मुंबई, 13 ऑगस्ट - राज्याचे परिवहनमंत्री  आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी रक्षाबंधन सणानिमित्त " एसटीरूपी बहिणीला प्रवाशी बांधवांनी एसटीतून सुरक्षित प्रवास करण्याचे ओवाळणी स्वरूप अभिवचन " देण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला  प्रवाशांनी दिलेला प्रतिसादामुळे ७ व ८ ऑगस्ट या दोन दिवसांत एसटीला  ३७. २५ कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न  प्राप्त झाले आहे. ही प्रवाशी बांधवांनी एसटीला दिलेली ओवाळणीचा आहे, असे मानून एसटी महामंडळतर्फे याबद्दल रावते यांनी प्रवाशांचे जाहीर आभार मानले आहेत, तसेच या काळात अहोरात्र सेवा देणाऱ्या एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे. 
दरवर्षी रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने एसटीला प्रवाशी गर्दी होत असते. यंदा रावते यांनी प्रशासनाला निर्देश देऊन स्थानिक पातळीवर मार्गनिहाय नियमित बसेस बरोबरच जादा  एसटी बसेस सोडण्याचे नियोजन करण्यास सांगितले होते, तसेच प्रवाशांना मदत करण्यासाठी ठीक-ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांना नेमून त्यांच्याद्वारे प्रवाशांना जादा वाहतुकीचे मार्गदर्शन करताना एसटीने प्रवास करण्यासाठी प्रोत्साहन करावे आशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मध्यवर्ती कार्यालयातून विषेश परिपत्रक काढून महाराष्ट्रातील ३१ विभागांत विभाग नियंत्रकाची नेतृत्वाखाली ७ व ८ ऑगस्ट रोजी. जादा वाहतुकीचे नियोजन केले गेले. या ३१ विभागांमध्ये पुणे विभागाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत या दोन दिवसात  २. ८५ कोटी रुपये इतके उत्पन्न प्राप्त केले असून नाशिक विभागाने २. ६० कोटी रुपये उत्पन्न मिळवून दुसरे स्थान मिळवले आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि वक्तशीर सेवा देणाऱ्या एसटीच्या प्रामाणिक प्रयत्नाचे सर्व थरांतून कौतुक होत आहे.