कल्याण : शहराच्या पूर्व भागातील शिवसेना नगरसेविका माधुरी काळे यांचे पती प्रशांत यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड याला नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे अटक केली आहे.
काळे यांच्यावर हल्ला झाला, तेव्हा काळे यांनी शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय गायकवाड यांच्यावर संशय व्यक्त केला होता. काळे व गायकवाड यांच्यात वाद असल्याने काळे यांनी गायकवाड यांनीच हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला होता. एका ठिकाणी गायकवाड यांनी काळे यांना पाहून घेण्याची धमकी दिली होती. ही गोष्ट महेशला माहीत होती. महेश व काळे हे मित्र आहेत, तर संजय गायकवाड याचे महेश व काळे या दोघांशी पटत नाही. काळे यांच्यावरील हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला होता. पोलीस तपास करत असताना वेगळीच गोष्ट समोर आली. महेश याच्याकडे कामाला असलेल्या प्रशांत बोटे यांनी काळेवर हल्ला केला आहे. बोटेने हा हल्ला महेशच्या सांगण्यावरून केल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली.
पोलिसांनी प्रथम बोटे याला अटक केली. महेशच्या सांगण्यावरूनच काळेंवर जीवघेणा हल्ला केला, अशी कबुली बोटे याने दिली. काळे यांचा काट्याने काटा काढण्याचा प्रयत्न महेश याने केला. त्याचा तो प्रयत्न फसला. काळेवर हल्ला केला, तर काळे संजय गायकवाडचे नाव घेईल. त्यामुळे हल्ला महेशने केला, हे उघड होणार नाही. मात्र, महेशचा हा प्रयत्न फसला. महेशला अटक झाल्याने काळे यांना धक्का बसला आहे. महेशने त्यांच्या हत्येचा कट रचला होता. दरम्यान, महासभेच्या वेळी झालेल्या राडाप्रकरणी महेश याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.