संजय काकडेंचा पत्ता पुणे काँग्रेसमधून गेलेल्या त्या एका ‘एसएमएस’ नेच केला कट 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 04:03 PM2019-03-22T16:03:47+5:302019-03-22T16:16:50+5:30

सर्वच पक्षात आपले गुणगान गाणारे आणि आपल्या प्रत्येक भूमिकेचे समर्थन करणारेच लोक असतील असे ‘नेहमी’गृहीत धरणे तसे चुकीचेच.. आणि त्याच धर्तीवर लवकरच कॉग्रेसजन होण्यास उत्सुक असलेल्या संजय काकडेंविषयीचा तो ‘एसएमएस’ ने काँग्रेस हायकमांडच्या मोबाईल वर झळकला आणि....

A one ' SMS ' of Pune Congress cut the entrence of Sanjay Kakade's | संजय काकडेंचा पत्ता पुणे काँग्रेसमधून गेलेल्या त्या एका ‘एसएमएस’ नेच केला कट 

संजय काकडेंचा पत्ता पुणे काँग्रेसमधून गेलेल्या त्या एका ‘एसएमएस’ नेच केला कट 

Next
ठळक मुद्दे लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी दिल्ली दरबारी जोरदार प्रयत्न

पुणे: काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकत सहयोगी राज्यसभा खासदार असलेले संजय काकडेकाँग्रेसवासी होण्याचा पक्का निर्धार केला होता. याप्रसंगी मुख्यमंत्री मला भावासारखे आहे. पण त्यांनीच मला लाथाडले असे वाक्य वापरुन काँग्रेसमध्ये खासदारकीची जागा चाचपत होते. मात्र, सर्वच पक्षात आपले गुणगान गाणारे आणि आपल्या प्रत्येक भूमिकेचे समर्थन करणारेच लोक असतील असे ‘नेहमी’गृहीत धरणे तसे चुकीचेच.. आणि त्याच धर्तीवर लवकरच कॉग्रेसजन होण्यास उत्सुक असलेल्या संजय काकडेंविषयीचा  ‘एसएमएस’ काँग्रेस हायकमांडच्या मोबाईल वर झळकला आणि काकडेंच्या पक्षातरांच्या सुसाट गाडीला ‘रेड सिग्नल’ मिळाला...मग पुन्हा तोच भाऊ कामाला आला आणि अखेर हे बंड थंडावले.. 
      लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी संजय काकडे दिल्ली दरबारी जोरदार प्रयत्न करत होते, तसे त्यांनी पुण्यात जाहीरही केले, मात्र, त्यांचा पत्ता पुण्यातूनच काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीला कट करायला लावला. त्यासाठी फक्त एक एसएमएस उपयोगी पडला. दिल्लीतील पक्षाच्या महत्वाच्या व्यक्तींना हा एसएमएस पाठवण्यात आला. त्यात काकडे यांची सगळी पार्श्वभूमी देत पक्षाचा एबी फॉर्म घेऊन हे उमेदवार गायब होऊ शकतात असे म्हटले होते. तसेच त्यांच्या बांधकाम व्यवसायातील काही गुप्त गोष्टींची माहितीही पुरवण्यात आली होती. त्यामुळेच काकडे यांनी ज्यावेळी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेतली, त्यावेळी खर्गे यांनी त्यांना प्रथम तुम्ही पक्षात प्रवेश करा, त्यानंतरच तुमच्या उमेदवारीचे ठरवता येईल असे स्पष्ट शब्दात सांगितले. त्यानंतरच काकडे यांनी काँग्रेकडून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न सोडून दिले व पुन्हा मुख्यमंत्र्यांबरोबर जुळवून घेतले.
काकडे यांच्याबाबत काँग्रेसचे राज्यातील काही वरिष्ठ नेते आग्रही होते. दिल्लीपर्यंत त्यांचे नाव पोहचवण्यात याच नेत्यांचा हात होता. महापालिकेत काकडे यांची मोठी ताकद आहे, त्यांना उमेदवारी दिली की ही ताकद आपल्या पक्षाकडे वळेल असे दिल्लीत या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना पटवले होते. त्यावर विचारही सुरू होता, मात्र नेमका त्याचवेळी काँग्रेसच्या येथील काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी थेट खर्गे व अन्य नेत्यांना तो एसएमएस पाठवला. त्यात काकडे कसे बेभरवशी आहेत व त्यांच्यामुळे पक्षाची नाचक्की होण्याची दाट शक्यता कशी आहे ते स्पष्ट करण्यात आले होते. 
ही माहिती मिळाल्यामुळेच काकडेंचा पत्ता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी कट केला. तुम्ही आधी पक्षात अधिकृतपणे प्रवेश करा, त्यानंतरच तुमच्या उमेदवारीचा विचार होईल असे त्यांना सांगण्यात आले. काकडे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांच्या मुदतीची अद्याप दीड वर्षे शिल्लक आहेत. ते भाजपाचे अधिकृतपणे सहयोगी सदस्य झाले आहेत. त्यामुळे त्यांनी काँग्रेस प्रवेश केला असता तर त्यांच्या राज्यसभेच्या खासदारकीला धोका होता. काँग्रेसच्या पुण्यातील कार्यकर्त्यांना ते पक्षात नकोच होते. त्यामुळेच त्यांच्या विरोधात जाहीर वक्तव्ये करण्यापेक्षा थेट वरिष्ठांबरोबरच संपर्क साधून त्यांचा पत्ता कट करण्याचा डाव पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. 

Web Title: A one ' SMS ' of Pune Congress cut the entrence of Sanjay Kakade's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.