शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गँगस्टर मुख्तार अंसारीचा मृत्यू; उत्तर प्रदेशात हाय अलर्ट, मोठा बंदोबस्त
2
फडणवीसांमुळे 'ठाकरे'चा आजार बरा; ऊर्जा अन् प्रेरणा देणारा प्रसंग उलगडला
3
काँग्रेसला धक्का! रामटेकच्या उमेदवाराचा अर्ज बाद; आता नवीन चेहरा मैदानात
4
३३ वर्षानंतर अमरावती लोकसभेत शिवसेना उमेदवार नसेल; बाळासाहेबांची आली आठवण
5
IPL 2024: "कोचिंगपेक्षा क्रिकेट खेळणे सोपे कारण...", सौरव गांगुलीची 'मन की बात'!
6
जयंत पाटील म्हणाले महाराष्ट्राबाहेर 'घड्याळ' वापरता येणार नाही; अजित पवार गटाकडून खंडन
7
नांदुरा अर्बन बँक कर्मचाऱ्यांनी केला साडेपाच कोटींचा अपहार
8
माजी मुख्यमंत्र्यांंचे सुपुत्र नकुल नाथ यांची संपत्ती ७०० कोटी; काँग्रेसकडून लोकसभेच्या मैदानात
9
IPL 2024 RR vs DC: यजमानांचा दबदबा कायम! राजस्थानचा 'रॉयल' विजय; दिल्लीचा १२ धावांनी पराभव
10
माजी केंद्रीय मंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर; मराठवाड्यातून चव्हाण-पाटलांची मध्यस्थी
11
‘...अब क्यूं चाहिए मोदी सरकार’, मविआनं भाजपाविरोधात दिली नवी घोषणा
12
IPL 2024 RR vs DC: ४,४,६,४,६,१! छोटा पॅकेट बडा धमाका; रियान परागची 'लै भारी' खेळी
13
ब्रेकिंग! शिवसेनेच्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एका विद्यमान खासदाराचा पत्ता कट
14
Sita Soren : “माझे पती दुर्गा सोरेन जोपर्यंत पक्षात होते...”; सीता सोरेन यांचे JMM वर गंभीर आरोप
15
IPL 2024: KKR आणि RR च्या संघात नव्या खेळाडूची एन्ट्री; परदेशी खेळाडूंना मिळाली संधी
16
कोल्हापुरात शाहू महाराजांविरुद्ध मंडलीक; शिवसेनेच्या धैर्यशील मानेंनाही उमेदवारी
17
‘नेतृत्वाविरोधात टीका किती सहन करायची याला मर्यादा’, वरुण सरदेसाईंनी सुनावले, मविआतील वाद वाढणार?
18
PHOTOS: मुंबईच्या खेळाडूंसोबत फोटो काढून प्रसिद्धी मिळवणारी 'मिस्ट्री गर्ल', कोण आहे ती?
19
"४०० पारच्या घोषणा पोकळ, स्वयंघोषित विश्वगुरूंच्या पक्षावर इतर पक्षातील उमेदवार आयात करण्याची वेळ’’
20
"शिवसेनेसाठी दुर्दैवी... एकनाथ शिंदेंकडे उमेदवार नसल्यानेच गोविंदाला पक्षात घेतले"

'सोलारमॅन' - अंधारलेल्या गावांना प्रकाश वाटणारा माणूस

By कुणाल गवाणकर | Published: May 02, 2018 1:41 PM

शेकडो लोकांच्या आयुष्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा 'मोहन भार्गव' म्हणजे सोलारमॅन सचिन. त्याची गोष्ट तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.     

'स्वदेस' सिनेमातली 'बिजली' म्हणणारी आजी आठवतेय?... आपल्या गावातला, घरातला आणि आयुष्यातला अंधार दूर झाल्याचं कळताच, तिचे डोळे चमकतात आणि चेहऱ्यावर हलकं, पण तितकंच बोलकं स्मित उमटतं. ते पाहून आपल्या पापण्याही आनंदाश्रूंनी ओलावतात. त्या आजीच्या चेहऱ्यावरचं हसू मुरबाडमधील चौरे म्हसरुंडी गावात सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतं. त्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेणारा 'मोहन भार्गव' म्हणजे सोलारमॅन सचिन. त्याची गोष्ट तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.     ...............

