ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 21 -  स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचे काम केले आहे. सावरकरांचे साहित्य हे महाराष्ट्रापुरते मर्यादित राहता कामा नये, त्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा, असे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आज सांगितले. 
  सावरकर साहित्य संमेलनाचे उदघाटन आज भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बोलत होते. हे साहित्य संमेलन पुढचे तीन दिवस चालणार आहे. या संमेलनात सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा देताना भाजपा अध्यक्ष अमित शहा म्हणाले, सावरकरांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देतात. सावरकरांनी राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचे काम केले. ते रायटर आणि फायटर दोन्हीही होते. त्यांचे विचार आजही राष्ट्रहितासाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे  सावरकरांच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. 
यावेळी स्वातंत्रवीर सावरकरांवर टीका करणाऱ्यांचाही अमित शहा यांनी समाचार घेतला, सावरकरांची निंदा करणाऱ्यांना सावरकरांचे साहित्य वाचावे. सावरकर निस्सिम देशभक्त होते. त्यांच्या देशभक्तीवर शंका घेणाऱ्यांना येणाऱ्या पिढ्या माफ करणार नाहीत, असे अमित शहा म्हणाले. तसेच सावरकरांचे व्यक्तिमत्त्व हे कुठल्याही उपाध्यांच्या पलिकडचे आहे. म्हणूनच देशवासियांनी त्यांना वीर ही पदवी दिली, असेही त्यांनी सांगितले.  
 
 सावरकरांना भारतरत्न द्या  
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या, अशी मागणी अमित शहा यांच्या उपस्थितीत सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीस शिवसेना नेते आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिला.
 

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्या 
पकिस्तानला वाटाघाटीची भाषा समजत नाही, त्यांना सर्जिकल स्ट्राइकची भाषा समजते. असे सर्जिकल स्ट्राईक वारंवार व्हावे आणि पकिस्तानचे कंबरडे मोडून निघावे, अशी सावरकर प्रेमींची इच्छा आहे, इसे संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे यांनी सांगितले.