मुंबई : महापालिका निवडणुकीच्या काळात शिवसेना नगरसेविका हेमांगी हेमंत चेंबूरकरला हॉटेल मालकाकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. तिच्यासह तिचा पीए राजाराम गोपाल रेडकरलाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
चेंबूरकर ही प्रभाग क्रमांक १९९ची विद्यमान नगरसेविका आहे. पालिकेच्या एफ दक्षिण आणि उत्तर वॉर्डची ती अध्यक्ष आहे. चेंबूरकरकडे ५९ वर्षीय तक्रारदार हॉटेल मालकाविरुद्ध तक्रार अर्ज आला होता. त्या अर्जावरून कारवाई न करण्यासाठी तिने त्यांच्याकडे २५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर १६ हजारांवर तडजोड झाली. तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार ठरल्याप्रमाणे मंगळवारी १६ हजारांची लाच घेताना चेंबूरकरला रंगेहाथ अटक करण्यात आली. यामध्ये १५ हजार चेंबूरकर घेणार होती तर १ हजार रुपये पीएला देण्याचा व्यवहार ठरला होता.