मुंबई सोडून जवळपास दोन तास झाले होते.. गाडीनं कल्याण गाठलं होतं.. इथून जवळपास एक तासावर असलेल्या, मुरबाडमधल्या एका गावात वर्षभरापूर्वी वीज नव्हती.. रात्रीच्या वेळी तिथल्या लोकांना फक्त केरोसिनच्या दिव्याचा आधार होता, हे कदाचित हे कुणाला खरं वाटणार नाही.. कारण आपल्या घरात लाईट आहे ना, मग बाकीच्या घरांमध्ये असो वा नसो, काय फरक पडतो, असा विचार दुर्दैवाने बरेचजण करतात.. मात्र हा आपल्यापुरता विचार न करणारी काही माणसं आजही आहेत.. त्यातलाच एक माणूस गाडीच्या मागच्या सीटवर होता.. सचिन शिगवण.. वय वर्ष 34.. प्रोजेक्टनिमित्त अनेकदा सचिन इथं येऊन गेलेला.. त्यामुळे सगळे रस्ते अगदी तोंडपाठ.. गाडी चालवणाऱ्या स्वप्निलला तोच राईट-लेफ्ट सांगत होता.. स्वप्निल हा 21 वर्षांचा तरुण मुलगा गेल्या 6 महिन्यांपासून 'सौरमानव' सचिनसोबत काम करतोय.. सचिनला सौरमानव का म्हणतात, हे तुम्हाला पुढे कळेलच..

कल्याणपासून जवळपास 45 ते 50 मिनिटं पुढे गेल्यावर गाडी उजवीकडे वळली.. दीड वर्षांपूर्वीच इथं रस्ता तयार झालाय, सचिन सांगत होता.. सचिन दोन वर्षांपूर्वी या भागात पहिल्यांदा आला.. त्यावेळी केवळ इथं मातीचा रस्ता होता.. आता चांगला डांबरी रस्ता आहे.. मात्र अनेक ठिकाणी केवळ एक वाहन जाईल, इतकीच रुंदी.. जवळपास अडीच ते तीन किलोमीटर आत शिरताच चौरे म्हसरुंडी हे गाव आलं.. गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत अंधारात असलेलं हे गाव सचिनच्या 'द ग्रीन आय इनिशिएटिव्ह' या संस्थेमुळे प्रकाशात उजळून निघालंय.. 

(चौरे म्हसरुंडी गावाला प्रकाशमान करणारा सचिन शिगवण (उजवीकडे))

चौरे म्हसरुंडी.. 50 उंबऱ्यांचं गाव.. लोकसंख्या साडेतीनशेच्या आसपास.. सगळेच आदिवासी.. आसपासच्या जमिनी कसतात.. मात्र जमीन वन विभागाची.. त्यामुळे आपली म्हणता येत नाही.. भात शेती आणि मोलमजुरी हे मुख्य व्यवसाय.. गावात लोडशेडिंग असते.. आठ-आठ तास... मात्र त्याची वेळ काही नक्की नाही.. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र.. कधीही लाईट जातात.. हे कमी म्हणून की काय कधी ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होतो.. कधी तो जळतो.. तर कधी वीज वाहून नेणाऱ्या तारांवर झाड कोसळतं.. थोडक्यात काय तर लाईट नसणार, हे गृहित धरूनच सगळी कामं करायची.. मात्र 28 जानेवारीनंतर गावातलं चित्रच पालटलं.. 

सचिन, स्वप्निल आणि मी गाडीतून उतरलो.. गावाच्या मधूनच रस्ता जातो.. चांगला सिमेंट काँक्रिटचा.. मात्र तोही जेमतेम वर्षभरापूर्वीच आला.. गाडीतून उतरताच तुकाराम आगिवले भेटला.. वय साधारण 25.. सचिननं ओळख करून दिली.. तुकारामच्या दारातच बसलो.. म्हणजे रस्त्याच्या कडेला.. रस्त्यावरुन रहदारी जवळपास नाहीच.. त्यामुळे सगळंच निवांत.. 

