राज ठाकरेंनी आमच्या गावाची बदनामी केली; हरिसालच्या उपसरपंचांचा FB Live वरून 'स्ट्राईक'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 06:03 PM2019-04-22T18:03:05+5:302019-04-22T18:05:10+5:30

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हरिसाल गावाविषयी दाखवलेला व्हिडिओ पूर्णपणे खोटा असल्याचा आरोप हरिसालचे उपसरपंच गणेश येवले यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून केला आहे. 

Raj Thackeray defamed our village - Harisal's Upsarpanch attack on Raj Thackeray | राज ठाकरेंनी आमच्या गावाची बदनामी केली; हरिसालच्या उपसरपंचांचा FB Live वरून 'स्ट्राईक'

राज ठाकरेंनी आमच्या गावाची बदनामी केली; हरिसालच्या उपसरपंचांचा FB Live वरून 'स्ट्राईक'

Next

अमरावती -  देशातील पहिले डिजिटल गाव असा लौकिक मिळवणाऱ्या हरिसाल गावातील एक व्हिडिओ दाखवत मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी हे गाव डिजिटल झाल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप सोलापूर येथील सभेमधून केला होता. यावेळी राज ठाकरे यांनी या गावातील एका तरुणालाच थेट मंचावर आणल्याने चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हरिसाल गावाविषयी दाखवलेला व्हिडिओ पूर्णपणे खोटा असून, त्यांनी या माध्यमातून हरिसालची संपूर्ण देशभरात बदनामी केल्याचा आरोप, हरिसालचे उपसरपंच गणेश येवले यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून केला आहे. 

 ''राज ठाकरेंनी आपल्या सभांमध्ये हरिसाल गावाविषयी जो व्हिडिओ दाखवला आहे, तो पूर्णपणे खोटा आहे. तसेच राज ठाकरेंनी हरिसाल गावाची जी देशभरात बदनामी केली आहे ती अतिशय चुकीची आहे, असे हरिसाल गावाचे उपसरपंच  गणेश महादेव येवले यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून म्हटले आहे.. आज जर गावात इंटरनेट नसते तर आज मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधू शकलो नसतो, अशी भावना  त्यांनी नेटकऱ्यांसोबत बोलतांना यावेळी व्यक्त केली.''

''डिजिटल व्हिलेजच्या माध्यमातून आमच्या गावाच्या शाळेत कंप्युटर लॅब देण्यात आली आहे. येथे एचपी, माइक्रोसॉफ्ट, जल्दीफाय अशा कंपन्यांच्या मदतीने तंत्रज्ञान पोहोचले आहे. गावातील इंटरनेट व्यवस्थित काम करत आह, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात हरिसालची बदनामी करत आहेत, त्यांनी केवळ राजकीय फायद्यासाठी हे केले आहे, असेही ते यावेळी म्हणाले. 

हरिसाल गाव जेव्हापासून डिजिटल झाले आहे, तेव्हापासून गावाच्या पर्यटनाला त्याचा फायदा झाला आहे. आम्ही एकूण दहा गाईड या गावात काम करतो. मात्र गावाच्या पर्यटनाविषयी जनतेला  फेसबुक आणि व्हॉट्सअॅपमुळे माहिती मिळाली, असे अशोक आठवले या गावकऱ्याने यावेळी सांगितले. 



 फेसबूक लाईव्हद्वारे राज ठाकरेंच्या आरोपांबाबत मत मांडताना  हरिसाल गावचे उपसरपंच गणेश येवले यांनी यावेळी  गावातील महिला, दुकानदार तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत गावातील डिजिटल यंत्रणांची वस्तुस्थिती समोर मांडली. तसेच डिजिटल गावामध्ये ऑनलाइन पैसे ट्रांसफर करणे, ड्रायव्हिंग लायसेंससाठी तसेच आधार कार्ड साठी ऑनलाइन फॉर्म भरणे अशा सर्व गोष्टी हरिसाल गावात शक्य असल्याचे, फेसबूक लाईव्हवेळी दाखवून दिले. 

Web Title: Raj Thackeray defamed our village - Harisal's Upsarpanch attack on Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.