ऑनलाइन लोकमत
लापूर, दि. 09 - सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर महाराज यांच्या यात्रेस गुरूवारपासून प्रारंभ होणार आहे. या निमित्त होणा-या धार्मिक विधी व तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिली. 
 यावेळी प्रसिद्धी विभागाचे प्रमुख अ‍ॅड. रेवणसिद्धप्पा पाटील, गुंडप्पा कारभारी, चिदानंद वनारोटे, सभापती राजकुमार नष्टे, महादेव चाकोते, मल्लिकार्जुन कळके, सुभाष मुनाळे, बाळासाहेब भोगडे, गिरीश गोरनळ्ळी, काशिनाथ दर्गोपाटील, मल्लिक अर्जुन कळके, सिद्धेश्वर बमणी, गौरीशंकर डुमणे, जी़. एन. कुमठेकर, अ‍ॅड.मिलिंद थोबडे यांची उपस्थिती होती. 
यात्रेच्या पार्श्वभूमीवर रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात प्रतिवर्षाप्रमाणे जनावरांचा बाजार भरवला जात आहे.  यंदा २२० स्टॉल्सची नोंद झाली आहे. विशेषत: आनंद मेळाव्यात यंदा वैष्णवदेवीची प्रतिकृती साकारली जात आहे. २९ आणि ३० जानेवारी रोजी सिद्धेश्वर मंदिर परिसरात महाराष्ट्र राज्य कामगार मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय पुरुष व महिला भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  जवळपास ४५० भजनी मंडळ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यात्राकाळात चोरी, लूट, अतिप्रसंग असे प्रकार घडू नयेत म्हणून सिद्धेश्वर मंदिर परिसरात २४ सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.  यात्रेनिमित्त सिद्धेश्वर मंदिर, गुरुभेट, सोन्नलगी सिद्धेश्वर मंदिरांभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 
अक्षता सोहळा, होमप्रदीपन, शोभेचे दारुकाम यांचे दूरचित्रवाहिन्यांवरुन थेट प्रक्षेपण होणार आहे. तसेच आकाशवाणीवरुन देखील १३ जानेवारी रोजी सकाळी ११़३० पासून अक्षता सोहळ्याचे धावते वर्णन राहणार आहे.
 
यात्रेतील प्रमुख दिवस...
- १२ जानेवारी - ६८ लिंगास तैलाभिषेक. 
- १३ जानेवारी - संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा.
- १४ जानेवारी -होम मैदानावर होमप्रदीपन
- १५ जानेवारी - होम मैदानावर शोभेचे दारूकाम.
- १६ जानेवारी - नंदीध्वजांचे वस्त्रविसर्जन (कप्पडकळी).
 
यंदा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन
यंदा कृ षी व पणन विभाग, राज्य पशुसंवर्धन विभाग आणि जि़प़च्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच ४३ वे सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरविण्यात येत आहे़ १२ ते १६ जानेवारी दरम्यान पाच दिवस हे प्रदर्शन चालणार आहे़ प्रदर्शनात परदेशी भाजा, वैविध्यपूर्ण अवजारे, कृषीतज्ज्ञांचे मार्गदर्शन, खते, बी-बियाणे आदी उत्पादन घटकाचा समावेश राहणार आहे.
 
महिला बचत गटाच्या वस्तूंचे प्रदर्शन
यंदा सुवर्णजयंती ग्रामस्वयंरोजगार योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच बचत गटाच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने होम मैदानावर २५ जानेवारी ते २९ जानेवारी दरम्यान बचत गटाच्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
 
एक कोटीचा अपघात विमा उतरविला
मागील ३ वर्षांपासून सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीने ‘पब्लिक लायब इन्शुरन्स’उतरविला जात आहे़ यात्रा काळात जर काही अपघात, अपंगत्व, मृत्यू झाल्यास त्यांना  वा त्यांच्या कु टुंबीयांसाठी अपघात विमा उतरवण्यात आला आहे. तसेच युनायटेड इन्शुरन्स कंपनीमार्फ त १० जानेवारी ते ३१ जानेवारी २०१७ या कालावधीसाठी हा विमा राहणार आहे़ अपघाती व्यक्तीस पाच लाख किंवा त्याहून जास्त रकमेचे विमा संरक्षण लाभणार आहे.