धावणा-या मुंबईला पाऊसब्रेक, ५१ विमाने वळविली; दोन दिवसांत पश्चिम रेल्वेच्या १२६ फे-यांसह १४ एक्स्प्रेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 05:14 AM2017-09-21T05:14:03+5:302017-09-21T05:14:06+5:30

सतत धावणारी नगरी. येथे थांबायला कुणालाच वेळ नसतो. पोटापाण्यासाठी पायाला चाकं लावल्याप्रमाणे मुंबईकर धावपळ करत असतात. मात्र, मंगळवारी पावसाने मुंबईवर अतिकृपा केली आणि रेल्वेसह रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. पावसामुळे मुंबई विमानतळावरील ‘स्पाइस जेट’चे विमान घसरून चिखलात रुतले अन् हवाई वाहतूकही कोलमडली.

The run-of-the-clock 51 windscreens in Mumbai; 14 trains on Western Railway's 126 fairs canceled in two days | धावणा-या मुंबईला पाऊसब्रेक, ५१ विमाने वळविली; दोन दिवसांत पश्चिम रेल्वेच्या १२६ फे-यांसह १४ एक्स्प्रेस रद्द

धावणा-या मुंबईला पाऊसब्रेक, ५१ विमाने वळविली; दोन दिवसांत पश्चिम रेल्वेच्या १२६ फे-यांसह १४ एक्स्प्रेस रद्द

