शिर्डी संस्थानकडून ७१ कोटींचं दान, चार वैद्यकीय महाविद्यालयांवर साईंची कृपा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 03:45 PM2018-06-21T15:45:30+5:302018-06-21T15:45:40+5:30

यवतमाळ, चंद्रपूर, औरंगाबाद आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयांना नवचैतन्य देण्यासाठी शिर्डी संस्थानने तब्बल ७१ कोटी रुपये दान केले आहेत.

shirdi sai baba sansthan donated rs 71 crores to four medical colleges | शिर्डी संस्थानकडून ७१ कोटींचं दान, चार वैद्यकीय महाविद्यालयांवर साईंची कृपा

शिर्डी संस्थानकडून ७१ कोटींचं दान, चार वैद्यकीय महाविद्यालयांवर साईंची कृपा

मुंबईः भक्तांच्या हाकेला धावून जाणारे बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या साईबाबांच्या कृपादृष्टीने राज्यातील चार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा कायापालट होणार आहे. यवतमाळ, चंद्रपूर, औरंगाबाद आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयांना नवचैतन्य देण्यासाठी शिर्डी संस्थानने तब्बल ७१ कोटी रुपये दान केले आहेत. संस्थानचे अध्यक्ष आणि भाजपा नेते सुरेश हावरे यांनी ही माहिती दिली. 

यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयाला १३ कोटी, नागपुरातील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजला ३५.३ कोटी, औरंगाबाद मेडिकल कॉलेजला १५ कोटी आणि चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाला ७.५ कोटी रुपयांचा निधी शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून दिला गेला आहे. ग्रामीण भागात जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यादृष्टीने काय करता येईल, या संदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत साई संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यानंतर, ही ७१ कोटींची मदत त्यांनी जाहीर केली आहे. 

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अद्ययावत एमआरआय आणि सिटी स्कॅन मशीन खरेदी करण्याचा प्रस्ताव साई संस्थानने वैद्यकीय शिक्षण विभागाला दिला आहे. आज अनेक महाविद्यालयांमध्ये मूलभूत उपकरणंही नसल्याचं दुर्दैवी चित्र आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय आणि रुग्णांनाही वेळेवर योग्य उपचार मिळू शकत नाहीत. हे चित्र बदलण्याच्या दृष्टीने साई संस्थानचं हे पाऊल निश्चितच अभिनव, आदर्श आहे.

देशातील श्रीमंत देवस्थानांच्या यादीत साई संस्थान वरच्या क्रमांकावर आहे. ट्रस्टच्या नावे २१०० कोटी रुपयांचे फिक्स डिपॉझिट आहे. त्यांचं वार्षिक उत्पन्न सुमारे ७०० कोटी रुपये असून संस्थानला दररोज साधारण एक कोटी रुपये दान-देणगीरूपाने मिळतात.

Web Title: shirdi sai baba sansthan donated rs 71 crores to four medical colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :shirdiशिर्डी