... म्हणून साईदर्शन इमारत कोसळली का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2017 03:02 PM2017-07-25T15:02:23+5:302017-07-25T17:42:41+5:30

घाटकोपरमधील दामोदर पार्क भागातील साईदर्शन ही चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. पण ही इमारत नेमकी का कोसळली? याबद्दल अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.

reasons to collapes saidarshan building ? | ... म्हणून साईदर्शन इमारत कोसळली का?

... म्हणून साईदर्शन इमारत कोसळली का?

Next
ठळक मुद्देसाईदर्शन इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.मूळ इमारतीच्या रचनेमध्ये काही अंतर्गत बदल केल्यामुळे इमारत कोसळली असावी, असा अंदाज गृह निर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केला आहे

मुंबई, दि. 25- घाटकोपरमधील दामोदर पार्क भागातील साईदर्शन ही चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. पण ही इमारत नेमकी का कोसळली? याबद्दल अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. मूळ इमारतीच्या रचनेमध्ये काही अंतर्गत बदल केल्यामुळे इमारत कोसळली असावी, असा अंदाज गृह निर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक माहितीनूसार,  साईदर्शन इमारतीमध्ये असलेल्या नर्सिंग होमने नुतनीकरणासाठी परवानगी घेतली नव्हती, अनधिकृतपणे नूतनीकरणाचं काम सुरू होतं. त्यामुळे ही इमारत कोसळली असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

विशेष म्हणजे ही इमारत 30 वर्ष जुनी होती. रहिवाशांनी विनापरवानगी इमारतीच्या ढाच्यात अंतर्गत बदल केले होते. त्यामुळे पीलर्सला धोका निर्माण झाला होता. या ठिकाणी काहींनी विनापरवाना वैयक्तिक कार्यालयंही काढली होती, अशीही प्राथमिक माहिती समोर येते आहे. इमारतीतील नियमबाह्य बदल तेथिल लोकांच्या जीवावर बेतल्याचं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल दिला असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. तर बीएमसीने कोणताही अहवाल दिला नसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

साईदर्शन इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली ३० ते 35 जण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. या दुर्घटनेतील दोन जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत, घटनेची माहिती कळताच अग्निशामकदलाचं पथक घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सुरेश पाटील यांनी ही इमारत तीस ते चाळीसवर्ष जुनी असल्याचा अंदाज व्यक्त केला तसेच पालिकेकडून या इमारतीला नोटीस बजावण्यात आल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. दुर्घटनास्थळी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल झाले असून, मदतकार्यामध्ये गुंतले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 14 गाडया, 108 अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या आहेत.  दरवर्षी पालिकेकडून पावसाळयात धोकादायक इमारतींना नोटीस बजावली जाते. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतही एक धोकादायक इमारत कोसळली होती. सुदैवाने त्यावेळी कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती. दरवर्षी पावसाळयात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात जुन्या जर्जर इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडत असतात. त्यात अनेक नागरीकांना प्राणास मुकावे लागते. इमारती रिकामी करण्यासाठी पालिकेकडून नोटीस बजावली जाते पण कोणतीही पर्याय व्यवस्था केली जात नसल्याने रहिवाशी आपला जीव मुठीत घालून त्या धोकादायक इमारतीमध्ये रहातात. 

 

Web Title: reasons to collapes saidarshan building ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.