Next

मुंबई- सतत धावणारी नगरी. येथे थांबायला कुणालाच वेळ नसतो. पोटापाण्यासाठी पायाला चाकं लावल्याप्रमाणे मुंबईकर धावपळ करत असतात. मात्र, मंगळवारी पावसाने मुंबईवर अतिकृपा केली आणि रेल्वेसह रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. पावसामुळे मुंबई विमानतळावरील ‘स्पाइस जेट’चे विमान घसरून चिखलात रुतले अन् हवाई वाहतूकही कोलमडली.
बुधवारी सकाळीही पावसाचा जोर कायम होता. घाबरून अनेक मुंबईकरांनी घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवाही जीवनाला पाऊसब्रेक लागला. मंगळवारी दुपारपासून मुंबई शहर आणि उपनगरात सुरू झालेल्या पावसाने बुधवारीही आपला मारा कायम ठेवला. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी पावसाचा जोर किंचित ओसरला असला तरी ठिकठिकाणी संततधार कायम असल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली. सलग दोन दिवस कोसळणा-या पावसाचा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीसह विमान सेवेला मोठा फटका बसला. मुंबईत विमानतळाचा मुख्य रनवे बंद असल्याने १८३ विमान उड्डाणे रद्द करण्यात आली; तर खराब हवामानामुळे धिम्या गतीने विमानांचे उड्डाण आणि लँडिंग सुरू होते. सलग कोसळणा-या पावसाची सांताक्रुझ वेधशाळेत ३०३.७ मिलीमीटर एवढी नोंद झाली आहे. दुसरीकडे येत्या २४ तासांसाठी पावसाचा मारा सुरू राहील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला असून, हा अंदाज खरा ठरला तर गुरुवारी दुपारी १२.३६ वाजताच्या भरतीमुळे मुंबई पुन्हा पाण्यात जाण्याची भीती आहे.
मुंबईत सलग दोन दिवस लागून राहिलेल्या पावसामुळे हिंदमाता, सायन रोड क्रमांक २४, वीरा देसाई रोड, एअर इंडिया कॉलनी, मिलन सबवे, अंधेरी सबवे, वांद्रे येथील नॅशनल कॉलेज, कोहिनूर सिटी मॉल, रमाबाई आंबेडकर नगर, चेंबूर येथील शेल कॉलनी, मानखुर्द, कुर्ला येथील शीतल आणि कमानी सिग्नल, अंधेरी येथील मरोळ, कुर्ला पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसर, विद्याविहार पश्चिम येथील रेल्वे स्थानक परिसर, माटुंगा येथील गांधी मार्केटसह सखल भागात पाणी साचले होते. परिणामी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला-अंधेरी रोड, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गासह शहर आणि उपनगरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहनांचा वेग कमी झाला होता. बुधवारी सकाळपर्यंत सर्वत्रच अशी परिस्थिती असताना कालांतराने पावसाचा जोर ओसरला. पावसाचा जोर ओसरताना ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा झाल्याने रस्ते वाहतूक दुपारनंतर पूर्वपदावर आली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी रस्त्यावर उतरलेल्या वाहनांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने दुपारसह सायंकाळी रस्ते वाहतूक वेगाने सुरू होती.
>विमान वाहतुकीचे ‘पाणी’पत
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात कोसळणाºया मुसळधार पावसात रेल्वे वाहतूक सुरू राहिली पण विमानसेवेचा बो-या वाजला आहे. मुसळधार पाऊस व मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ‘स्पाइस जेट’चे विमान घसरून चिखलात रुतल्याने बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुंबई विमानतळावरील एकूण १८३ उड्डाणे रद्द करण्यात आली. तर ५१ विमाने अन्यत्र वळविण्यात आली.
अतिवृष्टीमुळे एरवी रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. मात्र दोन दिवस सुरू असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका हवाई वाहतुकीला बसला. मंगळवारी रात्री १० वाजून ५ मिनिटांनी ‘स्पाइस जेट’चे वाराणसी-मुंबई विमान धावपट्टीवरून घसरले. यावेळी विमानात १८३ प्रवासी होते. विमानाचे चाक धावपट्टी शेजारील चिखलात रुतले. यामुळे धावपट्टी बाधित
झाली. बुधवारी रात्री ९.३८च्या सुमारास रुतलेले विमान बाहेर काढण्यात यश मिळाले.मुसळधार पावसामुळे विमानतळावरील हवाई वाहतूक थांबवण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने घेतला. बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ५१ विमाने वळविण्यात आली तर १०८ विमान उड्डाने रद्द करण्यात आली.
तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणखी ७५ विमानांचे उड्डाणे रद्द झाले. याचा आर्थिक फटका प्रवाशांना बसू नये यासाठी जवळपास सर्व विमानसेवा कंपन्यांनी तिकिटाचे पैसे परत देणे, प्रवाशांना कोणत्याही शुल्काशिवाय विमानांच्या तिकिटाटे आरक्षण रद्द करण्याची मुभा देण्याचे जाहीर केले.
>हॉलीडे स्पेशल वेळापत्रक
बुधवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्यामुळे, मध्य रेल्वेवर हॉलीडे-स्पेशल वेळापत्रकाप्रमाणे लोकल चालविण्यात आल्या. मध्य रेल्वे, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या.
>गुरुवारी रद्द केलेल्या एक्स्प्रेस
