तर उरलेले उंदीर २०१९ मध्ये सरकारचे सिंहासनही पोखरणार - विखे-पाटील यांची बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 04:08 PM2018-03-28T16:08:50+5:302018-03-28T16:08:50+5:30

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज उंदीर घोटाळ्याचा संदर्भ वापरत सरकारवर तुफानी टोलेबाजी केली.

The rest of the rats will be the throne of the government in 2019 - Vikhe-Patil's remarks | तर उरलेले उंदीर २०१९ मध्ये सरकारचे सिंहासनही पोखरणार - विखे-पाटील यांची बोचरी टीका 

तर उरलेले उंदीर २०१९ मध्ये सरकारचे सिंहासनही पोखरणार - विखे-पाटील यांची बोचरी टीका 

Next

 मुंबई -  विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज उंदीर घोटाळ्याचा संदर्भ वापरत सरकारवर तुफानी टोलेबाजी केली. ''एकाचे अनेक अशा असंख्य उंदरांचा सुळसुळाट राज्यात गेले ४ वर्षे सुरू आहे. या उंदरांवर 'कडी नजर' ठेऊन, सरकारचे उंदरांच्या निर्मूलनातील अपयश वेळोवेळी दाखवून द्यायला सत्तेतीलच काही 'बोकेही' तयार झाले आहेत. वेळीच या उंदरांचे निर्मूलन केले नाही तर, या बोक्यांची संख्याही वाढत जाईल. या उंदरांनी गेले ४ वर्षे जो उच्छाद मांडला आहे, तेच उंदीर राज्य तर पोखरतीलच, पण २०१९ ला सरकारची मते कुरतडल्याशिवाय आणि सिंहासन पोखरल्याशिवाय राहणार नाहीत, अशी खरमरीत टीका विखे-पाटील यांनी केली.  

सरकारचा गैरकारभार आणि उंदीर घोटाळ्याची अफलातून सांगड घालून त्यांनी भाजप-शिवसेना सरकारच्या कारभाराची लक्तरे अक्षरशः वेशीवर टांगली. गेल्या आठवड्यात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर घोटाळा समोर आणला होता. तोच धागा धरून विखे पाटील विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावाच्या भाषणातून सरकारवर जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले, ''मंत्रालयातील उंदरांना मारण्यासाठीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या विशेष मोहिमेचा मागील आठवड्यात एकनाथ खडसे यांनी पर्दाफाश केला होता. सरकारचे ते उंदीर निर्मूलनाचे टेंडर फसले असले तरी मी आज मी सरकारसमोर एक नवे टेंडर सादर करतो. या टेंडरचा गांभीर्यांने विचार करून ते लवकरात लवकर स्वीकृत केले पाहिजे. एकनाथ खडसे मंत्रालयात मारल्या गेलेल्या ३ लाख १९ हजार ४००.५७ उंदरांबाबत बोलले. माझे नवीन टेंडर राज्यात आजही हैदोस घालणाऱ्या आणि अजूनही मारायचे शिल्लक असलेल्या उंदरांबाबत आहेत. मेलेल्या ३ लाख १९ हजार ४००.५७ उंदरांव्यतिरिक्त आजही अनेक उंदीर मंत्रालयात हैदोस घालीत आहेत. तर काहींचा महापालिकेत सुळसुळाट झाला आहे.'' 

'' सरकारच्या विविध योजनांत हे उंदीर घुसले आहे. काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निधी कुडतरत आहेत. काही मेक इन महाराष्ट्र, स्टार्ट अप इंडिया, डिजिटल महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र यासारख्या नव्या व डोळे दिपवणाऱ्या कार्यक्रमांमध्येही ते घुसले आहेत. काही उंदीर कुपोषित बालकांचा पोषण आहार फस्त करतात. तर काही उंदीर आदिवासी मुलांसाठीचे स्वेटर आणि रेनकोटही कुडतरतात.  काही उंदरांनी पकडले जाण्याच्या भीतीने जलयुक्त शिवारच्या जलसाठ्यात उडया घेतल्यात.  काही उंदीर चंद्रकांत पाटील यांच्या 'खड्डेमुक्त महाराष्ट्रा'च्या खड्यात दडून बसले आहेत.  हे 'मूषक आख्यान' फार मोठे आहे. वेळेअभावी मी इतकेच सांगेन की, आपण उंदीर हे श्रीगणेशाचे वाहन मानतो. २०१४ मध्ये सत्तारुपी गणेशाची प्रतिष्ठापना सरकारने केली. पण त्यानंतर गणपतीचे वाहन होण्याचे सोडून काही उंदरांनी पळ काढला आणि एकाचे अनेक अशा असंख्य उंदरांचा सुळसुळाट राज्यात गेले ४ वर्षे सुरू आहे.

या उंदरांवर 'कडी नजर' ठेऊन, सरकारचे उंदरांच्या निर्मूलनातील अपयश वेळोवेळी दाखवून द्यायला सत्तेतीलच काही 'बोकेही' तयार झाले आहेत. वेळीच या उंदरांचे निर्मूलन केले नाही तर, या बोक्यांची संख्याही वाढत जाईल. या उंदरांनी गेले ४ वर्षे जो उच्छाद मांडला आहे, तेच उंदीर राज्य तर पोखरतीलच, पण २०१९ ला सरकारची मते कुरतडल्याशिवाय आणि सिंहासन पोखरल्याशिवाय राहणार नाहीत. 

तरी ३ लाख १९ हजार ४००.५७ या मारलेल्या उंदरांव्यतिरिक्त राज्यात आता उच्छाद घालत असलेल्या या असंख्य उंदरांच्या निर्मूलनाचे हे नवे टेंडर मुख्यमंत्र्यांनी त्वरीत मंजूर करावे. नाहीतर सरकारनेच पोसलेले, वाढवलेले हे उंदीर, मांजरी, बोके सरकारसकट राज्यालाच संपवून टाकतील. तसे झाले नाही तर २०१९ मध्ये या उंदरांना समूळ नष्ट करायला आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसह सज्ज आहोत, असा सूचक इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.  

Web Title: The rest of the rats will be the throne of the government in 2019 - Vikhe-Patil's remarks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.