Pune- black magic in dinanath mangeshkar hospital | VIDEO- धक्कादायक; पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने बोलावला मांत्रिक, आजारी महिलेचा मृत्यू

पुणे- पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये रूग्णाला बरं करण्यासाठी मांत्रिकाला बोलावून जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या महिलेच्या उपचारांसाठी मांत्रिक बोलावल्याची घटना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. मात्र हा डॉक्टर हॉस्पिटलबाहेरील असून त्याने मांत्रिक आणल्याचं समोर आल्याने हॉस्पिटलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

दोन दिवसांपूर्वी संध्या सोनवणे (वय 24,  राहणार दत्तवाडी, पुणे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोनवणे यांना मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी  स्वारगेट येथील डॉ सतीश चव्हाण यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र तेथील उपचारांना यश न आल्यामुळे त्यांना मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र त्यानंतर डॉ. चव्हाण दीनानाथ हॉस्पिटलमध्ये रुग्णांना तपासायला येत असत. नंतर त्यांनी एक दिवस मांत्रिकाला बोलावलं आणि त्याच्यामार्फतही उतारा वगैरे करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने मात्र असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे. शिवसेनेचे शहर संघटक सचिन तावरे यांच्यापर्यंत यासंदर्भात तक्रार केली आहे. याबाबत रुग्णाच्या भावाने माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी कोणतीही परवानगी न घेता मंत्रिकाला बोलवल्याचे सांगितले. चव्हाण यांनी  चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केली असून त्यातच  जीव गमवावा लागल्याचेही नमूद केले.

याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या  नंदिनी जाधव यांनी बोलताना यांनी जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून हा डॉक्टरी पेशाला काळीमा फासण्याचा प्रकार असल्याचं त्यांनी म्हंटलं.

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाने आरोप फेटाळले, पाहा व्हिडीओ -  


Web Title: Pune- black magic in dinanath mangeshkar hospital
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.