मनमाड-सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस
सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्स्प्रेस
सीएसएमटी-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस
पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस
पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस
वळविण्यात आलेल्या एक्स्प्रेस
भुसावळ-पुणे एक्स्प्रेस
पुणे-भुसावळ एक्स्प्रेस
अंशत: रद्द केलेल्या एक्स्प्रेस
मनमाड-एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस (नाशिक रोड ते एलटीटी)
एलटीटी-मनमाड गोदावरी एक्सप्रेस (एलटीटी ते नाशिक रोड)
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भांडुप येथील खिंडीपाड्यामध्ये साईनाथ मित्र मंडळाजवळील कब्रस्तानजवळ आठ घरांवर दरडीचा भाग कोसळल्याची घटना घडली. या घटनेत जखमी झालेल्या दोन व्यक्तींना परिसरातील नागरिकांनी बाहेर काढून मुलुंड येथील महापालिकेच्या मुलुंड सर्वसाधारण रुग्णालयात दाखल केले. विजयंदर जैसवाल आणि कृष्णा यादव अशी जखमींची नावे असून, जखमींची प्रकृती स्थिर आहे.
मंगळवारी रात्री मिठी नदीची पातळी २.८ मीटर एवढी वाढल्याने कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ८० ते १०० रहिवाशांना बैलबाजार महापालिका शाळा आणि कराची खासगी शाळेत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले.
बुधवारी सकाळी ६ वाजता रहिवासी आपापल्या घरी परतले. पावसाच्या सलग माºयामुळे पडझडीच्या घटनांत वाढच झाली असून, २१ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. १६८ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. तर पाच ठिकाणी बांधकामांचा भाग पडल्याच्या घटना घडल्या.
कृषी व्यापारास पावसाचा फटका
राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका कृषी व्यापारास बसला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये ५,१३८ टन भाजीपाल्याची आवक झाली. यामधील १५० टन मालाची विक्रीच झाली नाही. ५० टनपेक्षा जास्त माल पावसात सडल्याने फेकावा लागला.
मुंबई बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये मध्यरात्रीपासून कृषी मालाची आवक सुरू झाली. सकाळी १० वाजेपर्यंत ९९ ट्रक, ४८६ टेम्पोंमधून तब्बल ५,१३८ टन मालाची आवक झाली.
मुंबईमध्ये मुसळधार पाऊस असल्याने, किरकोळ विक्रेते खरेदी करण्यासाठी फिरकलेच नाहीत. सकाळी ११ वाजेपर्यंत फक्त १११ टेम्पोंमधून माल मुंबईत विक्रीसाठी गेला होता. दुपारी पावसाचा जोर कमी झाल्याने, ग्राहकांची संख्या वाढली.
दिवसभरामध्ये १५० टन मालाची विक्री झालीच नाही. तो गुरुवारी कमी दराने विकावा लागला. बाजार समितीच्या कांदा-बटाटा, धान्य, फळे व मसाला मार्केटमध्येही ग्राहकांची संख्या कमीच होती. दोन दिवसांच्या पावसामुळे व्यवहारावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला.
>गती मंदावली
वरुण राजाच्या अतिकृपादृष्टीमुळे रेल्वेसह एक्स्प्रेसची चांगलीच कोंडी झाली. अतिवृष्टीमुळे मुंबईकडे येणाºया आणि मुंबईतून सुटणाºया एकूण १८ एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले. यापैकी १४ एक्स्प्रेस पूर्णत: रद्द करण्यात आल्या,
२ एक्स्प्रेस अंशत: रद्द करण्यात आल्या, तर उर्वरित २ एक्स्प्रेस पर्यायी मार्गावरून वळविण्यात आल्या. दुसरीकडे मंगळवार व बुधवार असे दोन दिवस पश्चिम रेल्वेच्या १२६ लोकल फेºयाही रद्द करण्यात आल्या.
मध्य रेल्वेने आपत्कालीन कक्षाशी संपर्कात राहून, लोकल फेºयांचे चोख नियोजन केले. २९ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मध्य रेल्वे प्रशासनाच्या ३२ लोकलच्या यंत्रणेत पाणी गेल्याने त्या निकामी झाल्या. मात्र, मंगळवारसह बुधवारी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला. त्यानुसार, रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी बैठक घेतली. २९ आॅगस्टची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, सायन, मस्जिद, कुर्ला कार शेड, चुनाभट्टी अशा ठिकाणी एकूण ३८ उपसा पंप कार्यान्वित केले. त्यामुळे पाण्याचा निचरा लवकर झाला, तरीही लोकलची गती मंदावली. लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या.
दुसरीकडे पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना पावसाचा सर्वाधिक फटका बसल्याचे दिसून आले. चर्चगेट येथून मंगळवारी रात्री
१० वाजून ५६ मिनिटांनी सुटलेली विरार जलद लोकल बुधवारी पहाटे ५ वाजता विरार स्थानकात पोहोचली. साधारणपणे ही लोकल १२ वाजून २ मिनिटांनी पोहोचणे अपेक्षित असते. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे ही लोकल पहाटे ५ वाजता विरारला पोहोचली.

Web Title: The run-of-the-clock 51 windscreens in Mumbai; 14 trains on Western Railway's 126 fairs canceled in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.