MLC Election Result 2018: चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषद मतदारसंघात भाजपाचे रामदास आंबटकर विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 03:25 PM2018-05-24T15:25:39+5:302018-05-24T15:25:39+5:30

चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषद मतदार संघाच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रामदास आंबटकर (५२८) यांनी ३७ मतांनी काँग्रेसचे उमेदवार इंद्रकुमार सराफ (४९२) यांच्यावर विजय संपादन केला.

Ramdas Ambatkar of BJP won the Chandrapur-Wardha-Gadchiroli Legislative Council constituency | MLC Election Result 2018: चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषद मतदारसंघात भाजपाचे रामदास आंबटकर विजयी

MLC Election Result 2018: चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषद मतदारसंघात भाजपाचे रामदास आंबटकर विजयी

googlenewsNext

चंद्रपूर : चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषद मतदार संघाच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रामदास आंबटकर (५२८) यांनी ३७ मतांनी काँग्रेसचे उमेदवार इंद्रकुमार सराफ (४९२) यांच्यावर विजय संपादन केला. दोन्ही अपक्षांनी पाठिंबा दर्शविलेला असल्यामुळे त्यांना एकही मत मिळाले नाही. ३६ मते अवैध ठरली तर एक मत बाद ठरले. मतांचा कोटा ५१० झाल्याने पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे भाजप उमेदवार रामदास आंबटकर यांना गुरुवारी येथील नियोजन भवनात झालेल्या मतमोजणीअंती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी विजयी घोषित केले. 
रामदास आंबटकर विजयी मुद्रेत बाहेर येताच वर्धाचे खासदार रामदास तडस, चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे, राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, हिंगणघाट आमदार समीर कुणावार, गडचिरोलीचे जिल्ह्यातील आमदार देवराव होळी, क्रिष्णा गजभिये, आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे, चंद्रपूर जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूर महापौर अंजली घोटेकर, भाजपचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष व बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा यांनी विजयी निशाणी दाखविली.

सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. यानंतर उमेदवारनिहाय मतांचे विभाजन करतानाच आंबटकर हे पहिल्या फेरीत ५५८ मते घेऊन विजयी झाल्याची चर्चा बाहेर आली. यानंतर भाजपाच्या गोटात आनंदाची लहर पसरली. यानंतर सुमारे अर्ध्या तासाने प्रत्यक्ष मतमोजणीत भाजपा उमेदवार आंबटकर यांना ५२८, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार इंद्रकुमार सराफ यांना ४९१ मते मिळाल्याची वार्ता बाहेर येताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करीत विजयी जल्लोष साजरा करायला सुरुवात केली. या निवडणुकीसाठी २१ मे रोजी मतदान घेण्यात आले. यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्यातील १०५९ पैकी १०५६ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. यामध्ये नगर परिषद व नगरपंचायत नगरसेवक, जि.प. सदस्य, महापौर, नगराध्यक्ष व पंचायत समिती सभापतींचा समावेश होता. मतदानाची टक्केवारी ९९.७२ इतकी होती. या अनुषंगाने पहिल्या पसंतीची ५२८ मते घेणारा उमेदवार विजयी होणार होता. मात्र मतमोजणीत तब्बल ३६ मते अवैध ठरली आणि एक मत बाद झाल्याने ५१० मतांचा विजयाचा कोटा झाला. यामध्ये पहिल्या पसंतीची मते मोजणीतच भाजप उमेदवाराने ५२८ मते घेऊन विजयावर शिक्कामोर्तब केले, तर काँग्रेस उमेदवाराला ४९१ मतांपर्यंत मजल मारला आली.

मतमोजणीपूर्वी भाजप उमेदवार बहुमताने विजयी होतील, असा विश्वास भाजप गोटातून व्यक्त केला जात होता. तर काँग्रेसही विजयाचा दावा करीत होती. निवडणुकीच्या निकालात भाजप उमेदवार विजयी झाला असला तरी काँग्रेसची मते कमालीची वाढली आहे. काँग्रेस २४९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ७१ मते मिळून केवळ ३२० मतांचा आकडा काँग्रेस आघाडीकडे होता. भाजपकडे ४८३ मते होती. शिवसेना ४५, अपक्ष व अन्यची मते तब्बल २११ होती. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांपेक्षाही भाजपकडे मजबूत संख्याबळ होते. विजयासाठी ५२८ मतांचीच गरज होती.

भाजपला अपक्ष व अन्यची मते मिळतील, असा विश्वास होता. मात्र ही मते काँग्रेस उमेदवारांच्या पारड्यात पडल्याने  निवडणूक चांगलीच चुरशीची झाली. काँग्रेस उमेदवार सराफ हे वर्धा शिवसेना जिल्हा प्रमुख राजू सराफ यांचे वडिल असल्यामुळे काँग्रेसचा शिवसेनेच्या मतांवर डोळा होता. भाजपचे ४८३ आणि शिवसेनेचे ४५ मते मिळून ५२८ मते होतात. आणि भाजपला मिळालेली मतेही ५२८ इतकीच आहे. यावरून शिवसेनेचे एकही मत फुटल्याचे दिसून येत नाही. या मतांच्या आधारावरच भाजपने गेल्या निवडणुकीत मितेश भांगडिया यांच्या रुपाने हिसकावलेला काँग्रेसचा गड राखण्यात यश मिळविले. निवडणूक प्रक्रियेमध्ये वर्धा निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा, गडचिरोली निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे व उपविभागीय अधिकाऱ्यांनी काम पाहिले.

Web Title: Ramdas Ambatkar of BJP won the Chandrapur-Wardha-Gadchiroli Legislative Council constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.