Sachin Tendulkar fills up: Welcome to the Goddess of cricket! | सचिन तेंडुलकर भारावला : क्रिकेटच्या देवाचे गुढी उभारून स्वागत!

उस्मानाबाद : सांसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतलेल्या डोंजा (जि़उस्मानाबाद) गावात मंगळवारी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे ग्रामस्थांनी घरासमोर रांगोळी काढून व गुढी उभारुन स्वागत केले. मैदानावरील आपला झंझावात मंगळवारी सचिनने येथेही दाखविला़ ४ कोटींच्या खासदार निधीतून केलेल्या कामांची पाहणी करीत विद्यार्थ्यांसोबत क्रिकेटचा आनंदही त्याने लुटला.
८६ लाख ३९ हजार रुपये खर्चून सुरू असलेल्या जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम पाहिले़ शाळेत मुलांसोबत धमाल मस्ती करताना अभ्यास करण्याचा व गुरुजी, आई-वडिलांचा आदर करण्याचा सल्ला त्याने दिला़ ९९ लाख १६ हजार रुपयांची पाणी पुरवठा योजना व २ कोटी २१ लाख ७७ हजार रुपये खर्चून केलेल्या अंतर्गत रस्त्यांच्या कामाची त्याने पाहणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधला़
शाळा मला आवडते़़़
शाळा मला खूप आवडते़ कारण, शाळेत खूप मस्ती करता येते़ विद्यार्थ्यांनो तुम्हीही मस्ती करा़ खेळा, अभ्यास करा़ तुमचे गुरुजी, आई-वडील यांचा आदर करा़ त्यांचे सांगणे ऐका़ स्वप्ने बाळगा.त्याचा पाठलाग करा. यश नक्की मिळेल़ तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल, याची मला खात्री असल्याचे सचिनने सांगितले.
पिचभोवतीही गराडा-
क्रिकेटच्या मैदानावर जाऊन सचिनने विद्यार्थ्यांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला़ मैदान गच्च भरले होते़ अगदी पिचभोवतीही चाहत्यांचा गराडा पडल्याने सचिनला मनसोक्त टोलेबाजी करता आली नाही़
घरांसमोर रांगोळ््या, गुढी
सचिनच्या स्वागतासाठी प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आली होती. गुढी उभारली होती. सचिनचे आगमन झाल्यानंतर महिलांनी त्याचे औक्षण केले़ सभास्थळावर टाळ-मृदंग व हरिनामाचा गजर सुरू होता. स्वागताने सचिन भारावून गेला होता़