शंभूराजांच्या समाधीवर पुष्पवृष्टीसाठी लोटला शंभूभक्तांचा महासागर....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 06:55 PM2019-04-05T18:55:31+5:302019-04-05T19:01:27+5:30

राज्यभरातून असंख्य शंभूभक्त ज्योत घेऊन समाधीस्थळावर आगमन झाल्याने सर्वत्र ज्ञानोबा तुकाराम व छत्रपती संभाजीराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

Shambhu bhakta's ocean on Shambhu's Samadhi | शंभूराजांच्या समाधीवर पुष्पवृष्टीसाठी लोटला शंभूभक्तांचा महासागर....

शंभूराजांच्या समाधीवर पुष्पवृष्टीसाठी लोटला शंभूभक्तांचा महासागर....

ठळक मुद्देशासकीय मानवंदना, पुरस्कार वितरण व विविध कार्यक्रम

कोरेगाव भीमा : किल्ले शिवनेरी ते वढू पालखी,लाडक्या शंभूराजाला अभिवादनासाठी आणलेल्या ज्योती, भगव्या पताका, ध्वज  , आसमंत दुमदूमून टाकणारा लाडक्या शंभूराजाचा जयघोष, मंत्रोच्चार अशा भारावलेल्या वातावरणात राज्याच्या कानाकोपऱ्यातून धर्मवीर श्री छत्रपती संभाजीमहाराजांच्या ३३० व्या बलिदानस्मरण दिनानिमित्त श्री क्षेत्र वढू बुद्रूक (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (दि. ५ ) राज्यभरातून आलेल्या लाखो शंभूभक्तांची समाधीस्थळावर पुष्पवृष्टीसाठी आलोट गर्दी उसळली होती. यावेळी शासकीय मानवंदनाही देण्यात आल्याने कार्यक्रमाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. 
        छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३० व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे ग्रामपंचायत व धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात सकाळी साडेअकरा वाजता मंत्रोच्चारात पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी व्यंकोजीराजे भोसले (तंजावर) यांचे १४ वे वंशज प्रतापसिंह सरफोजीराजे भोसले, इतिहासकार पांडुरंग बलकवडे, हभप. चारुदत्त आफळे,  वढू बुद्रुकच्या सरपंच रेखा शिवले, उपसरपंच रमाकांत शिवले, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ तसेच लाखोंच्या संख्येने शंभूभक्त उपस्थित होते. त्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार समाधीस्थळावर पोलिसांनी शासकीय मानवंदना दिल्याने बलिदानस्मरण दिनास वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी पै. संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर संभाजीमहाराज पालखी सोहळा श्रीक्षेत्र किल्ले पुरंदर ते श्री क्षेत्र वढू बुद्रुक- तुळापूर, धर्मवीर संभाजीमहाराज प्रतिष्ठान गोदाकाठ येथून पालखी, श्री शिरूर-हवेली प्रासादिक दिंडीची संगमेश्वर ते वढू बुद्रुक पालखी, पुण्यातून हेगडेवार ज्योत, आईसाहेब आध्यात्मिक ज्ञानविज्ञान संस्था वाडे बोल्हाई यांची किल्ले शिवनेरी ते वढू पालखी व राज्यभरातून असंख्य शंभूभक्त ज्योत घेऊन समाधीस्थळावर आगमन झाल्याने सर्वत्र ज्ञानोबा तुकाराम व छत्रपती संभाजीराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. समाधिस्थळावर पालकमंत्री गिरीश बापट, खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार बाबूराव पाचर्णे, जगदीश मुळीक, सिनेअभिनेते अमोल कोल्हे, माजी आमदार अशोक पवार, बापू पठारे उपस्थित होते.  
     यावर्षीचा धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज पुरस्कार राष्ट्रीय कीर्तनकार ह भप चारुदत आफळे यांना, तर शंभूभक्त अशोक भंडलकर शंभूसेवा पुरस्कार नवी मुंबई येथील धर्मवीर शंभूराजे उत्सव मंडळ, शंभूभक्त डी.डी भंडारे शंभूसेवा पुरस्कार पुणे येथील श्रीरंग कला दर्पण यांना तर शंभूभक्त गेणू गणपत शिवले शंभूसेवा पुरस्कार तुळापूरचे माजी सरपंच ज्ञानेश्वर तुकाराम शिवले यांना प्रदान करण्यात आला.  विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना मृत्युंजय पुरस्कार जाहीर केला. 
    श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३० व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त धर्मसभेत चारुदत्त आफळे यांनी सांगितले की, शंभूछत्रपतींनी रामशेज किल्ला जिंकताना लाकडाची तोफ निर्माण केली. ही कामगिरी जगात अद्वितीय आहे. अशा पराक्रमी राजाकडून आपल्याला इंजिनिअरिंग , अर्थशास्त्र , उत्तम प्रशासकीय नेतृत्वाचे धडे तसेच महाराणी येसूबार्इंना राज्यकारभाराचा अधिकार देत स्त्रीवर्गाचा सन्मान केला, असे त्यांचे गुण अंगीकारण्याची वेळ आली आहे. पुढील काळात चातुर्मास, वैष्णवमास याप्रमाणे बलिदानमास देशभरात पाळला जाऊन शंभूछत्रपतींच्या इतिहासाचे पारायण केले तरच राजांना आदरांजली वाहिली जाईल, असे सांगितले. पांडुरंग बलकवडे यांनी शंभूछत्रपतींचा इतिहास शंभूभक्तांसमोर मांडला. 
         या धर्मसभेनंतर पोवाडा सादर करण्यात आला. समस्त ग्रामस्थ वढू बुद्रुक व धर्मवीर संभाजीराजे युवा मंच, जय गणेश ग्रुप यांच्या माध्यमातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सुनील आहेर, पंडित शिवले यांनी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. या वेळी स्वागत रेखा शिवले यांनी व प्रास्ताविक मिलिंद एकबोटे तर आभार रमाकांत शिवले यांनी मानले. सूत्रसंचालन श्रीकांत ढमढेरे यांनी केले.

........ 
शंभूतीर्थ वढू बुद्रुकला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या. 
          शंभूछत्रपतींचे समाधिस्थळ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक याठिकाणी ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा असून, तो ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, शासनाकडे  ब वर्गाचा दर्जा देण्याची मागणी माजी सरपंच प्रफुल्ल शिवले व सरपंच रेखा शिवले यांनी केली.
.................
 शंभूछत्रपतींच्या समाधीला ३०० वर्षे पूर्ण...
      शंभूछत्रपतींच्या बलिदानानंतर औरंगजेबच्या कैदेतून सुटून त्या १७१९ रोजी प्रथम श्रीक्षेत्र वढू बुद्रुक याठिकाणी येऊन शंभूछत्रपतींच्या अंत्यसंस्काराचा कलश शोधून त्याठिकाणी तुळशीवृंदावन बांधून राजांची समाधी बांधली. याला आज ३०० वर्षे पूर्ण झाली असल्याचे मिलिंद एकबोटे यांनी सांगितले.

Web Title: Shambhu bhakta's ocean on Shambhu's Samadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.