sangli sadbhavna rally 14 years school girl fainted and died | सांगली : सद्भावना एकता रॅलीत 14 वर्षीय शाळकरी मुलीचा चक्कर येऊन मृत्यू

सांगली : मकर संक्रांतीचे औचित्य साधून सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सांगलीत रविवारी आयोजित केलेल्या सद्भावना एकता रॅलीनंतर ऐश्वर्या शाशिकांत कांबळे (वय १४, रा. राजवाडा चौक, सांगली) या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. रॅली संपवून घरी जाताना स्टेशन चौकात चक्कर आल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे कर्मवीर चौकातून सकाळी नऊ वाजता रॅलीस प्रारंभ झाला. या रॅलीत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांच्यासह सांगली, मिरजेतील विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. शहरातील विविध मार्गावरून फिरून रॅली छत्रपती शिवाजी स्टेडियमवर गेली. तिथे एकतेची शपथ दिल्यानंतर रॅलीचा समारोप झाला.

रॅली संपल्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन निघाले होते. ऐश्वर्या कांबळेही शिक्षक विद्यार्थ्यांसोबत स्टेशन चौकमार्गे घरी निघाली होती. विठ्ठल मंदिरजवळ चक्कर आल्याने ती रस्त्यावर खाली बसली. शिक्षकांनी तिच्या प्रकृतीची चौकशी केली. तिने वडिलांचा मोबाईल क्रमांक देऊन त्यांना बोलावून घेण्यास सांगितले. तोपर्यंत ऐश्वर्याची प्रकृती अधिकच अत्यवस्थ बनली. त्यामुळे तिला रुग्णवाहिकेमधून उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांनी रुग्णालयास भेट दिली. नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले. रुग्णालयात मोठी गर्दी झाल्याने पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
दोन दिवसापासून आजारी
ऐश्वर्या गेल्या दोन दिवसापासून आजारी होती. तिला ताप व उलट्यांचा त्रास सुरु होता. वडिलांनी तिला शाळेला तसेच एकता रॅलीत जाऊ नकोस, असे सांगितले होते. पण तरीही ती रॅलीत सहभागी झाली होती. पण रॅली संपवून घरी जाताना तिला चक्कर आली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तिच्या नातेवाईकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. तिचे कुटूंब राजवाडा चौकालगत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी वसाहतमध्ये राहते.
घटना दुर्दैवी
जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील म्हणाले, ऐश्वर्याच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ती गेले दोन दिवस आजारी होती. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर तिच्या मृत्यूचे कारण समजू शकेल.