लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वीज निर्मितीच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत असून, आजमितीस ३,२२२ मेगावॅटएवढी वीज निर्मिती केली जात आहे. अलीकडच्या काळात वीज निर्मितीचे आणखी काही संच उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे २०२५ पर्यंत राज्याला शाश्वत वीज पुरवठा केला जाणार असल्याचा विश्वास ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी अकोला येथे व्यक्त केला. दरम्यान, अकोला जिल्ह्यात येत्या काळात साडेतीनशे कोटींची विजेची कामे केली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
ऊर्जा मंत्री दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दोन दिवस त्यांनी जिल्ह्यातील वीज, कृषी पंप व इतर विकास कामांचा आढावा घेतला. ही माहिती देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी जागर सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेला अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ऊर्जा मंत्र्यांनी तीन वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या कामाचे समाधान व्यक्त करताना शासनाच्या वतीने येत्या काळात राबविण्यात येणाऱ्या विविध वीज विकास योजनांची माहिती यावेळी दिली.
राज्यात ६६० वीज निर्मितीचा नवीन संच भुसावळ दीप नगर येथे होणार असून, मागे-पुढे पारस औष्णिक वीज केंद्राच्या काम सुरू होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. वीज निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत असल्याने उद्योगांना यापुढे माफक दरात वीज उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे छत्तीसगडसारख्या राज्यात जाणारे उद्योग याच राज्यात स्थिरावतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोळशावरील वीज निर्मितीच्या संचासोबतच सौर ऊर्जेवर आमचा अधिक भर आहे. यासाठीच मुख्यमंत्री सौर वाहिनी ही योजना राबविण्यात येणार असून, राज्यातील नळ योजना यापुढे सौर ऊर्जेवर चालविल्या जाणार आहेत. त्यासाठीची तयारी करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
कृषी व इतर थकीत वीज बिलाबाबत दंडाची सूट देत असल्याचे जाहीर केले. राज्यात १७ हजार कोटी वीज बिलाची थकबाकी आहे. अकोला जिल्ह्यात २५० कोटी इतर व १२० कोटी कृषी पंपाची थकबाकी आहे. या सर्व थकीत वीज ग्राहकांना दंडातून सूट दिली जाणार असून, उर्वरित मूळ रक्क म ही पाच हप्त्यात जमा करायची आहे. या वसूल रकमेवरच पुढची कृषी पंपाची कामे केली जाणार आहेत.
महापालिकांकडे असलेल्या वीज बिल थकबाकीबाबत हाच नियम असून, त्यांना हप्त्याने फेड करता येईल. या सोबतच शासन बेरोजगारासोबत असून,औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून (आयटीआय) पदवी, पदविका घेतलेल्या युवकांना कंत्राट देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करू न दिल्या जातील.
७५ लाख रुपयांपर्यंतचे काम आयटीआय विद्यार्थ्यांना दिले जाईल. त्यासाठी त्यांना याबाबतचे कौशल्य शिक्षण त्यांना महावितरणतर्फे दिले जाईल. ग्राम पातळी व शहरातही यामधूनच गाव व शहर व्यवस्थापकांची नेमणूक केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच वीज पुरवठ्याची कामे सुरळीत चालण्यासाठी वायरमनची नियुक्ती केली आहे.
महापारेषणमध्येही कर्मचाऱ्यांची नियुक्त ी करण्यात आली आहे. विजेचा खर्च कमी होणारे नवीन एनर्जी पंप देणार असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला आमदार गोवर्धन शर्मा,आमदार प्र्रकाश भारसाकळे,आमदार रणधीर सावरकर,आमदार हरिष पिंपळे,महापौर विजय अग्रवाल, भारतीय जनतापक्षाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात पाटील,शहर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

अकोल्यातील दारू दुकानांचा मुद्दा गाजला!
अकोल्यातील गोरक्षण रोडवर दारू ंची दुकाने थाटली आहेत. त्या दुकानांना अवैधरीत्या वीज पुरवठा करण्यात आला असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. या प्रकरणाची दखल घेतली जाणार असून, चौकशी करू न संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भातील कागदपत्रे ऊर्जामंत्र्यांना यावेळी देण्यात आली.

अकोल्यात रिंगमेड योजना
अकोला शहरातील मुख्य रस्त्यावरील विद्युत खांब शिफ्ट करू न वीज जोडणी भूमिगत करण्यासाठी २४ कोटी रुपये खर्च येणार असून, यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून नऊ कोटी तत्काळ मंजूर करण्यात येणार आहेत, तसेच शहरात रिंगमेड योजना सुरू करण्यात येणार आहे. यामुळे एक फिडर बंद पडले तरी शहरातील वीज खंडित होणार नाही. यासाठी किती निधीची आवश्यकता आहे, याबाबतचा प्रस्ताव १५ जूनपर्यंत पाठविण्याचे निर्देश संबंधितांना ऊर्जा मंत्र्यांनी यावेळी दिले. येत्या ३० जूनपर्यंत विजेसंदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यात येणार असून, त्यासाठी आठवड्यातील तीन दिवस महावितरणचे अधिकारी ग्राहक मेळावे घेतील, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांकडून घेतले पैसे
च्वाशिम येथील महावितरणच्या एका अधिकाऱ्याने शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचा मुद्दाही येथे उपस्थित करण्यात आला. त्यावरही कारवाई होईल, असे ऊर्जामंत्री म्हणाले.