राधाकृष्ण विखेंनी सगळ्यात आधी शपथ घेतली खरी, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 12:05 PM2019-06-16T12:05:44+5:302019-06-16T12:05:50+5:30

काँग्रेसमधून भाजपात डेरेदाखल झालेल्या राधाकृष्ण विखे पाटलांना मंत्रिपद देण्यास भाजपमध्ये नाराजी होती.

Radhakrushna Vikhe took oath first but | राधाकृष्ण विखेंनी सगळ्यात आधी शपथ घेतली खरी, पण...

राधाकृष्ण विखेंनी सगळ्यात आधी शपथ घेतली खरी, पण...

मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारने आज मंत्रिमंडळ विस्तार केला. यामध्ये विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये आलेले राधाकृष्ण विखें पाटलांनी पहिली शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी शपथ घेतली. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना तिसऱ्या क्रमांकावर शपथ देण्यात आली. मात्र, विखे पाटलांच्या शपथविधीवेळी सभागृहात शांतता होती. 


काँग्रेसमधून भाजपात डेरेदाखल झालेल्या राधाकृष्ण विखे पाटलांना मंत्रिपद देण्यास भाजपमध्ये नाराजी होती. त्याचे पडसाद शपथविधी सोहळ्यातही उमटले. राधाकृष्ण विखे पाटील हे शपथ घेण्यासाठी व्यासपीठावर आले असता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या नाहीत. उलट तीन नंबरवर आलेल्या आशिष शेलारांवेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी 'आवाज कुणाचा, भाजपाचा' म्हणत टाळ्याही वाजविल्या. 


याउलट दोन नंबरला राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांच्या शपथेवेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. मात्र, विखे पाटलांच्या शपथेवेळी सभागृहात शांतता होती. 


आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. अशातच विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसशी फारकत घेत भाजपाशी जवळीक साधली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये नाराज झाले. डॉ. सुजय विखेंना तिकीट मिळावं यासाठी राधाकृष्ण विखे पाटील प्रयत्न करत होते मात्र तिकीट न मिळाल्याने डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करत अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी पदरात पाडली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखेंच्या गळ्यात विजयाची माळ पडल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला. विखे पाटील यांनी अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला नसला तरी आज होणाऱ्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच एकाच टर्ममधील दोन विरोधी पक्षनेते गळाला लावण्याची कामगिरी भाजपाने चोख पार पाडली आहे. 
 

Web Title: Radhakrushna Vikhe took oath first but

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.