तुकारामला सचिनबद्दल, त्याच्या कामाबद्दल विचारलं.. तुकाराम अगदी मोकळेपणानं बोलू लागला.. 'हे आले होते जानेवारीत.. सौरदिवे लावले... लय चांगलं झालं..' काय बदललं यामुळे.. माझा पुढचा प्रश्न.. 'आधी कसं होतं.. लाईट कधी जाईल, सांगता यायचं नाय.. ते तर आताबी सांगता येत नाय.. पन आता कसं हाय.. यांनी सौरदिवे लावले अख्ख्या गावात.. त्यामुळे रात्रीच्या येळी लाईट गेली की घरात अंधार व्हतो आधीसारखाच.. मात्र आता त्याचं काय वाटत न्हाय.. घराभाईर पडली की उजेडच उजेड.. गावातली मानसं भाईर येत्यात.. आम्ही भाईरच जेवतो.. भाईरच झोपतो.. इतका उजेड पडतो की लाईट गेली असं वाटतच न्हाय..' तुकारामच्या या बोलण्यातून सचिन आणि त्याच्या 'द ग्रीन आय इनिशिएटिव्ह'नं केलेल्या कामानं चौरे म्हसरुंडीतल्या लोकांचं आयुष्य कसं बदललंय, याची कल्पना आली..

(कित्येक वर्ष अंधारात बुडालेलं चौरे म्हसरुंडी गाव 28 जानेवारीनंतर असं उजळून निघालंय.)

थोड्या वेळानं काही शाळकरी मुलं आली.. शाळेला सुट्टी असल्यानं मस्ती सुरू होती.. तुकारामनं त्यांना बोलावलं.. एक मुलगा धावत आला.. त्याला नाव, इयत्ता विचारली.. मुकेश वाकचौरे.. इयत्ता सहावी.. सचिन दादाला ओळखतो का विचारलं, तर त्यानं मान डोलावली.. काय करतात हे, असं विचारलं.. तर लाईट लावून गेले, असं उत्तर मिळालं.. त्याचा काय फायदा झाला, असं विचारताच आता रात्री बिनधास्त बाहेर रस्त्यावर खेळता येतं, असं मुकेशनं लगेच सांगून टाकलं.. अभ्यासात काय फायदा झाला.. माझा पुढचा प्रश्न.. 'आधी अंधार पडायच्या आत अभ्यास करावा लागायचा.. कारण लाईट कधीपण जायची.. आता लाईट गेली तरी घराबाहेर येऊन अभ्यास करतो.. गावातली सगळी पोरं असंच करतात..,' मुकेशनं सांगितलं..

थोड्या वेळानं मुकेशचा आणखी एक मित्र आला.. विलास वाघ.. हा पण मुकेशच्या वर्गातला.. त्यानं पण तेच सांगितलं.. रात्री अगदी लख्ख उजेड पडत असल्यानं आता मुलं जास्त वेळ अभ्यास करतात.. गेल्या डिसेंबरपर्यंत हे शक्य नव्हतं.. आणि सहा महिन्यांपूर्वी तर इथल्या कुणीही या 'प्रकाशा'ची कल्पनाही केली नव्हती.. इथला दररोजचा अंधार जणू काही आपल्या आयुष्याचाच एक भाग आहे, असंच इथला प्रत्येकजण मनात धरुन चालला होता.. मात्र सचिन आणि त्याच्या 'द ग्रीन आय इनिशिएटिव्ह'च्या येण्यानं इथला अंधार दूर झाला..

'द ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह'नं या गावात एकूण बसवलेल्या सोलार लाईट पोल्सची संख्या आहे 20.. प्रत्येक दिवा 9 मेगावॉटचा.. एका दिव्यामुळे 300 चौरस मीटरचा परिसर उजळून निघतो.. म्हणजे सचिन आणि त्याच्या संस्थेनं केलेल्या कामामुळे 6 हजार चौरस मीटरचा परिसर उजेडात न्हावून निघतो.. आणि हे सगळं ऑटोमॅटिक बरं का.. म्हणजे सकाळी सूर्यकिरणं येताच दिवे बंद.. सोलार पॅनलकडून चार्जिंग सुरू.. संध्याकाळी सूर्य अस्ताला गेला, किरणं यायची थांबली की दिवे सुरू.. कोणतंही बटण दाबायची गरज नाही.. सचिनला या प्रोजेक्टमध्ये अर्थसहाय्य मिळालं ते रोटरी क्लब ऑफ बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सकडून.. इथले अध्यक्ष ऋषभ वसा यांनी या कामाला ग्रीन सिग्नल दिला.. तर यासाठी अशोक गोरे यांनी सढळ हस्ते पैशांची मदत केली.. चार लाखांमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण झाला.. 28 जानेवारीला उद्घाटन झालं.. तेव्हापासून हे गाव रात्रीच्या वेळीही प्रकाश अनुभवतंय.. जो या गावानं कधीही पाहिला नव्हता..

