In some places the school is closed while some places are closed! | काही भागांत शाळा सुरू तर काही ठिकाणी बंद!

मुंबई  - महाराष्ट्र बंद ठेवणार असल्याचे समजताच ‘स्कूल बस’चालकांनी बुधवारी स्कूल बस सोडणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरली. तर, सकाळपासून सुरू झालेल्या आंदोलनाने पूर्व उपनगरातील अनेक शाळांनी शाळा बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले. पण, पश्चिम उपनगरासह मुंबई शहरातील काही शाळा सकाळी भरल्या होत्या. पश्चिम उपनगरातील काही शाळांची दुपारी बंदचे स्वरूप हिंसक बनत असल्याने दुपारच्या सत्रातील शाळा बंद ठेवण्यात आल्या.
पूर्व उपनगरात बंदचे केंद्र असल्याने येथील बहुतांश शाळा या बंदच होत्या. काही शाळांमध्ये दहावीच्या पूर्व परीक्षा सुरू होत्या. पण, आजचे पेपर पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. बंदची हाक असल्याने अनेक पालकांनी पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला. पण, काही पालकांनी पाल्यांना शाळेत पाठवले होते. चर्चगेट, सीएसएमटी, मरिन लाइन्स, चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, कांदिवली आणि बोरीवलीचा काही भाग या ठिकाणी बंदचे पडसाद उमटले नव्हते. पण, दुपारनंतर काही शाळांमध्ये शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचारी न पोहोचल्याने शेवटी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.