मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या नावाने असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळात कर्जवाटपासह विविध प्रकारणांमध्ये गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे लोकमतच्या हाती आली आहेत. या प्रकरणी महामंडळाचे तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक रमेश बनसोड वादाच्या भोवºयात सापडण्याची शक्यता आहे.
विमुक्त जाती, भटक्या जमातीतील व्यक्तींना व्यवसाय, उद्योगांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची महामंडळाची योजना आहे. हे कर्ज ज्या व्यक्तींच्या नावे उचलण्यात आले त्यांना ते न मिळता गारमेंट कंपन्या, इलेक्ट्रिकल साहित्याचे विक्रेते अशांच्या खात्यात लाखोच्या रकमा जमा झाल्याचेही प्रकार घडले आहेत.
हे महामंडळ वर्षानुवर्षे सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित होते. तथापि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मंत्रालयाची स्थापना नव्याने केली आणि हे महामंडळ नवीन मंत्रालयाशी जोडण्यात आल्यानंतर २०१२ ते २०१७ या काळात झालेली भ्रष्टाचाराची एकेक गंभीर प्रकरणे समोर येत आहेत. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलिप कांबळे यांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रमेश बनसोड यांना निलंबित करण्याची घोषणा विधिमंडळात केली होती. तरीही ते वर्षभर निलंबित झाले नाहीत इतका त्यांना वरदहस्त होता. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करीत त्यांना निलंबित केले.
३ जुलै ते ११ जुलै २०१७ या केवळ नऊ दिवसांत करण्यात आलेले चार कोटी रुपयांचे कर्जवाटप आणि महामंडळात झालेली नोकरभरतीही चौकशीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचाराला विरोध करणाºया अधिकाºयांना रक्त निघेपर्यंत मारहाण केली जात असल्याचे धक्कादायक प्रकारदेखील महामंडळात घडले आहेत.