The schools do not have a holiday tomorrow, but only the school bus is closed | उद्या शाळांना सुट्टी नाही, मात्र स्कूल बस बंदच

मुंबई- भीमा कोरेगाव तणावाचे पडसाद मुंबई उपनगरांसह अनेक भागात उमटले आहेत. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर उद्या स्कूल बस मालक-चालक संघटनेनं स्कूल बस न चालवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु शाळा मात्र सुरूच राहणार आहेत. शाळांना सुट्टी देण्यास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नकार दिल्याची माहिती मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली आहे.

उद्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, वसई-विरार जिल्ह्यातील शाळा सुरू असतील, असेही  चव्हाण यांनी लोकमतला सांगितले. परंतु शहरातील सद्यस्थिती पाहता शाळेतील मुलांची सुरक्षितता आणि बसचे रक्षण करण्यासाठी सकाळच्या सत्रात स्कूल बस धावणार नाही, असा निर्णय स्कूल बस मालक-चालक संघटनेनं घेतला आहे.

बुधवारी सकाळची परिस्थिती पाहून दुपारच्या सत्रातील स्कूल बस चालवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. वैयक्तिक विद्यार्थी वाहतूक करणा-यांनी परिस्थिती पाहून वाहतुकीबाबत निर्णय घ्यावा, अशी माहिती स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली आहे.