(चौरे म्हसरुंडी गावाला उजळवून टाकणारी द ग्रीन आय इनिशिएटिव्ह)

तुकारामच्या घरासमोर गप्पा सुरू होत्या.. त्यानं खूप आग्रह करुन चहा दिला.. चहा कोरा होता.. मात्र तुकारामच्या आग्रहातच इतका गोडवा की तो चहा कडू वाटलाच नाही.. एव्हाना बच्चेकंपनी निघून गेली होती.. तेवढ्यात वसंत सराई आले.. आदिवासी आदिम कातकरी संघटनेचे कल्याण तालुक्याचे सचिव.. ग्रामपंचायतीचे अतिशय सक्रीय सदस्य.. सचिनला पाहताच वसंत यांनी अक्षरश: हात जोडले.. कधी आलात, कसे आहात, याची आस्थेवाईकपणे चौकशी केली.. सचिननं माझी ओळख करुन दिली.. 'एक सचिन देव झाला.. आता या सचिनला तुम्ही देव करता की काय?', मी हसत हसतच विचारलं.. अन् वसंत काका बोलू लागले.. 'अहो, अख्खं गाव रात्र झाली की अंधारात जायचं.. लोडशेडिंगमुळे लाईटीचा पत्ता नाही.. पोरांना बाहेर सोडायला भीती वाटायची.. रात्र झाली की केरोसिनचे दिवे लावायचो.. घरातली कामं, पोरांचा अभ्यास, जेवण सगळं त्या दिव्याच्या प्रकाशात करावं लागायचं.. पण जानेवारीपासून सगळचं बदललं..' वसंत काका जणू काही चमत्कार घडून गेल्याचं सांगत होते..

'मग आता सगळं बरं चाललंय ना?' मी विचारलं.. 'खूप बरं हाय.. आता पोरं रात्रीची बाहेर रस्त्यावर खेळतात.. कुठून काय येईल, साप चावेल, अशी भीती आधी वाटायची.. आता मात्र तसं नाय.. आधी अंधार पडला की सगळेच घरात.. रस्त्यावर चिटपाखरुही नसायचं.. आता तर आम्ही सगळे बाहेरच जेवतो.. मजा येते.. बाहेरच झोपतो बऱ्याचदा.. सगळेच अगदी खूश आहेत गावात..', वसंत काकांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता.. सचिनचं तोंडभरुन कौतुक सुरू होतं.. अन् सचिन त्यांना आम्ही आमचं कर्तव्य केलं, आता तुम्ही हे केलेलं काम जपा, सोलार दिव्यांची नीट देखभाल करा, असं आवर्जून सांगत होता..

अनेकदा शहरातली माणसं, संस्था गावात येतात.. त्यांना कपडे, इतर वस्तू देतात अन् निघून जातात.. कधीकधी शाळेसाठी वस्तूंचं वाटप करतात.. मात्र त्या जपल्या जात नाहीत.. कारण त्याबद्दल गावकऱ्यांना भावनिक जवळीक वाटत नाही.. सचिननं हेच लक्षात घेऊन गावकऱ्यांना या प्रोजेक्टमध्ये सामावून घेतलं.. सोलार पॅनलचे दिवे लावण्यासाठी लागणारे खड्डे गावकऱ्यांनीच खणले.. आता त्यांच्यावर नवी जबाबदारी आहे.. पॅनल ठराविक दिवसांनी पुसायची.. तीदेखील गावकरी पार पाडतायत.. सोलार पोलमध्ये बॅटरी असते.. ती साधारण दीड-दोन वर्ष टिकते.. त्यानंतर ती बदलावी लागते.. त्यासाठीही गावकरीच दर महिन्याला काही ठराविक रक्कम काढणार आहेत.. वसंत काकांनीदेखील याच गोष्टीवर भर दिला.. पोरांनी सोलार दिवे लावून दिलेत, आता त्याची नीट देखभाल करायचीय, असं ते मोठ्या काळजीनं बोलत होते.. सोलारमॅन अर्थात सचिनचे वारंवार आभारदेखील मानत होते.. वसंत काका आणि तुकारामचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली..

