उपरच्या वा-यामुळे समुद्र खवळला, किना-यावर वादळसदृश स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2018 06:13 PM2018-05-27T18:13:06+5:302018-05-27T18:15:36+5:30

उपरच्या वा-यामुळे समुद्र खवळला असून महाकाय लाटा किना-यावर धडकत आहेत. समुद्रात वादळसदृश वातावरण निर्माण झाल्यामुळे मच्छीमारी व्यवसाय बंद आहे.

Sea overwhelmed due to above-grounds, stormy winds in the ocean | उपरच्या वा-यामुळे समुद्र खवळला, किना-यावर वादळसदृश स्थिती

उपरच्या वा-यामुळे समुद्र खवळला, किना-यावर वादळसदृश स्थिती

googlenewsNext

देवगड : उपरच्या वा-यामुळे समुद्र खवळला असून महाकाय लाटा किना-यावर धडकत आहेत. समुद्रात वादळसदृश वातावरण निर्माण झाल्यामुळे मच्छीमारी व्यवसाय बंद आहे. १ जूनपासून समुद्रातील मासेमारी पूर्णत: बंद होणार आहे. मात्र शेवटच्या चार दिवसांतच मच्छीमार नौकांना वातावरणाचा फटका बसत आहे. त्यामुळे चार दिवसांतच मच्छीमारी हंगाम संपण्याच्या मार्गावर असून त्यादृष्टीने मच्छीमार आवराआवरीच्या तयारीला लागले आहेत.

मच्छीमारी हंगामाच्या अंतिम टप्प्यात यांत्रिक नौकांना  कोळंबी व लेप ही मासळी मिळत होती. मात्र मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे दर वधारले आहेत. त्यामुळे खवय्यांनी खाडीतील मासळी, मुळे, कालवे व सुकी मासळी विकत घेण्यावर भर दिला आहे. मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे नौका किना-यावर घेण्याचा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

मच्छीमार आता हंगाम संपत आल्याने जाळी धुणे, ती सुकविणे, फायबर पाती किना-यावर घेणे, ट्रॉलर्स किना-यावर घेणे व त्यानंतर त्यांची शाकारणी करणे आदी कामे करण्याच्या तयारीला लागले आहेत. हवामानाच्या अंदाजानुसार, मालवण ते वसई या किनाऱ्यांवर ०३ ते ०३.२ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात जाऊ नये, असा इशारा भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेला आहे. याबाबतच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, सिंधुदुर्ग यांनी तालुका पातळीवर दिल्या आहेत.अरबी समुद्रात पोषक वातावरण असल्यामुळे मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. वातावरण असेच पोषक राहिल्यास २९ मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होईल. त्यानंतर आठ दिवसांत मान्सून गोवा व सिंधुदुर्गात धडक देईल. अशी माहिती हवामान तज्ज्ञ दिनेश मिश्रा यांनी दिली. मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर त्याचा परिणाम मालवण किनारपट्टीवर झाला आहे. समुद्रात लाटांची उंची वाढली असून किनारपट्टीवर वाऱ्यांनीही जोर धरला आहे.

Web Title: Sea overwhelmed due to above-grounds, stormy winds in the ocean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.