ठळक मुद्देमी तृतीयपंथी आहे तर यात माझा काय दोष? तुम्ही आमच्या कमाईच्या, नोकरीच्या वाटा बंद केल्या त्यामुळे हे टाळ्या वाजवत भीक मागायला लागतं.

मुंबई :  हिजडा शब्द ऐकला किंवा हिजडा म्हणवली जाणारी व्यक्ती पाहिली की दचकायचं एवढंच आपल्याला माहिती असतं. त्यांचं ते साडी नेसणं, जोरात भसाड्या किंवा चिरक्या आवाजातलं बोलणं, फाटफाट टाळ्या वाजवणं आणि खरडून खरडून केलेली दाढी हे सगळं पाहायला ओंगळ वाटतं आणि भीतीही वाटत असते. हिजडा किंवा छक्का हे शब्द शिवीसारखे किंवा चिडवायला वापरायचे हे शाळेतल्या पोरांनाही माहिती असतं. कदाचित त्याचा अर्थही त्या पोरांना माहिती नसेल पण असले शब्द ऐकले की फिदीफिदी हसायचं असतं हे त्यांनी इकडेतिकडे पाहिलेलं असतं. आमच्या शाळेतही हेच होतं.कोल्हापूरात असताना देवदासींप्रमाणे सोडलेले जोगतेही पाहताना विचित्र वाटायचे.
मुंबईत आल्यावर ट्रेनमध्ये प्रवास करताना भीक मागणाऱ्या एका तृतीयपंथीयाने कानाजवळ टाळी वाजवलेली तेव्हाही असंच दचकायला झालं होतं. पण कधीही जबरदस्तीने पैसा गोळा करताना पाहिले नाही. त्यांच्यामध्ये बहुतांशवेळा तरुण तृतीयपंथीही दिसतात. पोट भरण्यासाठी आपण त्यांच्यासाठी भीक मागण्याशिवाय दुसरा मार्गच सोडलेला नाही हे अशावेळेस लक्षात येतं.
विरारला स्टेशनवर पोहोचताना मोबाइल वाजला,
''किधर है भाई?,
विरारला पोहोचतोय!
अच्छा ऐसा करो, जीवदानी माता के गेटपर 'बलिदान' पूछना और आना!''

हा फोन होता एका तृतियपंथी व्यक्तीचा. ती होती ईश्वरी.
तिने सांगितलेल्या पत्त्यानुसार 'बलिदान' शोधून काढले. तिथल्या बैठ्या घरांपैकी एका घरात तिने भेटायचं ठरवलं होतं. माजिद शेख नावाच्या तिच्या जुन्या शेजाऱ्यांच्या घरी जाऊन आम्ही गप्पांना सुरुवात केली. काही महिन्यांपुर्वी ती त्यांच्या शेजारी राहायची. 
म्हटलं तर ईश्वरी इतर तृतियपंथियांसारखी. काळी सावळी त्यात चोपून नेसलेली साडी अशी ती समोर बसून बोलू लागली. आंध्र प्रदेशात राजमुंद्री तिचं मूळ गाव. पण गावाकडे असताना तिचं नाव होतं विष्णू. गावाकडे लहानसहान कामं करुन त्यानं पोट भरण्यासाठी लहानसहान कामं सुरु केली. ती म्हणते दिवसाला पाचशे रुपये मिळतील अशीही कारखान्यांमध्ये विष्णूला कामं मिळायची. पण त्याचं ते इतरांपेक्षा वेगळं दिसणं, वेगळे हावभाव सगळ्यांच्या डोळ्यात यायचे. मग सुरु झालं.जीवघेणं चिडवणं. विष्णूला एका जागी फारकाळ काम करणं शक्य होईना. या सगळ्या चिडवण्याला आणि लोकांच्या टोमण्याला कंटाळून त्यानं शेवटी आत्महत्याच करायचा निर्णय घेतला. पण अगदी शेवटच्या क्षणी तृतियपंथीयांच्या एका गुरुने त्याला जीवन संपवण्यापासून रोखलं आणि मुंबईला जायला सांगितलं. तिच्या सांगण्यावरुन विष्णू 15 वर्षांपुर्वी मुंबईला आला आणि विष्णूची ईश्वरी झाली. काही दिवस मालाडला स्टेशनवर काढल्यावर ईश्वरीने विरारला पैसे मागून जगायला सुरुवात केली.