(चौरे म्हसरुंडी ग्रामस्थांचं जीवन द ग्रीन आय इनिशिएटिव्हमुळे पूर्णपणे बदलून गेलंय)

परतीचा प्रवास सुरू झाला सोलारमॅनच्या भन्नाट किस्स्यानं.. हा सोलारमॅन शब्द नेमका आला कुठून, याची कथाही मोठी रंजक आहे.. सचिननं ती परतीच्या प्रवासात सांगितली.. 'त्याचं झालं असं की, मी दोन वर्षांपासून सोलार प्रोजेक्टवर काम करतोय.. डोक्यात अनेक कल्पना होत्या.. त्यामुळे साहजिकच बोलताना अनेकदा सोलार हा शब्द वापरायचो.. यावरुन एकदा काही मित्रांनी माझी खिल्ली उडवली.. अरे, हा बघ सोलारमॅन आला, असं म्हणाले.. तिकडून ते नाव आलं..' सचिन हसतहसत सांगत होता.. 'म्हणजे मित्रांनी केलेल्या टिंगलटवाळीतून हे नाव आलंय? यासाठी खरंतर तू तर त्यांचे आभारच मानायला पाहिजेत..' मी सचिनला म्हटलं.. 'अरे, मी तर त्यांचा आभारीच आहे.. एरव्ही विचार करुनही इतकं भन्नाट नाव सुचलं नसतं.. ते फक्त त्या एका टोमण्यामुळे मिळालं', सचिननं सांगितलं.. 'मार्केटिंग केलंय बाबा, कुठला शब्द कुठे वापरायचा, बरोब्बर माहितीय,' सचिन हसतहसतच पुढे म्हणाला..

सचिनसोबत गप्पा सुरु असताना त्याच्यासोबत काम करणारा स्वप्निल शांतच होता.. सचिन सर सोबत असल्यानं तो फार बोलत नव्हता.. 21 हे वय तसं एन्जॉय करण्याचं.. मित्रमैत्रिणी, हँगआऊट, नाईट आऊट्स, इतर आऊटिंग्स हे सगळं सोडून आदिवासी भागात येऊन समाजकार्य करावंसं का वाटलं, हा प्रश्न मनात होताच.. तोच स्वप्निलला विचारला.. स्वप्निलचं उत्तर छान होतं.. 'आपण शहरात राहतो.. वीज, पाणी सगळं आहे.. पण आपल्यापासून काही तासांवर राहणाऱ्यांकडे ते नाही.. आपल्याकडे जे मिळतं, ते इतरांना द्यावं, इतकाच लहान विचार आहे आणि त्यासाठी थोडे प्रयत्न आहेत.. बाकी काही नाही.. अवघं 21 वय असणाऱ्या, व्हॉट्सअपच्या पिढीतल्या मुलानं दिलेलं हे उत्तर..

(लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मिळतो, त्याची किंमत कशातच करता येणार नाही, असं म्हणणारा स्वप्निल पाठक)

मग स्वप्निलला आणखी बोलत केलं.. स्वप्निलही मोकळेपणानं बोलू लागला.. 'चौरे म्हसरुंडी हा माझा पहिला प्रोजेक्ट.. सोलार पोल लावताना एक दिवस मी तिकडे होतो.. लाईट आल्यानंतर गावातल्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद काय सांगू मी तुला? शब्दांमध्ये नाही सांगता येणार तो आनंद.. तो अनुभवच खूप खास.. आपल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, हे फिलिंगच खूप भारी वाटतं.. आपल्यामुळे कोणाचं आयुष्य 'ब्राईट' होत असेल तर काय हरकत आहे आपली सुट्टी, आपला मोकळा वेळ त्यांना द्यायला..' स्वप्निलचं हे उत्तर ऐकून मन अगदी भरुन आलं..

सचिनलाही मी हाच प्रश्न केला.. 'अॅडव्हर्टायझिंगमध्ये इतकं सगळं छान सुरूय तुझं.. आता सोलार क्षेत्रात स्वत:ची कंपनी सुरू केलीय.. यातून वेळ कसा मिळतो? इतर तरुणांसारखं मस्त आयुष्य जगूच शकत होतास.. तरी कित्येक वर्षांपासून समाजसेवा, त्यासाठी दगदग, शारीरिक ओढाताण, आता स्वत:ची संस्था सुरू करून त्यातून आणखी कामं, इतके प्रोजेक्ट्स? इतकं सगळं कशासाठी?', मी अक्षरश: प्रश्नांची सरबत्ती केली.. सचिननं एका शब्दात उत्तर दिलं.. 'समाधानासाठी..' पुढे म्हणाला, 'या कामातून मला, माझ्या टीमला समाधान मिऴतं. इतरांचं आयुष्य सुकर, सुखकर झालं की त्यांना जो आनंद होतो, त्याची किंमत पैशात नाही ना करु शकत आपण. याचसाठी सुरूय हे सगळं..' सचिननं थोडक्यात पण अगदी नेमक्या शब्दात माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं..

