'शिवसेना संपवण्यासाठी अनेक अफजलखान आले अन् उताणे पडले'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 07:58 AM2019-01-23T07:58:07+5:302019-01-23T08:00:13+5:30

शिवसेनेचा पंतप्रधान मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहांवर निशाणा

shiv sena slams pm narendra modi and bjp on balasaheb thackerays 93rd birth anniversary | 'शिवसेना संपवण्यासाठी अनेक अफजलखान आले अन् उताणे पडले'

'शिवसेना संपवण्यासाठी अनेक अफजलखान आले अन् उताणे पडले'

Next

मुंबई: शिवसेना संपविण्याचा विडा उचलून महाराष्ट्रात अनेक अफजलखान आले व उताणे पडले. शिवसेनेला राजकीय मैदानात ‘पटकण्या’ची पोकळ डरकाळी फोडणारेही काळाच्या ओघात नष्ट झाले, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि भाजपाला लक्ष्य केले आहे. आज शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांची 93 वी जयंती आहे. त्यानिमित्त लिहिलेल्या संपादकीय लेखात बाळासाहेबांना आदरांजली वाहत सामनामधून भाजपावर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत.

'शतके बदलतील, पिढ्या बदलतील, पण बाळासाहेबांचा जन्मदिवस साजरा होत राहील. यालाच अमरत्व म्हणतात. हे अमरत्व बाळासाहेब जन्मतःच सोबत घेऊन आले. बाळासाहेबांचा जन्म हा एका तेजाचा जन्म होता. म्हणून ‘तेज’ घेऊन शिवसेना आजही उभी आहे. शिवसेना संपविण्याचा विडा उचलून महाराष्ट्रात अनेक अफजलखान आले व उताणे पडले. शिवसेनेला राजकीय मैदानात ‘पटकण्या’ची पोकळ डरकाळी फोडणारेही काळाच्या ओघात नष्ट झाले. शिवसेना ही लेच्यापेच्यांची संघटना नाही,' अशा शब्दांमध्ये सामनामधून भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे. 

बाळासाहेब ठाकरेंनी प्रादेशिक पक्षांचे ओळखलेले महत्त्व, या पक्षांना राष्ट्रीय पक्षांकडून मिळणारी वागणूक यावरही शिवसेनेने भाष्य केले आहे. 'मुंबईत नोकरी-धंद्यात मराठी माणसाला सतत डावलण्यात आले. त्या वेदनेच्या ठिणगीतून शिवसेना जन्मास आली ती बाळासाहेबांचे तेज अंगी बाणवून. ‘ठाकरे देश तोडायला निघाले आहेत. जातीयता आणि प्रांतीयतेचे विष पसरवत आहेत. येथे प्रांतीय पक्षांना स्थान नाही.’ असे बोंबलणाऱ्यांत काँग्रेसचे व समाजवाद्यांचे बोंबले सगळ्यात पुढे होते. भूमिपुत्रांना त्यांच्या राज्यात हक्क मागणे हा गुन्हा ठरवण्यात आला, पण तोच गुन्हा पुढे राष्ट्रीय विचार बनून देशाच्या राजकीय आकाशात विजेप्रमाणे चमकत राहिला. प्रांतीय पक्ष म्हणून शिवसेना महाराष्ट्रातच नाही, तर देशाच्या राजकीय क्षितिजावर तळपत राहिली. आज देशाचे राजकारण सर्वार्थाने प्रांतीय पक्षांच्याच हातात गेले आहे व भाजपसारखे, काँग्रेससारखे राष्ट्रीय पक्षही याच प्रांतीय पक्षांच्या खांद्यावर बसून स्वतःची उंची वाढवत आहेत. काल-परवा ममतांच्या प. बंगालात 22 भाजपविरोधकांचा मेळावा झाला. हे सर्वच पक्ष प्रांतीय होते. भाजपही ज्या आघाडीचे नेतृत्व करीत आहे त्यातील सर्वच पक्ष हे प्रांतीय आहेत. या प्रांतीय पक्षांना गिळून ढेकर द्यायचे प्रयोग अपयशी ठरले तेव्हा त्यांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू झाले. या प्रांतीय अस्मितेचे जनक बाळासाहेब ठाकरेच आहेत, अशा शब्दांमध्ये बाळासाहेबांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. 

देशात हिंदुत्ववाद्यांचे सरकार आले. मात्र हिंदुत्व उघडे बोडके झाले, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने भाजपावर घणाघाती हल्ला चढवला आहे. 'हिंदुत्वच देशाला तारेल हा शिवसेनाप्रमुखांचा विचार. त्याच हिंदुत्वाने भाजपसारख्या पक्षांना दिल्लीच्या सिंहासनावर विराजमान केले. पण सिंहासनावर बसताच सिंहाची आयाळ झडू लागली व हिंदुत्व उघडे बोडके झाले. आता तर हिंदुत्वाचे मुसळ हिंदुत्ववाद्यांनीच केरात टाकले. अशा वेळी बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्व आम्हाला मार्ग दाखवते. देशाला दिशा नाही व विचारांची दशा झाली. देशाला आज मर्दांचे राज्य हवे आहे. त्या मर्दानगीतच राष्ट्रीयत्व आहे. आजही पाकिस्तान सीमेवर धडका मारीत आहे. कश्मीरात सैनिकांचे बलिदान सुरूच आहे आणि आपण ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’चे श्रेय घेत प्रचारकी जोश दाखवत आहोत. कोणत्याही सर्जिकल स्ट्राइकशिवाय अमरनाथ यात्रेवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना दे माय धरणी ठाय करून सोडणारे एकमेव शिवसेनाप्रमुखच होते. त्यांच्या शब्दांत धार होती. विचारांत आग होती. चालण्यात सिंहाचा डौल होता. त्यांनी लोकांना आत्मविश्वास दिला व मनगटात निखारे पेरले. त्यांनी सत्तेचा सारीपाट मांडला नाही. बुद्धिबळाची प्यादी हलवली नाहीत. ते सरळसोट होते. त्यांनी लपवाछपवीचा खेळ केला नाही. कारण विचार आणि कृतीत भेसळ नव्हती. या देशात मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती होणे कठीण नाही, पण बाळासाहेब ठाकरे फक्त जन्मावे लागतात', असे म्हणत बाळासाहेबांना आदरांजली वाहताना पंतप्रधान मोदींसह भाजपाचा अप्रत्यक्ष समाचार घेण्यात आला आहे. 
 

Web Title: shiv sena slams pm narendra modi and bjp on balasaheb thackerays 93rd birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.