पुणेरी मिसळ - ‘ फटका’ लोकशाहीचा..!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 08:47 PM2019-04-29T20:47:15+5:302019-04-29T20:48:18+5:30

खरंतर मतदार हा राजा आहे आणि उमेदवार सेवक.. पण हल्ली नेमकी उलटी स्थिती आहे..उमेदवार राजा आणि मतदार सेवक झाला आहे.. त्याचं कारण पण तोच आहे...

Puneri Misal - ' fatka' democracy ..! | पुणेरी मिसळ - ‘ फटका’ लोकशाहीचा..!

पुणेरी मिसळ - ‘ फटका’ लोकशाहीचा..!

Next

- अभय नरहर जोशी-  

संगमनेर (जि. अहमदनगर) येथील शाहीर अनंत फंदी हे उत्तर पेशवाईत विशेष गाजलेल्या शाहिरांतील ज्येष्ठ शाहीर. त्यांनी ‘फटका’ हा काव्यप्रकार लोकप्रिय केला. महत्त्वाची गोष्ट डफ वाजवत कठोर-फटकळ भाषेत गाऊन समाजाला पटवून देणे म्हणजे ‘फटका’. अनंत फंदींच्या अनेक फटक्यांपैकी लोकप्रिय ‘बिकट वाट वहिवाट नसावी...’ या फटक्यावर आधारित हा फटका... मतदार-कार्यकर्ते-नेत्यांसाठी हा फटका खास निवडणुकीनिमित्त... 
(चाल : पारंपरिक)
मतदारांसाठी...

बिकट वाट वहिवाट असो, तरी मतदाना तू सोडू नको
हक्क बजावून बैस आपला, उगा घरामध्ये बसू नको
सालसपण धरुनि निखालस, खोट्या आश्वासना फसू नको
अंगी जागृती सदा असावी, वाहवत तू जाऊ नको
नको मिंधेपणा तू घेऊ कुणाचा, डाग आपणा लावू नको
दान मतांचे करण्यासाठी मागेपुढती पाहू नको
बोटांवरती डाग शाईचा लावण्यास तू लाजू नको
मतदानावर रुसू नको
राग भलता काढू नको
दुर्मुखलेला असू नको
गप्पा फुकाच्या मारू नको
प्रलोभनांना फसू नको
पैसे घेऊनि मते भलत्यांना, पोटासाठी देऊ नको ॥ १ ॥

कार्यकर्त्यांसाठी...

वर्म काढुनी शरमायाला, उणे कुणाला बोलू नको
प्रतिस्पर्धी बुडवाया, ‘मेवा’ देण्या झटू नको
मी मोठा शहाणा, बलाढ्यही गर्वभार हा वाहू नको
एकाहून चढ एक जगामधि, थोरपणाला मिरवू नको
नेत्यांच्या उसन्या बळे गोरगरिबाला तू गुरकावू नको
दो दिवसांची जाईल सत्ता, अपयश माथा घेऊ नको
विडा पैजेचा उचलू नको
उणी कुणाचे डुलवू नको
हीनतेस अनुसरू नको
नेत्यांकडे भीक मागू नको
प्रसंगी तू पदरमोड कर, परंतु मिंधा राहू नको ॥ २ ॥

नेत्यांसाठी...

उगीच निंदा, स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको
खुर्चीवरती बसण्यासाठी भलत्या गोष्टी करू नको
हक्काचे मतदान आपले, दुसºयांचे तू चोरू नको
सत्ता असली, नसली तरी मान सुख, कधि विटू नको
सत्कर्मातून धनसंचय, कर सत्कार्यी व्यय, हटू नको
आता तुज गुजगोष्ट सांगतो, जनसेवा कधी सोडू नको
‘तडजोडी’ करू नको
समर्थकांना अंतरू नको
विरोधकांना हिणवू नको
मदतीस विस्मरू नको
सत्कीर्ती नौबतिचा डंका गाजे तव मग शंकाच नको ॥ ३ ॥
 

Web Title: Puneri Misal - ' fatka' democracy ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.