मग एकंदरीच चौरे म्हसरुंडी गावातल्या प्रोजेक्टबद्दल सचिनला विचारलं.. याच गावात प्रोजेक्ट का केला, गावाची निवड कशी केली, प्रोजेक्ट कधी सुरू झाला, असे प्रश्न सुरू केले.. सचिन उत्साहानं सांगत होता.. 'या गावातल्या घरांमध्ये वीज आहे.. मात्र लोडशेडिंग असतं.. लाईट नसली की घराबाहेर पडताच यायचं नाही.. त्यामुळे रस्त्यावर दिवे लावून द्या, अशी गावकऱ्यांची मागणी होती.. नोव्हेंबरला गावात येऊऩ पाहणी केली.. त्यानंतर आर्थिक जुळवाजुळव केली.. रोटरीच्या माध्यमातून अशोक गोरे यांनी मदत करण्याची तयारी दर्शवली.. मग किती ठिकाणी सोलार लाईट्स लावायचे. त्यांची क्षमता किती असायला हवी, हे ठरवलं.. माझ्या संस्थेत एकूण 20 जण.. त्यातले 7 ट्रस्टी.. या सगळ्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला.. जानेवारीतल्या दोन दिवसांमध्ये दिव्यांचं काम पूर्ण झालं आणि 28 ला उद्घाटन..' सचिननं एका दमात सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली..

'एखाद्या गावाला मदत करायची हे कसं ठरवता, त्याचे निकष काय? मग आर्थिक मदत कशी काय उभी करता? आर्थिक मदत करणाऱ्या आणि गावातल्या लोकांशी कोणकोणत्या टप्प्यांवर संवाद होतो?' पुन्हा एकदा माझ्या प्रश्नांची मालिका.. सचिनची बॅटिंग सुरू.. 'आम्ही पहिल्यांदा जाऊन सर्वेक्षण करतो.. गावातल्या समस्या कोणत्या.. कोणती जास्त गंभीर आहेत.. हे पाहतो.. गावातल्या लोकांची आर्थिक स्थिती, किती लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत.. लोकसंख्या काय.. याची माहिती गोळा करतो.. तीन मुख्य निकष असतात.. पहिला निकष.. गावाला आम्ही पुरवणार असलेल्या सुविधेची खरंच गरज आहे का? दुसरा.. गावातली स्थिती कशी आहे.. भांडणतंटे, गटतट आहेत का..? एखादा माणूस, जो तिथला प्रमुख आहे, गावातल्या लोकांना त्याबद्दल आदर आहे, असं कोणी आहे का? आणि तिसरा निकष म्हणजे दिलेली सुविधा गाव नीट वापरेल का, त्याची काळजी घेईल का? या सर्व गोष्टी विचारात घेऊन संस्था निर्णय घेते..' सचिननं माझ्या शंकांचं निरसन केलं..

