Sandeep Deshpande, along with MNS workers in police custody, attacked the Congress office | संदीप देशपांडेंसह मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, कॉंग्रेस कार्यालयावर हल्ला प्रकरण

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेचे नेता संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशपांडेंसह पोलिसांनी मनसेच्या 7 ते 8 कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं आहे.

मुंबईत परप्रांतीयांच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील संघर्ष पेटला आहे. शुक्रवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला. आज सकाळी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. मात्र हा हल्ला कोणी केला, याबाबत चर्चा सुरु असताना, स्वत: संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन, त्याबाबत स्पष्टीकरण दिलं.  

‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक केला असून इट का जवाब पथ्थर से मिलेगा’, असं ट्विट मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी केलं. त्यावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी करारा जवाब मिलेगा असं म्हणत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून संजय निरुपम यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 'मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी, कोणी नसल्याचं बघून आमच्या पक्ष मुख्यालयाची तोडफोड केली. पोलीस स्टेशन फक्त 25 मीटर अंतरावर आहे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली नाही तर चोख उत्तर देण्यात येईल', असा इशारा संजय निरुपम यांनी दिला आहे. संजय निरुपम सध्या गुजरातमध्ये आहेत.

आज सकाळीच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच्या काँग्रेस कार्यालयाची नासधूस करण्यात आली. आझाद मैदानाजवळ काँग्रेसचं कार्यालय आहे. या कार्यालयात घुसून मनसेने काँग्रेस कार्यालयाच्या काचा फोडल्या.