटले. ‘तुला सर्व प्रकारची मदत मी आणि माझा पक्ष करेल,’ हा शिवसेनाप्रमुखांनी दिलेला शब्द अखेरपर्यंत पाळला. त्यांच्या आशीर्वादाचा कायम लाभ झाल्याचे डावखरे नेहमी सांगायचे.
त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण कधी करावे लागले नाही. अडचणीच्या वेळी सर्वांना मदत केल्यामुळेच आपल्या कारकिर्दीत त्यांनी मोठा लोकसंग्रह जमा केला होता. १९८६-८७ साली ते ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेता होते. शिवसेनेचे सतीश प्रधान त्यावेळी महापौर होते. शिवसेनेची सत्ता असतानाही भाजपाचे देवराम भोईर, सुभाष भोईर आणि गोवर्धन भगत यांच्याशी त्यांनी मैत्री केली. भाजपाच्या पाचपैकी तिघांनी डावखरेंना मदत केली. शिवसेना-भाजपा मिळून ३२ तर भाजपाच्या तीन मतांमुळे काँग्रेसचे संख्याबळही ३२ झाले. तेव्हा जनता पक्षाचे दशरथ पाटील यांचे ३३ वे मत मिळवून डावखरे महापौर झाले. १९८७ ते १९९३ पर्यंत महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती.
राज्य विधानपरिषदेवर १९९२ मध्ये ते निवडून गेले. त्यानंतर १९९८ मध्ये झालेल्या चुरशीच्या निवडणुकीतही त्यांचा सात मतांनी विजय झाला. ‘मातोश्री’चे आशीर्वाद ‘गणेशा’ची कृपा म्हणून ‘आनंद’दायी घटना घडली आणि जीवनात ‘सोनिया’चा दिवस उजाडला, असे त्यांनी या यशाचे मार्मिक वर्णन केले होते. राजकारणापलीकडे जाऊन मैत्री निभावताना त्यांनी कुणाचीही पर्वा केली नाही. वेळप्रसंगी स्वपक्षीयांची टीका झेलली. जुलै १९९८ मध्ये त्यांची विधानपरिषदेच्या उपसभापती पदावर एकमताने निवड झाली. सलग १८ वर्ष त्यांनी उपसभापतीपद भुषविले. विधान परिषदेत संघर्ष, वादाचे प्रसंग निर्माण झाल्यावर डावखरे यांना सभागृहात धाडले जायचे. उपसभापतींच्या आसनावर बसून विनोद करुन किंवा एखाद्या सदस्याला चार खडे बोल सुनावून डावखरे तणाव संपुष्टात आणत. या पदावर बसून त्यांनी दिलेल्या प्रशासकीय आदेशांबद्दल पवार यांनी एकेकाळी त्यांच्यावर टीका केली. मात्र तरीही वादग्रस्त विषयांवर आपल्या दालनात बैठका बोलावून विषयाची सोडवणूक करणे डावखरे यांनी थांबवले नाही. लोकसभा निवडणुकीत मात्र ठाण्यातून प्रकाश परांजपे आणि त्यानंतर कल्याणमधून आनंद परांजपे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.
शरद पवार आणि शंकरराव चव्हाण हे एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन ध्रुव होते. मात्र पवार हे आपले स्फूर्तीस्थान तर चव्हाण हे आपले आदरस्थान असल्याचे डावखरे सांगत. पवार आणि चव्हाण या दोघांमधील वादाचा डावखरे यांच्याशी त्यांच्या असलेल्या संबंधावर कधीच परिणाम झाला नाही.
मैफिलीत मनमुराद रमणा-या, बोलताना मोकळे-ढाकळे असणा-या डावखरे यांच्या उपसभापतीपदाच्या दालनात अधिवेशनकाळात अखंड पंक्ती उठत असायच्या. त्यामुळे ज्येष्ठापासून तरुण राजकारणी, पत्रकार यांची तेथे उठबस असायची. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती, तसेच आरपीआयसोबतची आघाडी अशा अनेक राजकीय प्रयोगांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. राजकारणातच नव्हे तर कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रातील लोकांशी त्यांनी आपुलकीचे नाते निर्माण करून जनमानसात ‘आपला माणूस’ अशी प्रतिमा निर्माण केली होती.

(शब्दांकन: जितेंद्र कालेकर)
 

Web Title: 'Spring' defeat in politics ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.