चौरे म्हसरुंडी गावाचं उदाहरण देत मी सचिनला आणखी प्रश्न केले.. 'इथे दिव्यांची गरज होती.. हा पहिला निकष.. पण इतर दोन निकषांचं काय..? लोक ज्याला मानतात, ती व्यक्ती कशी आहे? गाव दिव्यांची काळजी कशी घेईल? या दोन मुद्द्यांचं काय?', माझे प्रश्न काही संपत नव्हते.. सचिनची जणू तोंडी परीक्षा सुरू होती.. सचिनची बॅटिंग पुन्हा सुरू झाली.. 'आपण गावात तुकारामच्या घराबाहेर बसलो होतो.. गावातली सगळी घरं विटांची आहेत.. फक्त एक घर कुडाचं होतं..' सचिनला थांबवत मी म्हणालो.. 'हो.. ते तुकारामच्या घरासमोरचं.. रस्त्याच्या पलीकडचं..' सचिननं माझं बोलणं पूर्ण केलं.. 'अगदी बरोबर.. तेच वसंत सराई यांचं घर.. ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत ते.. पण सरपंचापेक्षा जास्त कामं तेच करतात.. सरकार दरबारी अर्ज-विनंत्या.. सगळं तेच बघतात.. गावातल्या इतर लोकांनी सरकारी योजनांमध्ये मिळणाऱ्या पैशांमध्ये घरं बांधली.. आणि वसंत काका सगळ्यांना पत्रव्यवहारात मदत करत राहिले. आता सर्वांची घरं पक्की आहेत.. अपवाद फक्त काकांचा.. सध्या वसंत काका इंदिरा गांधी आवास योजनेतून घराचं काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करताहेत.. जो माणूस इतरांच्या इतका उपयोगी पडू शकतो, त्याची खूप मदत प्रोजेक्ट करताना आणि नंतर त्याची देखभाल करताना संस्थेला होईल, हे तेव्हाच माझ्या डोक्यात आलं होतं..' सचिन माणसं बरोब्बर ओळखतो, हे यावरुन मला कळलं.. आणि वसंत काकांच्या बाबतीत त्याचा अंदाज मुळीच चुकला नव्हता.. वसंत काका खरंच अतिशय नम्र आणि साधे होते..

'तिसरा निकष राहिलाय.. हे गाव दिव्यांची काळजी घेईल की नाही? याचा अंदाज कसा काय बांधला..?' जणू काही उधारी राहिलीय, तशी मी सचिनला प्रश्नांची आठवण करुन दिली.. 'आतापर्यंत खूप प्रोजेक्ट केलेत.. 8 गावं, 13 शाळांमध्ये सोलार लाईट्स,. मिनी ग्रीड, सोलार ड्युअल पंप सिस्टम, सोलार कुकर बसवलेत.. त्यामुळे हा अंदाज आता व्यवस्थित येऊ लागलाय.. एखाद्या गावात गेलो की आम्ही तिथल्या उपलब्ध सोयींवर नजर टाकतो.. पाणी असलं की तिथले नळ कसे आहेत.. शाळा असेल, तर तिची देखभाल कशी केलीय.. दिलेल्या साहित्याची मोडतोड केलीय का? सध्या ज्या सोयी सुविधा गावात आहेत, त्यांचा वापर लोक काळजीपूर्वक करताहेत का? याचं निरीक्षण मी पहिल्यांदा गावात गेल्या गेल्याच करतो,' सचिनचा होमवर्क जबरदस्त होता आणि त्याचे रिझल्ट्स तर मी पाहिलेच होते..

परतीचा प्रवास जवळपास संपत आला होता.. आणखी कुठे कुठे प्रोजेक्ट केले, माझी बोलंदाजी सुरूच होती.. वेलोशी (शहापूर), कुंडाची वाडी (शहापूर), कातकरी पाडा (शहापूर) पाटीलवाडा (विक्रमगड), भुईपाडा (मुरबाड) या गावांमध्ये 'द ग्रीन आय इनिशिएटिव्ह'नं सौर दिवे, मिनी ग्रीड सोलारवर चालणारे पाण्याचे पंप बसवल्याची माहिती त्यानं दिली.. पिंपलोली हायस्कूल (बदलापूर), चैतन्य विद्यालय, गुंडे (बदलापूर) यांच्यासह एकूण 13 शाळांमध्ये संस्थेनं सोलार लाईट्स, सोलार कुकर लावले आहेत.. यामुळे अनेकांच्या आयुष्यात मोठा बदल झालाय.. अनेक विद्यार्थी अधिक जोमानं अभ्यास करु लागलेत.. एका संस्थेनं, ती संस्था यशस्वीपणे चालवणाऱ्या एका ध्येयवेड्या तरुणानं केलेलं हे काम जितकं थक्क करणारं आहे, तितकंच ते कौतुकास्पद, प्रेरणादायी आहे तितकंच ते अनुकरणीयसुद्धा आहे.. 2020 पर्यंत अंधारात असलेली 1000 गावं सौरउर्जेनं उजळून टाकायची, हे सचिन आणि त्याच्या 'द ग्रीन आय इनिशिएटिव्ह'चं लक्ष्य आहे.. त्यांचं हे कार्य असंच सुरू राहो.. त्यांनी लावलेल्या लक्ष लक्ष दिव्यांनी लाखो लोकांचं रोजचं जगणं आणि आयुष्य प्रकाशमान होवो, याच शुभेच्छा...