हळूहळू दिवसभरात जमलेल्या पैशातून थोडेथोडे पैसे बाजूला काढायला सुरुवात केली आणि आसपासच्या गरजू लोकांमा मदत करायला सुरुवात केली. कधी एखादा भिकारी दिसला किंवा उपाशी माणूस दिसला की त्याला सामोसा, वडापाव दे अशी तिची मदत सुरु झाली. असं करताकरता तिनं आजूबाजूंच्या लोकांना भरपूर मदत केली. सणावाराला गरिबांना कपडे, साड्याही द्यायला तिने सुरुवात केली. आता तर ती महिन्यातून एकदा अनाथाश्रमात दिवसभराच्या जेवणासाठी लागणारा शिधा ती देते.
ईश्वरी तिच्या बोलण्यातून अशी एकेक माहिती देत असताना तिने आणखी एक माहिती दिली आणि खरा धक्का बसला. तिच्या गावामध्ये तिने एक आई-बापांनी नाकारलेल्या बाळाचे पालकत्व स्वीकारलंय. राजेश त्या मुलाचं नाव. दोन दिवसांच्या बाळाला घरात आणून तिने त्याचे पालकत्त्व स्वीकारले आणि आता राजेश 4 वर्षांचा झाला आहे. त्याला नर्सरीमध्येही त्याला घालण्यात आलंय. त्याचे वाढदिवस, कोडकौतुक हे सगळं ती आनंदानं करत असते. त्याचा सगळाच खर्च ती करते. मुंबईला आल्यावर तिच्या घरात तिकडे वाद-कलह सुरु होते. संपत्तीत वाटा द्यायला नको म्हणून तिच्या भावांनी तिला बेदखल केलंच, तर तिच्या आईलाही पाहायचं त्यांनी नाकारलं. समाजाने तृतियपंथी म्हणवलेल्या ईश्वरीने आईचीही जबाबदारी स्वीकारली. राजेश आणि आईचा ती आधार बनली.

ईश्वरीचे एकेक अनुभव थक्क करणारे आहेत. ''मी तृतीयपंथी आहे तर यात माझा काय दोष? तुम्ही आमच्या कमाईच्या, नोकरीच्या वाटा बंद केल्या त्यामुळे हे टाळ्या वाजवत भीक मागायला लागतं. आता तर एलफिन्स्टनच्या चेंगराचेंगरीनंतर आमचीच धरपकड चालवली आहे. 'वरुन' ऑर्डर आहे असं सांगतात आणि सरळ हाकलतात. माझं म्हणणं आहे, एकदा आम्हाला सरळ मारुन का टाकत नाहीत. एकेदिवशी बोलवा सगळ्या हिजड्यांना, भिकाऱ्यांना आणि लंगड्या-अपंगांना आणि गोळ्या घालून टाका. कोईं झंझटही नही रहेगा. इथे काही वयस्कर लोकांना घराबाहेर काढलं जातं. त्यांना भीक मागायची नसते म्हणून ते शंभरेक रुपयांची भाजी घेऊन विकायला बसतात. कसेबसे तीस-चाळीस रुपये त्यातून ते कमावतात. पण पोलीस येतात आणि सरळ लाथ मारुन त्यांची कोथिंबीर मिरच्या उडवून लावतात. या लोकांनी पोट तरी कसं भरायचं तुम्ही आमच्या जगण्याच्या वाटा बंद करता आणि वरती भीक का मागता असंही कसं विचारता.?''
ईश्वरीच्या या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हतेच. मी गप्प बसलेलो पाहून ती म्हणाली,

''तुम कितनाभी पैसा कमाओ, उपर के मंजिलपर रहो, तुम्हे एक दिन निचे जमीन मे ही जाना है.
हम लोगों भीड होती है, तो जो करोडपती लोग सिर्फ शौक के लिये गाडीया चलाती है, उनसे भीड नही होती क्या..''

ईश्वरी अशिक्षित असलं तरी नोटाबंदी, जीएसटी सगळ्या बातम्यांवर लक्ष ठेवून असते. रेल्वेतल्या रोजच्या प्रवाशांबरोबर ती गप्पा मारत असते, त्यामुळे तिच्याकडे भरपूर विषयांची माहिती आहे. तिची या सगळ्यावर स्वतःची मतेही आहेत. ''जे सरकार धडधाकट माणसांना, शिकलेल्या लोकांना काम देऊ शकत नाहीत ते आम्हाला काय देणार? ''
खरंय!  असं म्हणून ईश्वरीचा निरोप घेतला आणि विरार स्टेशनकडे जाऊ लागलो. तिच्याशी बोलल्यामुळे आजूबाजूचे स्टेशनवरचे गरीब नेहमीपेक्षा वेगळे दिसायला लागले. सुशिक्षित, सभ्य समजल्या जाणाऱ्या समाजाने स्वतःभोवती एक घाणेरड्या कोशाचं पांघरुण घेतलंय. गरिबीकडे, बाहेरच्या जगाकडे आपलं लक्षच जाऊ नये असं त्याला वाटतं.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.