ऑनलाइन लोकमत
 
नागपूर, दि. 17 -  नागपूर महानगरपालिका निवडणूकांच्या रिंगणात शिवसेनेसारखे जम नसलेले पक्षही उतरले आहेत.निवडणूकीत मत देणे विकासासाठी गुंतवणूक करणे असते. उद्धव-आदित्य ठाकरेंच्या पक्षाला नागपुरात कुणी विचारत नाही. त्यांच्या पक्षरुपी बँकेचे नागपुरात खातेही उघडणार नाही, या शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी नागपुरात प्रथमच शिवसेनेवर टीका केली. शुक्रवारी सलग दुस-या दिवशी त्यांनी नागपुरातील विविध भागांत प्रचारसभा घेतल्या.
दक्षिण नागपुरातील मानवता हायस्कूल, छोटा ताजबाग चौक, नंदनवन तसेच बांग्लादेश परिसरात त्यांनी प्रचारसभा घेतल्या. या प्रचारसभांत खा.डॉ.विकास महात्मे, आ.सुधाकर कोहळे, आ.कृष्णा खोपडे यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. 
गुंतवणूक करताना चांगल्या बँकेत केल्यास त्याचा परतावाही चांगला मिळतो. मतांच्या बाबतीतही हेच धोरण असायला हवे. भाजपारूपी बँकेत मतांची गुंतवणूक केल्यास ५ वर्षात ५ पट विकासाची १०० टक्के खात्री आहे. कॉंग्रेसमध्ये तर भांडणच सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मतांची गुंतवणूक केल्यानंतर तेथून मुद्दलदेखील परत मिळतत नाही.  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही दिवाळखोर पक्ष असल्याचे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भाजपाने सत्ता आल्यानंतरच खºया अर्थाने सामाजिक न्याय घडवून आणला आहे. कॉँग्रेसने इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी एवढ्या वर्षे सत्तेत असताना मोकळी करून दिली नाही. आम्ही इंदू मिलच्या जागेचा प्रश्न चुटकीसरशी सोडविला.  एवढेच नाही तर लंडन येथील बाबासाहेबांचे स्मारक, चैत्यभूमीचा विकास, दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र/पर्यटनाचा दर्जा, जपानमधील विद्यापीठात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याचे कार्य आम्ही केले आहे, असेदेखील ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपाने नागपुरात केलेल्या विकासकामांचा पाढाच वाचला. 
 
कॉंग्रेसचा सामाजिक न्याय ही ‘बोलाचीच कढी’
यावेळी मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसवरदेखील हल्लाबोल केला. भाषणातून सामाजिक न्यायाच्या बाता करणा-या काँग्रेसने सामाजिक न्याय आपल्या कृतीत कधीच उतरविला नाही. पक्षातील नेते आपापसाांत भांडणे करण्यात व एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त आहे. ज्यांना पक्ष सांभाळल्या जात नाही, ते काय नागरिकांचा विकास करणार, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला.