लोकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत कमळाबाईस दिला ‘तलाक’, विजयला चोपले - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 07:42 AM2017-10-11T07:42:36+5:302017-10-11T07:45:33+5:30

People gave 'Kamalabai' in Gram Panchayat elections 'Divorce', Vijay Chopale - Uddhav Thakre | लोकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत कमळाबाईस दिला ‘तलाक’, विजयला चोपले - उद्धव ठाकरे

लोकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत कमळाबाईस दिला ‘तलाक’, विजयला चोपले - उद्धव ठाकरे

Next
ठळक मुद्देभाजपने आकड्यांचा खेळ कितीही करूद्यात, सत्य वेगळेच आहे. सर्वाधिक ग्रामपंचायती आपण जिंकल्याचा दावा भाजपाने केला.

मुंबई - प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी मुख्यमंत्री सदैव मैदानात सज्ज असतात. पण लोकांचे प्रश्न कधी सोडवणार? ते तसेच लोंबकळत पडले आहेत. लोकांना दिलासा देण्याचे कर्तव्य पार पाडण्याऐवजी फक्त निवडणुका जिंका व विजयाचे ढोल वाजवा हेच जणू ईश्वरी कार्य फडणवीस सरकारने अंगीकारले आहे या शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस सरकारला खडेबोल सुनावले आहेत. 

लोकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत कमळाबाईस ‘तलाक’ दिला आहे. भाजपने आकड्यांचा खेळ कितीही करूद्यात, सत्य वेगळेच आहे. ते सत्य स्वीकारले तर लोकांचा मान ठेवला असे होईल. पराभवाच्या मानेवर पाय ठेवून विजयाच्या किंकाळ्या मारता येणार नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीत विजय गांडो थयो छे! विजय वेडा झाला आहे व लोकांनी विजयाला चोपले आहे! असे उद्धव यांनी म्हटले आहे. 

राज्यात सोमवारी ग्रामपंचायती निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वाधिक ग्रामपंचायती आपण जिंकल्याचा दावा भाजपाने केला. तोच धागा पकडून उद्धव यांनी भाजपाचा समाचार घेतला. 

काय म्हटले आहे अग्रलेखात 

- सत्ताधारी भाजपने ‘थेट’ निवडणुकांचा बुद्धिबळ पट मांडला. पण वजिरांना फार महत्त्व न देता हत्ती, घोडे, उंट व शिपायांनीही अनेक ठिकाणी फत्ते केल्याचे चित्र आहे. हे हत्ती, घोडे, उंटही आमचीच सावत्र मुले व त्यांचे पाळणे कमळाबाईनेच हलवले, असा दावा कुणी करणार असतील तर त्याला काय करायचे? आजच्या ग्रामपंचायत निवडणूक निकालांत राजकीय यश बघणे म्हणजे मेंढ्यांच्या ‘बें बें’मधून कोकिळेच्या आवाजाचा आस्वाद घेण्यासारखे आहे, असे मत शेतकऱ्यांचे नेते गिरीधर पाटील यांनी व्यक्त केले आहे ते योग्य आहे. हे सत्य आहे की अनेक ठिकाणी प्रस्थापितांना भुईसपाट करून नव्या, ताज्या दमाच्या मंडळींना मतदारांनी संधी दिली आहे. त्यात सर्वच पक्षांच्या मातब्बरांचा समावेश आहे. आमच्या पक्षास इतक्या ग्रामपंचायती विजयांचा आकडा लागला, वगैरे गमजा आज तरी कुणी मारू नये. 

- कर्जमाफीची दमडीही शेतकऱ्यांच्या हाती न पडता कर्जमाफीचे श्रेय फक्त जाहिरातबाजीतून लाटल्यासारखेच मग हे होईल. त्यामुळे जरा सबुरीने घ्या इतकेच आम्ही सांगू शकतो. विरोधकांकडे ग्रामपंचायतींचीही सत्ता राहू नये व सर्वत्र ‘कमळा’बाईचीच मैफल सजावी त्यासाठी थेट सरपंच निवडीचा कायदा मुख्यमंत्र्यांनी घाईघाईने केला, पण तरीही नक्की किती ठिकाणी भाजपचे सरपंच निवडून आले? ग्रामपंचायतीत अनेक ठिकाणी असे झाले आहे की, सदस्य एका पक्षाचे व सरपंच दुसऱ्या पक्षाचा. नगरपालिका निवडणुकीतही भाजपने हाच घोळ घातला. त्यामुळे नगरपालिकेत बहुमत कोणत्याही पक्षाचे येऊ द्या. थेट नगराध्यक्ष किंवा सरपंच निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद नीतीने आम्ही माणसे निवडून आणू. यात ‘दाम’ महत्त्वाचे आहे व ते भरपूर असल्याने ‘थेट’ पद्धतीत त्यांना ते फायद्याचे ठरत आहे. पुन्हा या निवडणुका पक्ष चिन्हांवर लढवल्या जात नसल्याने महाराष्ट्रातील यच्चयावत सर्वच ग्रामपंचायती भाजपनेच जिंकल्याचा दावाही ते करू शकतात, पण वस्तुस्थिती तशी नाही.

- त्यांचे अनेक महत्त्वाचे किल्ले ढासळले आहेत व शिवसेना तसेच राष्ट्रवादीने विजयी कूच केले आहे. बीड जिह्यात पंकजा मुंडे यांचा गड ढासळला आहे. तेथे धनंजय मुंडे यांनी मुसंडी मारली आहे. हा पंकजा मुंडे यांना धक्का असला तरी भारतीय जनता पक्षाची दयनीय अवस्था समोर आली आहे. परळी तालुक्यात महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली आहे. रावसाहेब दानव्यांच्या जालन्यातही भाजप मागे पडला आहे. संभाजीनगरात शिवसेना आघाडीवर आहे. येवला, सिन्नर, इगतपुरीत शिवसेनेने वर्चस्व राखले आहे. अकोले, नगरमध्येही भाजप मागे पडला आहे. येथे विखे-पाटलांची डाळही शिजलेली दिसत नाही. जळगावात शिवसेनेची मोठी आघाडी आहे. 

- एकंदरीत ग्रामपंचायतीचे निकाल महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना विचार करायला लावणारे आहेत. ग्रामीण महाराष्ट्राचा कल हा सरकारी पक्षाच्या बाजूने नाही व ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने

- फडणवीस सरकारला ‘नोटीस’ मारली आहे. हे निकाल म्हणजे ‘अच्छे दिन’ येण्याची सुरुवात झाली असे म्हणायला हवे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. कर्जमाफीची घोषणा करून सरकारने शेतकऱ्यांचा जो मानसिक छळ आरंभला त्या छळाचा हा सूड आहे. आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. महागाईचे रण पेटले आहे, शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे व अंगणवाडी सेविका संप मिटूनही अस्वस्थ आहेत. ग्रामपंचायतीत सर्वाधिक विजय मिळविल्याचा दावा करणारे आणि त्या खोटय़ा आकड्यांवर सोशल मीडियावर ‘सक्रिय’ असणारे राज्य ‘सरकार’ विदर्भात कीटकनाशक कांडाचे बळी ठरलेल्या गरीब शेतकऱ्यांबद्दल मात्र कमालीची ‘निक्रियता’ का दाखवत आहे?

- प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी मुख्यमंत्री सदैव मैदानात सज्ज असतात. पण लोकांचे प्रश्न कधी सोडवणार? ते तसेच लोंबकळत पडले आहेत. सरकार, प्रशासन, राजकीय व्यवस्था यांचे काम आता महाराष्ट्राला दिशा देण्याचे राहिलेले नाही. लोकांना दिलासा देण्याचे कर्तव्य पार पाडण्याऐवजी फक्त निवडणुका जिंका व विजयाचे ढोल वाजवा हेच जणू ईश्वरी कार्य फडणवीस सरकारने अंगीकारले आहे. लोकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत कमळाबाईस ‘तलाक’ दिला आहे. भाजपने आकड्यांचा खेळ कितीही करूद्यात, सत्य वेगळेच आहे. ते सत्य स्वीकारले तर लोकांचा मान ठेवला असे होईल. पराभवाच्या मानेवर पाय ठेवून विजयाच्या किंकाळ्या मारता येणार नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीत विजय गांडो थयो छे! विजय वेडा झाला आहे व लोकांनी विजयाला चोपले आहे!

Web Title: People gave 'Kamalabai' in Gram Panchayat elections 'Divorce', Vijay Chopale - Uddhav Thakre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.