ऑनलाइन लोकमत 
अहमदनगर, दि. 30 - ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री  बाळासाहेब विखे पाटील यांचे आज संध्याकाळी  दीर्घ आजाराने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.  प्रवरानगर येथील राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. महाराष्ट्रातील  सहकार क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या बाळासाहेब विखेंनी अहमदनगर आणि कोपरगाव लोकसभा मतदार संघाचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले होते. तसेच त्यांनी  रालोआ सरकारमध्ये वित्तराज्यमंत्री आणि  अवजड उद्योगमंत्री म्हणूनही काम पाहिले होते.  विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे ते वडील होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता प्रवरानगर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
एकनाथराव ऊर्फ बाळासाहेब विखे-पाटील हे महाराष्ट्रात सहकाराची मुहुर्तमेढ रोवणाऱ्यांपैकी एक असलेले विठ्ठलराव विखे पाटील यांचे ते ज्येष्ठ सुपुत्र होते. त्यांचा जन्म 10 एप्रिल 1932 रोजी  अहमदनगर जिल्ह्यात झाला. त्यांना सहकार आणि राजकारणाचे धडे घरीच मिळाले.  कृषी आणि सहकार क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या बाळासाहेब विखे पाटलांनी  1971 ते ते 1991 या काळात सलग 20 वर्षे लोकसभेच्या  कोपरगाव मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर 1998 ते 99 या काळात त्यांनी अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. तर 1999 ते 2009 या काळात त्यांनी पुन्हा एकदा कोपरगाव लोकसबभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले होते. 
दरम्यानच्या काळात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयींच्या रालोआ सरकारमध्ये त्यांनी वित्तराज्यमंत्री आणि अवजड उद्योग मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले. दीर्घकाळ राजकारणात असलेल्या विखे-पाटलांनी विविध सहकारी आणि इतर संघटनांचे अध्यक्षपही भूषवले होते.  दरम्यान,  गेल्या काही काळापासून ते आजारी  होते. अखेर आज त्यांची जीवनयात्रा संपली.