- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सांताक्रूझ पोलिसांनी आमदार नितेश राणेंसह तिघांविरुद्ध शुक्रवारी पहाटे खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. जुहू येथील हॉटेल एस्टेलामध्ये भागीदारीसाठी नितेश राणे यांनी धमकावून महिन्याला १० लाख रुपयांची मागणी करत, हॉटेलमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
जुहू रोड परिसरात आॅक्टोबर २०१६ पासून निखिल मिराणी आणि हितेश केसवानी यांनी एस्टेला हॉटेल सुरू केले. त्यानंतर नितेश राणे यांनी त्या दोघांसमोर हॉटेलमध्ये भागीदारीचा प्रस्ताव ठेवला. मात्र, हॉटेल सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याने दोघांनीही हा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून राणे त्यांच्याकडे भागीदारीसाठी मागे लागले होते.
गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नितेश राणे यांनी त्यांना पुन्हा भागीदारीसाठी विचारले. मात्र, दोघांनीही नकार दिल्यावर राणेंनी त्यांना हॉटेल बंद करण्याची धमकी दिली, असा त्यांना पुन्हा भागीदारीसाठी विचारले. मात्र, दोघांनीही नकार दिला. तेव्हा राणेंनी त्यांना हॉटेल बंद करण्याची धमकी दिल्याचा आरोप हितेश केसवानी यांनी केला आहे. त्याच दिवशी रात्री साडेअकराच्या सुमारास दोघे जण हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी हॉटेलमध्ये असलेल्या जवळपास ६० ग्राहकांना धक्काबुकी करत बाहेर काढण्यास सुरुवात केली. राजकीय नेत्याच्या नावाने दोघे जण हॉटेलमध्ये तोडफोड करत असल्याची माहिती मिळताच, केसवानी, मिराणी यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली.
केसवानी यांच्या तक्रारीवरून सांताक्रुझ पोलिसांनी नितेश राणेंसह शेख आणि अन्सारीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नितेश राणेंनाही लवकरच या प्रकरणात अटक होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस प्रवक्त्या रश्मी करंदीकर यांनी दिली.

पराग संघवींनाही भागीदारी दिल्याचा आरोप
केसवानींच्या आरोपानुसार, नोव्हेंबर २०१६ मध्ये सांताक्रुझमध्ये झालेल्या बैठकीत राणेंनी पी. बी. रिअ‍ॅल्टीचे पराग संघवी यांनाही या हॉटेलमध्ये ५० टक्के भागीदारी देण्यास सांगितले. नकार देताच धमकावून करारनाम्यावर जबरदस्तीने सह्या घेतल्या. दोघांनीही एकाही पैशांची गुंतवणूक न करता, करारनाम्यांवर सही करून घेतल्याचा आरोप केसवानी यांनी केला आहे. त्यानंतर, कामादरम्यान संघवी यांनी दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, व्यवसायात तोटा आल्यामुळे ते पैसे परत मागत असल्याचे जबाबात नमूद केले आहे.

भागीदारीसाठी अशीही खटपट (जबाबात दिलेल्या माहितीनुसार)
मे २०१६ - हॉटेलचे काम सुरू केले
आॅक्टोबर २०१६ - हॉटेलमध्ये भागीदारीसाठी प्रस्ताव
(१० दिवसांत वरळी, सांताक्रुझ, नरिमन पॉइंट येथील नामांकित हॉटेलमध्ये राणेंसोबत तीन ते चार बैठका झाल्या. )
नोव्हेंबर २०१६ - करारनाम्यावर जबरदस्तीने सह्या
डिसेंबर २०१६ - धमकावणे
मे २०१७ - हॉटेल खाली करण्यासाठी घुसखोरी