राज ठाकरेंच्या संताप मोर्चावर गुन्हा दाखल, जमावबंदीचा आदेश मोडल्याचा मनसेवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 08:26 PM2017-10-05T20:26:20+5:302017-10-05T20:47:06+5:30

संताप मोर्चा काढून रेल्वे प्रशासन आणि सरकारचा निषेध नोंदवल्याप्रकरणी या मोर्चाच्या आयोजकांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Raj Thackeray's accusation of breaking the bandwidth order, filing a complaint against Santosh Morcha and breaking the order | राज ठाकरेंच्या संताप मोर्चावर गुन्हा दाखल, जमावबंदीचा आदेश मोडल्याचा मनसेवर आरोप

राज ठाकरेंच्या संताप मोर्चावर गुन्हा दाखल, जमावबंदीचा आदेश मोडल्याचा मनसेवर आरोप

Next

मुंबई - एलफिन्स्टन रोड येथील दुर्घटनेविरोधात संताप मोर्चा काढून रेल्वे प्रशासन आणि सरकारचा निषेध नोंदवल्याप्रकरणी या मोर्चाच्या आयोजकांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनसेवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एल्फिन्स्टन रोड येथे चेंगराचेंगरी होऊन 23 प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा चौक ते चर्चगेट या मार्गावर संताप मोर्चा काढला होता. या मोर्चात मनसैनिकांसह सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. 

गुरुवारी काढण्यात आलेल्या संताप मोर्चानंतर उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासन आणि सरकारवर घणाघात केला होता. मात्र या मोर्चाला पोलिसांनी शेवटपर्यंत परवानगी दिली नव्हती. मात्र रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनसेने जमावबंदी झुगारत मोर्चा काढला होता. त्यामुळे मोर्चा संपल्यानंतर मनसेवर जमावबंदी मोडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 14.30 ते 15.10 वा चे दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याची कायदेशीर परवानगी न घेता ' रेल्वे "प्रशासनाचा धिक्कार असो, रेल्वे प्रशासन मुर्दाबाद' अशी घोषणाबाजी करून मेट्रो सिनेमा चौक ते चर्चगेट असा पायी मोर्चा काढून सार्वजनिक रहदारीस अडथळा करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 




गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चानंतर उपस्थितांना संबोधित करताना  भारतीय रेल्वेसारख्या सरकारी यंत्रणांनी आपल्या कामात सुधारणा केली नाही, तर पुढचा मोर्चा शांततेत निघणार नाही, असे सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसेची गाडी पुन्हा खळखट्याकचा मार्ग अवलंबेल असा सूचक इशारा दिला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका करताना राज ठाकरे यांनी तुम्ही सगळ्या भारतीय जनतेचा विश्वासघात केला आहेत, तुमच्याइतका खोटारडा पंतप्रधान मी बघितला नाही, असा आरोप केला. पश्चिम व मध्य अशा दोन्ही रेल्वे स्थानकांच्या भोवतालच्या परिसरात असलेल्या फेरीवाल्यांचा दाखला देत 15 दिवसांच्या आत जर हे फेरीवाले हटवले गेले नाहीत तर ते काम माझ्या पक्षाचे कार्यकर्ते करतील, असा इशाराही राज यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -

- इतक्या वर्षांचे प्रलंबित प्रश्न आजही सुटत नाहीत. आधीच्या सरकारमध्ये जी परिस्थिती तीच आजच्या सरकारमध्ये. त्यामुळे हा संताप आहे.    ज्याच्यावर कधी विश्वास टाकला नाही त्यांनी घात केला तर वाईट वाटत नाही. पण ज्यावर विश्वास टाकला तेच घात करतायत. म्हणून माझा मोदींवर राग आहे. या देशाने इतकं प्रेम दिलं, विश्वास टाकला त्यांच्यासाठी काय करताय? 

- भाषणादरम्यान राज ठाकरेंची नितीन गडकरीवरही टीका, अच्छे दिन म्हणजे गळ्यात अडकलेले हाडूकचा दिला संदर्भ. याचा अर्थ अच्छे दिन येणार नाहीत हे निश्चित असा आरोप.

- सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणूनच त्यांचं खात बदललं. त्यांच्या जागी पियुष गोयलांना आणला. या गोयलांना काय कळतं रेल्वेचं. या गोयलांच्या पियूषपेक्षा आमच्या दादरच्या आस्वाद, प्रकाशचा पियूष बरा. 

- मुठभरांसाठी बुलेट ट्रेन आणणार, त्यांच्यासाठी लाख कोटीचे कर्ज काढणार आणि अख्खा देश हे कर्ज फेडत बसणार, हे चालणार नाही.

- मुंबईतल्या मूठभर व गुजरातमधल्या मुठभर गुजरात्यांसाठी बुलेट ट्रेनचा डाव असून हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा डाव आहे. 

- माझा व्यक्ती म्हणून मोदींना विरोध नाही....पण त्यांच्या भूमिकांना विरोध आहे, आधी वेगळे बोलत होते आता मोदींची भाषा बदलली आहे. तुमच्याशी आमचं घेणदेण नाही. तुमच्या चुकीच्या भूमिकांना विरोध.

- यावेळी मेट्रो परीसरातील वीज गेली, यावेळी ते म्हणाले की, वीज घालवून काही होणार नाही, विरोधाचा सूर्य हा उगवणारच. 

- बुलेट ट्रेनला पहिल्यांदा विरोध करणारा माणूस मीच होतो, नंतर बाकीचे पोपट बोलायला लागले
- सुरेश प्रभूंनी बुलेटट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना काढून टाकलं. फक्त २-३ माणसं देश चालवणार का?
- सर्व संपादकांना माझी विनंती आहे की या सरकारला वठणीवर आणा
- न्यायालयांसह सर्व संविधानिक संस्थांना माझी विनंती आहे की दबावाखाली निर्णय घेऊ नका
- देशातल्या घराघराचा कानोसा घ्या या; लोकं सरकारला शिव्या घालताहेत
- देशातले सर्व प्रश्न माहित होते असा यांचा दावा मग साडेतीन वर्ष फुकट का घालवलीत

- रतन टाटांच्या सांगण्यावरून मी गुजरातेत गेलो, परंतु आता कळतंय तो मुखवटा होता. खरा विकास झालेला नाही.

- भाजपामधले लोकपण हा सगळा खोटा मुखवटा असल्याचं खासगीत सांगतात.

- आजचा मोर्चा शांततेत निघाला, परंतु पुढचा मोर्चा शांततेत नसेल.

 

Web Title: Raj Thackeray's accusation of breaking the bandwidth order, filing a complaint against Santosh Morcha and breaking the order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.