मुंबई, दि. 12 - शिवसेना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पाठिंशी भक्कमपणे उभी आहे असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सांगितले. एमआयडीसी जमीन घोटाळावरुन विरोधकांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर केलेल्या आरोपांसंबंधी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली.  राजकारणाची पातळी खूप घसरलेली आहे. आरोप करणारे भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत. आरोप कर राजीनामा घे हा पायंडा पडला तर महाराष्ट्राच्या प्रतिमेला साजेसं नाही. त्यांना  स्वतःच्या कृत्याची लाज वाटत नाही हे भयानक आहे असे उद्धव म्हणाले. 

सुभाष देसाईंनी माझ्याकडे राजीनामा देण्याची तयारी दर्शवली त्यानुसार त्यांनी राजीनामा सादर केला मात्र मुख्यमंत्र्यांनी तो फेटाळला. मुख्यमंत्र्यांनी निःपक्षपाती चौकशी करण्याचे वचन दिले आहे, तशी चौकशी होईल आणि सत्य बाहेर येईल असे उद्धव यांनी सांगितले. 
 
एमआयडीसी जमीन घोटाळावरुन विरोधकांनी केलेल्या आरोपानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची काहीही गरज नसल्याचं सांगत त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील गोंदेदुमाला येथील एमआयडीसीने संपादित केलेली 400 एकर जमीन सुभाष देसाई यांनी मूळ मालकाला परत केली, असा आरोप करत विरोधकांनी उद्योगमंत्री सुभाष देसाईंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. 

'मी सकाळी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला होता. त्यांनी तो स्विकारला नाही. मात्र आपण चौकशीपसाठी पुर्णपणे तयार असल्याचं', अशी माहिती सुभाष देसाई यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. आज सकाळी मी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेत राजीनामा दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नि:ष्पक्षपातीपणे चौकशी होईल. चौकशी होईपर्यंत राजीनामा देण्याची गरज नाही असं सांगितलं. यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी एकमेकांसोबत चर्चा केली, आणि राजीनाम्याची गरज नसल्यावर एकमत झालं. जी चौकशी होईल ती मान्य असेल, आणि त्यांचा निर्णयही मान्य असेल', असं सुभाष देसाई बोलले आहेत.