वर्धा, दि. 13 - हिंगणघाट येथील संत तुकडोजी वार्ड निवासी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते राजेंद्र झोटिंग खडकी यांचा एकुलता एक मुलगा मोहित वय 18 याचे अल्पशः आजाराने निधन झाले. मोहितला सिकलसेलचा  आजार होता. त्यावर नियमित औषोधोपचार सुरु होता. त्याने 12 वी परीक्षा नुकतीच उत्तीर्ण केली असुन आयुर्वेद डॉक्टर होण्याची त्याची धडपड सुरु होती. त्याची अचानक प्रकुर्ती  बिघडल्याने दि. 11 ला सकाळी त्याला नागपुर हलविण्यात आले. परंतु 12 आगस्ट ला दुपारी 12 वाजताचे दरम्यान त्याचे निधन झाले.  काळाने अचानक झडप घालून त्याला त्याचे ध्येय्यापासून दूर नेले.

त्याची डॉक्टर होण्याची इच्छा जरी पूर्णत्वास आली नाही तरी डॉक्टर घडविण्यात त्याच्या शरीराचा खारीचा वाटा असावा या हेतूने परिवारावर आकस्मिक दुःखाचा डोंगर कोसळला असताना सगळं दुःख बाजूला ठेऊन राजेंद्र झोटिंग यांनी मोहितचे मृत शरीर नागपूरच्या मेडिकल कॉलेजला  दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मोहितचा मृतदेह सायंकाळी 5 वाजता हिंगणघाटला घरी आणून 1 तासाने नागपुर मेडिकल कॉलेज साठी रवाना करण्यात आला. नागपूर मेडिकल कॉलेजच्या नवोदित डॉक्टरांना त्याचा मृतदेह अभ्यासासाठी उपयोगी ठरणार आहे

नेहमी मित्रांसोबत राहणारा, हसत राहणारा, नम्र स्वभावाचा मोहित कायम सगळ्यांच्या स्मरणात राहणार असून त्याच्या अकस्मात जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. मोहीतच्या पार्थीवाचं दान म्हणजे झोटींग परिवाराची त्या आभाळभर दुःखाला घातलेली गवसणीच ठरत आहे.