ठळक मुद्देस्त्रियांकडून सलग चार ते पाच गुरूवार ही लक्ष्मीपूजा केली जाते.त्यात श्रीफळाची देवी मांडली जाते आणि त्याचं पूजन केलं जातं.आपल्या कुटूंबाच्या भरभराटीसाठी आणि संपन्नतेसाठी हे उपवास केले जातात.

मुंबई : आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार. मार्गशीर्षचे उपवास करण्यामागे अनेक स्त्रियांच्या वेगवेगळ्या भावभावना आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी श्रद्धा आहे. धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव टिकून राहावी, घरात वैभव नांदावे याकरता महिला मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी लक्ष्मीची घटस्थापना करतात. त्याचप्रमाणे उपवासही केला जातो. पोथी वाचली जाते. या पोथीतून सांगण्यात आलेली कथा म्हणजे जीवनात कसं वागावं याविषयी दिलेली माहिती आहे. कोणत्याही गोष्टीचा गर्व  करू नये. सत्ता, संपत्ती कितीही वाढली तरीही आपले पाय जमिनीवर ठेवूनच समाजात वावरायला हवं, नाहीतर गर्वाने आपलीच कशी माती होते याविषयी एक छान कथा या पोथीच सांगण्यात आली आहे. 

आणखी वाचा - जाणून घ्या प्रदक्षिणाशास्त्राचे महत्त्व

का करतात ही पूजा ?

श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा-शांती-समाधान घरात नांदावे; म्हणून श्रीमहालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्रीमहालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वांभूती असलेल्या श्रीमहालक्ष्मीची ध्यानी घ्यावी.

आणखी वाचा - कायम दु:खाची ‘वजाबाकी’ करावी! म्हणजे सुखाची ‘बेरीज’ होते!

कशी कराल पूजा ?

कोणतेही पूजा भक्तीभावने आणि श्रद्धेने केली की ती फळते. त्यामुळे ही पूजासुद्धा शुद्ध मनाने केल्यास महालक्ष्मी देवीचा निश्चितच भक्तांना आशीर्वाद मिळतो. सर्वप्रथम घर स्वच्छ करून घ्यावे. ज्या ठिकाणी घटस्थापना करणार आहात, ती जागाही स्वच्छ पूसून घ्यावी. शक्यतो देवीची स्थापना करताना देवीचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असायला हवे. ज्याठिकाणी पूजा मांडणार आहात, ती जागा स्वच्छ शेणाने  सारवून घ्यावी. पूजेच्या जगेवर पाट किंवा चौरंग ठेवावा. चौरंगाच्या बाजूने रांगोळी साकारून घ्यावी. चौरंगावर नवं कापड अंथरावं. काही महिला नवं कोरं खण किंवा ब्लाऊज पीस अंथरतात. या कपड्यावर गहू आणि तांदूळ यांची रास घालावी. त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. या कलशामध्ये दूर्वा, पैसा आणि सुपारी ठेवावे. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी कलशावर ठेवावी आणि त्यावर नारळ ठेवावा. हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूंनी लावावीत. कलश छान सजवून झाला की चौरंगावर लक्ष्मीची मूर्ती अथवा देवीचा फोटो ठेवावा. मूर्तीपुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, पाच फळे, खडीसाखर ठेवावे. तसेच चौरंगावर गणपती म्हणून सुपारी मांडावी. पूजेची अशी मांडणी पूर्ण झाल्यावर त्याची यथासांग पूजा करून घ्यावी. पूजेनंतर आरती करावी. सर्वांना प्रसाद द्यावा. देवीच्या चौरंगावर पाट मांडून त्यावर बसून श्रीमहालक्ष्मीची व्रताची कथा वाचावी. नंतर श्रीमहालक्ष्मी माहात्म्य वाचावे. वाचताना किंवा दुसऱ्याकडून वाचून घेताना मन एकाग्र करावे. यानंतर महालक्ष्मीचे पोथी पुराणाचे वाचन करून घ्यावे. शांत चित्ताने, मन लावून ही पोथी वाचल्यास लक्ष्मी पावते अशी सगळ्यांची भावना आहे. त्यामुळे मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी भाविक महिला ही पोथी वाचतात. यानंतर रात्री महालक्ष्मीला गोड नैवेद्य द्यावा. गायीला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गायीला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे.

आणखी वाचा - भक्तीला ज्ञानाची जोड हवीच! मुक्ताईची डोळस भक्ती...

 

दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठावं. पूजा विसर्जित करण्यासाठी स्नान करून कलशातील पाणी तुळशीस घालावे. तुळशीला हळदी-कुंकू वाहून नमस्कार करून घ्यावा. कलशातील डहाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावीत. देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी-कुंकू वाहून नमस्कार करून घ्यावा.