अमरावती - राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या भाजपा आणि शिवसेनेमधील वाकयुद्ध संपण्याचे नाव घेत नाहीये.  एकीकडे शिवसेनेकडून भाजपावर सातत्याने टीका होत असताना, आज मुख्यमंत्र्यांनी स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, असा चिमटा शिवसेनेला  नाव न घेता काढला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले. 
या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, "भारतीय राजकारणात राजकारणापलीकडे जाऊन मैत्री करणारे नेते फार कमी आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्यापैकीच एक. त्यामुळेच ते राजकीय मतभेद दूर ठेवून मार्गदर्शन करत असतात. असा दिलदारपणा असला पाहिजे. स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा."  यावेळी फडणवीस यांनी शरद पवार यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले, " शरद पवार हे दिलदार विरोधक आहेत. पक्षभेद विसरून ते मागे उभे राहतात. त्यांचा शेतीचा अभ्यास चांगला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारमध्ये सहभागी होताना त्यांनी कृषी खाते मागून घेतले." असे मुख्यमंत्री म्हणाले. 
राज्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची निर्णय घेतानाही आपण शरद पवार यांच्याशी चर्चा करून त्यांचा सल्ला घेतल्याचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. "राज्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्याची गरज होती. जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला. तेव्हा शरद पवार यांना दिल्लीला बोलावले. तिथे राष्ट्वादी आणि भाजपाचेही नेते उपस्थित होते. त्यावेळी शरद पवार यांनी कर्जमाफीसंदर्भात मार्गदर्शन केले," असे मुख्यमंत्री म्हणाले.   


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.